Sunday, September 14, 2025

क्रिकेटप्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी - मुख्यमंत्री

क्रिकेटप्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी - मुख्यमंत्री

मुंबई : आयसीसी चॅम्पियन चषकावर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचे नाव कोरल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने सांघिक भावना आणि जिद्द, चिकाटीतून क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी आणली आहे, हे अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री श्री‌. फडणवीस यांनी काढले आहेत.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा यांचे विशेष कौतुक केले आहे. " या संपूर्ण मालिकेवर कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरवातीपासून वर्चस्व राखले आणि अंतिमतः विजयाचा कळस केला. यासाठी भारतीय संघ कौतुकास आणि अभिमानास पात्र आहे.

क्रिकेट हे भारतीयांचे वेड आहे. पण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमी भारतीय संघाचे चाहते आहेत. त्यांच्यासाठीही भारताच्या "यंग अँड एनर्जेटीक' संघाची चिवट झूंज उत्कंठावर्धक ठरली. संघाने विजयश्री खेचून आणत क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यात अवर्णनीय अशा क्षणांचे साक्षीदार होण्याची अविस्मरणीय पर्वणीच आणली. हा विजय नेत्रदिपक आणि क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, त्यासाठी आपण सर्व क्रिकेट प्रेमी भारतीय संघाचे आभारी राहू, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आदींचे अभिनंदन केले आहे.

Comments
Add Comment