Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘ये मैं कहाँ समा गया...’

‘ये मैं कहाँ समा गया…’

श्रीनिवास बेलसरे

गझल म्हणजे एक चोरवाट असते आपल्याच मनाच्या हिरेमाणकांनी भरलेल्या, झगमगत्या गुहेत जाण्याची! जसा अल्लाउद्दिन, कुणाला न कळू देता, त्याला सापडलेल्या खजिन्याच्या गुहेत जायचा आणि तिथून हवी तितकी रत्ने, मोती, जवाहिर घेऊन यायचा. तसेच गझल ऐकताना होते. गझल श्रोत्याला त्याच्याच मनाच्या अगदी आत असलेल्या झगमगत्या गुहेत घेऊन जाते. मात्र इथली रत्ने फक्त नाजूक, हळव्या आठवणींची किंवा उत्कट भावनांचीच नसतात! काही रत्ने हव्याहव्याशा वाटणाऱ्या काल्पनिक सुखांची, तर काही आयुष्यभर ठसठसत वाहाणाऱ्या जखमांची असतात. गझल त्या सगळ्यावर एक हळुवार फुंकर घालते. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटलच्या मते, शोकांतिका माणसाच्या दबलेल्या भावनांचे विरेचन करून दिलासा देत असतात. गझलांचेही तसेच असते. कवीने रंगवलेल्या भावना, वेदना, दु:ख, घालमेल यांचे चित्रण वास्तवातली वेदना सुसह्य करतात. अशाच एका मंतरलेल्या प्रदेशात घेऊन जाणारा गझलांचा अल्बम आला होता १९८३ साली! निर्माते होते बिस्वनाथ चटर्जी, आशा भोसले आणि गुलाम अली यांच्या त्या अल्बमचे नाव होते ‘मेराज-ए-गझल.’ मेराज म्हणजे अत्युच्य बिंदू, झीनत. खरेच या संग्रहातील गझला वेगळ्याच उंचीच्या होत्या. काहीशा गूढ, मुग्ध, संदिग्ध अशा भावभावनात भिजवून टाकणाऱ्या या कविता खूप गाजल्या. त्यातली ‘सलौनासा सजन हैं और मै हूं’, ‘नैना तोसे लागे, सारी रैना जागे’ ‘दिल धडकने का सबब याद आया’ ‘फिर सावन रुतकी पवन चली’ ही गाणी आज ४२ वर्षांनंतरही रसिकांच्या मनात ताजी आहेत. त्यात एक गझल होती “दयार-ए-दिल की रात में चिराग जला गया” गीतकार होते नसीर रझा काझमी. सुमारे १०० वर्षांपूर्वी म्हणजे ८ डिंसेबर १९२५ रोजी पंजाबातल्या अंबाला शहरात जन्मलेले काझमी फाळणीनंतर पाकिस्तानला गेले. अजूनही पाक टीव्हीवर आणि बॉलीवूडमध्ये त्यांच्या गझला गायल्या जातात. या शायरचा भर सोपे शब्द वापरण्यावर असे. गझलेचा ‘छोटे बेहेरकी गझल’ हा प्रकार त्यांनी जास्त हाताळला.

या गझलेतली कहाणी एका संपलेल्या प्रेमाची आहे. आठवणीमागे सोडून ‘ती’ कायमची निघून गेलेली आहे! कवीला अधूनमधून तिचा चेहरा, आकंठ प्रेमात बुडालेले, हळवे क्षण आठवत राहतात. त्याचे सांत्वन करायला कुणी नाही. तोच स्वत:चे सांत्वन करून घेताना म्हणतो, ‘आज तिची आठवण हृदयाच्या घरात जणू एक दिवाच लावून गेली. ती भेटली नाही म्हणून काय बिघडले, मनातल्या मनात तिच्या मोहक चेहऱ्याचे दर्शन तर झाले ना!

‘दयार-ए-दिल की रात में चिराग जला गया.
मिला नहीं तो क्या हुआ वो शक्ल तो दिखा गया’
तिच्याशी असलेले नाते, ते उत्कट प्रेम आता संपले. जणू माझे नशीबच माझा शत्रू बनले! त्यालाही हरकत नाही. पण सोबत असताना एकमेकांबद्दलच्या ज्या छोट्या छोट्या तक्रारी असायच्या त्यांचीही गंमत कायमची संपली की!
‘वो दोस्ती तो खैर अब नसीब-ए-दुश्मन ना हुई.
वो छोटीछोटी रंजिशोंका लुत्फ भी चला गया.’
तिच्याशी झालेल्या ताटातुटीची जखम जीवनातल्या इतर अनेक दु:खांनी भरून काढली. शेवटी तिनेही जीवनाशी तडजोड स्वीकारली, मीही स्वत:ला समजावले.

या ओळीत जी संदिग्धता आहे त्यामुळे प्रेयसी हयात आहे की नाही अशीही शंका येते. कारण ‘तुझे भी नींद आ गयी’ म्हणजे ती तिच्या कबरेत विसावली आहे असाही अर्थ निघू शकतो. मग पुढच्या ओळीतले ‘मुझे भी सब्र आ गया’ हे जास्त सोपे होते. कारण इस्लाममध्ये ‘कयामत’च्या दिवशी सगळे कबरेतून पुन्हा उठवले जाणार आहेत. म्हणजे अजून एक भेट शक्य आहे. ‘मी तोवर थांबायचा संयम आता शिकलो आहे’ असेही कवीला म्हणायचे असू शकते. म्हणून ओळी येतात –
‘जुदाइयोंके जख्म दर्द-ए-जिंदगीने भर दिए.
तुझे भी नींद आ गई मुझे भी सब्र आ गया’
कवीला राहून राहून त्यांची प्रेमकथा, तिचा सुखद सहवास आठवत राहतो. तो म्हणतो हे कधी कळालेच नाही की ते सुख आपल्या हातातून काळाने कसे निर्दयपणे काढून घेतले ते!
‘पुकारती हैं फुर्सतें कहाँ गईं वो सोहबतें,
जमीं निगल गई उन्हें, कि आसमान खा गया.’
कवी आज तिच्या आठवणीत बुडालेला आहे. तिचा चेहरा डोळ्यांसमोरून हटत नाही. तेव्हा जगलेला प्रत्येक उत्कट क्षण त्याला आठवतो. तो म्हणतो, ‘ते तारुण्यातले दिवस, प्रेमाचा तो पहाटेच्या आकाशासारखा ताजेपणा आता सुकून गेलाय. मी आरशात स्वत:चा चेहरा पाहतो तेव्हा मला आयुष्य म्हणजे भर दुपारचे ऊन वाटू लागते. तूच काय मला तर आता ‘मीही हरवल्यासारखा झालो आहे!’
‘ये सुबही सफेदियाँ ये दोपहरकी जर्दियाँ
अब आइनेमें देखता हूँ मैं कहाँ चला गया.’
माणूस कितीही मोठ्या दु:खातून सावरतो. नंतर त्याला वाटू लागते आपण तर इतके निराश झालो होतो, आयुष्य निरर्थक वाटू लागले होते मग आपण त्याच्याशी पुन्हा कसा समझौता करून घेतला! नसीरसाहेब स्वत:ला विचारतात, मी संपत चाललेल्या जीवनाच्या समुद्रकिनाऱ्यावर पहुडलो होतो. ती कोणती सुखद वाळू होती जिथे माझ्या दु:खालाही नीज आली? आणि ओहोटीत जशी एक मोठी लाट येते आणि किनाऱ्यावरचे सगळे खूप आत घेऊन जाते, समुद्राच्या पोटात अदृश्य होऊन जाते, तसे माझे झाले. कवी असे चित्र उभे करतो की, जणू त्याला आयुष्याच्या किनाऱ्यावर चीरनिद्रा आली आणि समुद्र स्वत:च त्याचे शरीर घेऊन गेला.

‘ये किस खुशीकी रेतपर
गमोंको नींद आ गई,
वो लहर किस तरफ गई,
ये मैं कहाँ समा गया.’
शेवटी प्रियकर स्वत:ला विचारतो, ‘तिच्या’ आठवणीत किती वेळ गमशील? कुणा तरी जिवलगाच्या जाण्याने सुतकात असलेल्या लोकांना काहीच करावेसे वाटत नाही. पण जगरहाटी तर सुरूच राहणार ना? त्यामुळे आता संपून गेलेल्या काळाविषयी दु:ख करणे सोड. बघ वास्तवाची धग जाणवून देणारा सूर्य आता डोक्यावर आला आहे. उठ जीवनाच्या रामरगाड्यात सामील हो.

‘गए दिनों की लाश पर पड़े रहोगे कबतक,
अलमकशो उठो कि आफताब सरपे
आ गया.’
अवघ्या १४ ओळीत शायर केवढा आशय मांडतात आणि त्याच्याही कितीतरी छटा चितारून वेगवेगळा अर्थ काढण्याची मुभा ठेवतात. खरेच, दु:ख साजरे करायचे असेल तर उर्दूसारखी भाषा नाही आणि गझलसारखा काव्यप्रकार नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -