पूर्णिमा शिंदे
शान तू, आन तू, शक्ती तू, भक्ती तू, निर्मिती तू, उत्पत्ती तू. तिच्या निर्मितीतून विश्व साकारते ती. परमेश्वरी शक्ती म्हणजे स्त्री. आजच्या युगातही ती मंगळावर पोहोचली. पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या चुलमूल चौकटी बाहेर कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या. सर्वच क्षेत्र तिने पादाक्रांत केली. अवकाशाला ही गवसणी घातली. ती मंगळावर गेली तिच्या कर्तृत्वाचे ध्वज तिने स्वयशाने फडकवले आणि तरीही तिला तिच्या अस्तित्वासाठी झुंजावे लागले. आताही लढावे लागतेय. तिच्यावर सातत्याने अन्याय, अत्याचार घडत गेले, घडत आहेत. आजही तिला पावलोपावली हे सहन करावे लागत आहे. अनेक गोष्टी बदलत गेल्या तरी आजही ती तिथेच आहे. तिचे स्वअस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध करूनही तिला झुंजावे लागते, लढावे लागते आणि ही झुंज जन्मोजन्मीची, पावलोपावलीची आहे. अत्यंत जिव्हारी लागते एक स्त्री म्हणून. कारण ती ही माणूसच आहे. तिलाही मन आहे, भावना आहेत. या माणुसकीची कधी चिरफाड होते तर कधी नैतिकतेची चाड नसते.आया-बहिणींना निर्वस्त्र केलं जातं कधी शब्दांनी, कधी हत्यारांनी, तर कधी अश्लील नजरेने, तर कधी दाहक स्पर्शांनी. हा शोषणाचा, अत्याचाराचा पाढा अधिकाधिक वाढतच चाललाय. सर्व क्षेत्रात क्रांती झाली. प्रगती झाली, परिवर्तन झाले पण याबाबतीत मात्र मन सुन्न करणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. परिवर्तनाची नांदी तिच्यात आहे. अमर्याद क्षमता, अमर्याद शक्ती तिच्यात आहे. पण तरीही सातत्याने साऱ्यांच्या मुळाशी चिरडली जाते भरडली जाते ती तीच असते! कधी दिल्लीची निर्भया, कधी हरियाणाची प्रियंका, तर कधी श्रद्धा वालकर होते तिची. ३८ तुकडे करणारा नराधम आणि त्याच्यावर निस्सिम प्रेम करणारी ही! काय म्हणायचं या नियतीला? या क्रौर्याला?
आपण आपल्या समाजाचा कितीही सुसंस्कृत रूप पाहिलंत. सुधारणा पाहिल्या तरी त्यामागे एक चेहरा असतो किळसवाणा! अश्लील असतात माणसं आणि रीतसर अगदी बेलगाम अलगद विसरले जाते ती “माणूस” आहे! आणि का नाही लक्षात येत, का नाही कळत की आपली जन्मदात्री आपली आई, बहीण, पत्नी, पुत्री ती… तिच्यातून निर्मिती उत्पत्ती होते तिच्यातूनच खरे तर तिच्या क्षमता शक्तीचा विचार केला तर ती “सबला”, स्वयंसिद्ध मर्दानी कणखर, रणरागिनी, शूर योद्धा, पराक्रमी पण तरी देखील तिला अबला, दुय्यम, नीच, गौण, उपभोग्य दासी अशी गणना केली जाते. वेळोवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीस्कर तिला कळसूत्री बाहुली बनवली जाते. स्वतःची निर्णय तिच्यावर लादले जातात. तिच्या त्या क्षमता असताना स्वतःची बुद्धी दृढनिश्चय असताना देखील तिला पंगू केले जाते. आपल्या हातची कळसूत्री बाहुली बनवून तिची सारी सूत्रे हातात घेतली जातात. तिचा हेतूपुरस्सर गैरफायदा घेतला जातो. तिचा सन्मान, मूल्य, आदर न करता पायदळी तुडवली जातात. तिला कस्पटा समान लेखून तिच्यावर नको नको ते आरोप- प्रत्यारोप, अन्याय-अत्याचार केले जातात.
कोलकत्यातील डॉक्टर युवतीची निर्घृण हत्या केली. अल्लड तरुण युवती प्रियंका चव्हाणची निष्पाप हत्या करण्यात आली. बदलापूरच्या चिमुकलीला नाहक छळ करून नराधमाने जीव घेतला. परवाच घडलेल्या स्वारगेटमधील एका महिलेवर दत्ता गाडेने केलेला अन्याय. सोशल मीडियावर स्वतःच्या पित्याने तिसऱ्या मुलीला पाळण्याच्या दोरीने गळ्याला गळफास देऊन ठार केले. किती अमानुषता… तीच आहे जन्मदात्री निर्मिती उत्पत्ती तिच्यातून. ती सबला, देवी, शक्ती, आहे. ती देवी स्वरूप लक्ष्मी, लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी, कार्य विजयालक्ष्मी, ऐश्वर्या लक्ष्मी, अन्नपूर्णा देवी, गृहलक्ष्मी या स्त्रीला आपण देवी मानतो, पुजतो पण क्षणार्धात या देवीची दासी होते! हे समाजाच्या लक्षात कसे येत नाही? या माणूस जनावरांना वेळीच सजा दिली तर निश्चितच हा अपमान टळेल आणि प्रत्येक स्त्रीला मानाचं स्थान मिळेल. घराघरांमध्ये आपल्या आजूबाजूला शाळा, कॉलेज, महाविद्यालय, सामाजिक स्थळे, रस्त्या-रस्त्यांवर वाहनांमध्ये काम करण्याच्या ठिकाणी कुठेही महिलांचं शोषण होत असेल तर आवाज उठवा ही काळाची गरज आहे. काल ती असेल, आजही असेल वेळेस सावध व्हा. स्वतः स्वतःचे संरक्षक बना चिरून टाका गळा अशांचा स्वसंरक्षणाची ढाल इतकी मजबूत करा की कोणतीही परकीय आक्रमणं चालून येणार नाहीत. आरे ला कारे म्हणायला शिका! तरच जगणं होईल. नाही तर या कोल्ह्या लांडग्यांच्या जगामध्ये तिच्या हक्कासाठी आजही तिला झुंजावे लागते, हे माहीत होतच! पण आता तिच्या जगण्यासाठी सुद्धा! तिच्या व्यथा, तिच्या कथा अशा महिलांना आपणही पुढे येऊन साथ देऊ. आठवण पाहा परिपाठातील शाळेतील नैतिक मूल्य स्त्री-पुरुष समानता. विचारा मनाला एक हात, त्याची साथ. गुंफुनिया सुर नवे, भिडवूया गगनाला.