Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘आमचं काय चुकलं?’ आम्ही कुठे कमी पडलो ?

‘आमचं काय चुकलं?’ आम्ही कुठे कमी पडलो ?

डाॅ. स्वाती गानू

काही वेळा असंही होतं की, पालक हतबल होतात, अक्षरशः रडकुंडीला येतात. कसं समजवावं मुलांना? काय केलं म्हणजे मुलं ऐकतील? आपला हट्ट सोडतील? बेफिकीर होऊन आपलं आयुष्य मातीमोल करणं थांबवतील? चोरी करण्याची सवय याला लागली तरी कुठून? आपल्या घरात तर असं वाईट मार्गाला जाणारं कुणी नाही. आई-वडिलांचं ऐकायचं नाही. उलट उत्तर द्यायचं असं कुणी वागलं नाही, मोठ्यांचा मान राखावा, किमान त्यांनी सांगितलेलं ऐकून तरी घ्यावं असं किती वेळा सांगितलं पण मुलांना नीट वागायचं हे सुद्धा का कळत नाही. मुलगी तिच्याच वर्गातल्या मुलाच्या प्रेमात पडलीय. किती समजावलं तरी ती तिचा हट्ट सोडत नाही, माझं आयुष्य आहे मी कसं जगावं ते मीच ठरवणार.

रात्री चोरून मुलं मोबाईलवर काय काय पाहतात. मोबाईलला हात लावला की चवताळून उठतात. सकाळी उशिरा उठायचं, आंघोळ, ब्रश करणं जितकं टाळता येईल तितकं टाळायचं. हे आणि असे असंख्य प्रश्न पालकांना सतावतात. मुलं हाताबाहेर चाललीत हे डोळ्यांदेखत पाहणं अतिशय वेदनादायी असतं. अशा वेळेस हातावर हात ठेवून बसणं योग्य नाहीच.
मुख्य म्हणजे आपण पालक म्हणून कमी पडलो, मुलांना चांगला माणूस म्हणून घडवण्यात आपल्याला अपयश आलंय. ही अपराधीपणाची भावना आई-बाबांना अस्वस्थ करते. बैचेनी इतकी वाढते की, पालक मुलांवर राग काढतात. त्यांना टोचेल असं बोलतात. कधी उपाशी ठेवलं जातं, खोलीत कोंडून ठेवलं जातं, शाळेत, काॅलेजात जाणं, घराबाहेर पडणं बंद केलं जातं आणि शेवटी माझं नशीबच फुटकं असं म्हणून नशिबाला दोष दिला जातो. रडणंही आवरत नाही. कुणाला सांगावं तरी कसं? आपल्याच मुलांची बदनामी. कसं बाहेर पडावं या प्रश्नांतून हे मग त्यांना कळेनासं होतं. थोड्या फार प्रमाणात बहुतेक सगळ्याच पालकांना या फेजमधून जावं लागतं. यासाठी काय करायला हवं?

सर्वप्रथम मनातून अपराधीपणाची भावना काढून टाका. कारण पालक म्हणून तुम्ही मुलांच्या कल्याणाचाच विचार करता. काही त्रुटी असतीलही त्यात, तर अनुभवी पालकांचे मार्गदर्शन पहिल्या टप्प्यावर घेता येईल. प्रश्न सुटत नसेल, अनुभव कामाला येत नसेल आणि प्राॅब्लेम आपल्या आवाक्याबाहेर जात असेल, प्रकरण गंभीर होऊ लागले असेल, तर कौन्सिलिंग घेणं नक्कीच उपयोगी ठरते. मुलांचे प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील असतात. पण म्हणून सगळं संपलंय असं न मानता किंवा आपणच दुर्दैवी आहोत की, आपल्यापोटी असं मूल जन्माला आलं. अमक्या-तमक्याची मुलं पाहा किती छान वागतात, अभ्यासात पुढे असतात असं म्हणून स्वतःला त्रास करून घेणं पहिल्यांदा थांबवा.

●मुलांच्या शैशवावस्थेत, किशोरवयीन अवस्थेत आणि कुमारावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे सिग्निफिकंट असतात हे खरं असलं तरी प्रत्येक मूल निराळं असतं. त्यांची वाढ, विकासाची गती मागे-पुढे होऊ शकते. काही मुलांना लवकर समज येते, काहींना उशिरा.
●मुलांच्या प्रश्नात वर्तनाचे प्राॅब्लेम्स जास्त प्रमाणात दिसून येतात. हे प्रश्न जसे आई-वडील यांच्या जीन्सशी जोडलेले असतात. तसेच आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं वागणं, त्यांचे विचार, मतप्रदर्शन, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी वागणं याचाही परिणाम होतो. तसेच मुलांच्या भोवतालचे वातावरण, त्यांचे स्वतःचे मित्र याचीही मोठी भूमिका असते.
●मुलं वाट चुकली असतील तर त्यांचं गोल सेटिंग होणं आवश्यक असतं. त्यांच्या या वयात कोणता रोल अभिप्रेत आहे. त्याच्या डायमेन्शनस कोणत्या असतात याची मुलांना जाणीव द्यायला हवी.
●आई-वडिलांचे सांगणे अशा वेळेस मुलांना पटणं थोडं कठीण असतं. कारण त्या गोष्टी मुलांना उपदेशाचे डोस वाटतात. म्हणून अशा वेळी त्यांचे मित्र, शिक्षक किंवा मुलांना ज्यांच्याबद्दल आदर आहे यांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. वस्तुतः प्रोफेशनल मदत ही सर्वोत्तम असते.
●मुलं जेव्हा चुकीचं वागतात तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असतो की, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ इमेज याबद्दल ते अजाण असतात.
स्वतःमधल्या गुण-दोष, क्षमतांची त्यांना टेक्निक्सद्वारा ओळख करून दिल्याने मुलांना आत्मभान येतं. शाळांमधून किंवा खासगी पद्धतीने जेव्हा अनेक शिबीर घेतली जातात त्यात मुलांना स्वतःची ओळख होते. आपण काय करू शकतो याची जाणीव होते. मग त्यांना चॅनेलाईज्ड करता येते.
●मुलांच्या वर्तन समस्यांवर वेळीच मदत घ्यायला हवी. तसेच याची दुसरी बाजू म्हणजे पालक. पालकत्व निभावताना आपल्याकडून काय चुका होताहेत, आपल्या दृष्टिकोनात ज्या गोष्टींबाबत बदल करण्याची गरज आहे ते जाणून घेऊन तसा बदल करायला हवा.

मुलांचे प्रश्न सोडवताना मन, मेंदू शांत ठेवून मुलांचे प्राॅब्लेम्स आधी मान्य करायचे आणि सोल्युशन्सबाबत फोकस करायचा हे लक्षात ठेवायला हवे. मुलांना मदतीची गरज आहे. अशा वेळेस ती उपलब्ध करून देणं ही पालकांची भूमिका असायला हवी. वर्तनाचे प्रश्न हे सातत्याने वयानुसार वेगळं रूप धारण करतात म्हणून सजग व जबाबदार पालकत्व अपेक्षित आहे. आपलं काही चुकलेलं नाही, फक्त मुलांच्या वयानुरूप आणि बदलत्या परिस्थितीप्रमाणे पालकत्वात आवश्यक बदल करायला मात्र हवेतच हा विचार मनाशी ठरवलात, तर प्रश्न नक्कीच सुटू शकतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -