मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
सोमैया संकुलात शिकले ही माझ्याकरिता खूप मोठी गोष्ट आहे. कारण इथेच ‘शिक्षण’ या शब्दाचा अर्थ मला अनेक अंगांनी समजला. या काळातील माझ्या गुरूंबद्दल मी वेळोवेळी लिहिले आहे. या काळात असेच एक आनंदाचे झाड माझ्या पदवी स्तरावरील काळात अवतीभवती सळसळत होते. ते म्हणजे खादीच्या झब्यातले देखणे, उमदे ‘अनंत भावे सर’. काही दिवसांपूर्वी सरांच्या स्वर्गवासाची बातमी कानी आली. तेव्हा केवढ्या तरी आठवणींनी मनात गर्दी केली. सरांच्या खांद्यावरील वेगवेगळ्या आकर्षक झोळ्या आणि त्यांच्या उंच रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारे जब्बे नि झकास बूट अशा भावे सरांच्या भोवती मुला-मुलींचे घोळके गर्दी करत. त्यावेळी मुंबई दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. सर तेव्हाचे वरिष्ठ वृत्तनिवेदक होते. शब्दांच्या उच्चारांचा अभ्यास करण्यासाठी तेव्हा सरांच्या बातम्या मी नेहमी ऐकायचे. स्पष्ट उच्चार, शब्दांची फेक, खर्जातला भारून टाकणारा आवाज, हवे तिथे-हवे तितके वजन वापरून सादरीकरण या सरांच्या बातम्यांचा ठसा त्या काळात महत्वाचा होता. वर्गात शिकवताना सर कायम उभे राहून, मुलांमध्ये येऊन शिकवायचे. त्यांच्या सुस्पष्ट भाषेचा मनावरचा संस्कार कायम राहिला.
सर जातिवंत खवैये होते. पदार्थांबद्दल बोलताना सर इतके मनापासून बोलायचे, त्यांच्या चेहऱ्यावरचे तेव्हाचे भाव डोळ्यांसमोर स्पष्ट उभे राहतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने सुरू झाले की, सर एकदम खुशीत असायचे. वर्गात शिकवताना म्हणायचे, “अरे, पळा लवकर. मॅच पाहायची सोडून वर्गात काय करताय?’’ सर मुलांच्या जगात खूप रमायचे. छोट्या छोट्या मुलांना गाणी म्हणून दाखवणे, गोष्टी सांगणे हा त्यांचा जणू सर्वोच्च आनंदाचा भाग होता. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यिक असलेल्या भावे सरांच्या कवितांचे विश्व मनोहर आहे. माझी मुलगी बालवर्गात होती. सर एकदा तिच्या शाळेत आले नि सर्व छोट्या मुलांना त्यांनी खूप आनंद दिला. गाणी, गोष्टी सादर करतानाचे सरांचे विलोभनीय रूप अविस्मरणीय! कासव नि खारुताईवरच्या सरांच्या कवितांमधली गंमत मुलांना अचूक कळायची. कार्यक्रम संपल्यावरही मुले कविता गुणगुणत राहायची.
सुट्टीची आरती नावाची सरांची कविता मोठ्यांना देखील भुरळ पाडेल अशी आहे. ‘सुट्टी येते,’ ‘गाणे गाऊ सुट्टीचे’,’ सुट्टी तुला-सुट्टी मला’ अशा भावे सरांच्या कविता म्हणताना बालकवितांमधली मजा नेमकी समजते.
“ सुट्टी येते जशी पाहुणी
बोलत नाही, हासत नाही
कधी आली, कधी गेली ते
पुरतेपणी मज कळतच नाही”
रविवार आला की छोटे नि मोठे सर्वांनाच असे वाटते. आयुष्याबद्दल तक्रार न करता आनंद घेत जगायचा पाठ सर सहज शिकवत होते. उदास, निराश असे शब्द त्यांच्या शब्दकोषातच नव्हते. त्यांची बालकविता सांगत राहाते….
ही दुनिया आहे हसणाऱ्यांची
ही दुनिया नाही रडणाऱ्यांची
ही दुनिया खुळुखुळू रडणाऱ्यांची
नाही मुळुमुळू रडणाऱ्यांची.