Wednesday, March 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजफिरकीचा महान जादूगार !

फिरकीचा महान जादूगार !

उमेश कुलकर्णी

पॅडी शिवलकर किंवा पद्माकर शिवलकर हे आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी फिरकीपटू म्हणून जो मुंबई क्रिकेटवर आणि एकूणच क्रिकेटवर जो ठसा उमटवला आहे तो अद्वितीय आहे आणि त्याला आज तरी तोड नाही. शिवलकर हे कसोटी क्रिकेट खेळू शकले नाहीत. कारण त्यांच्या काळात बिशन सिंग बेदी आणि प्रसन्ना आणि चंद्रा असे एकापेक्षा एक महान फिरकीपटू भारताचे नाव उज्ज्वल करून होते. त्यांच्यामुळे भारताला दिग्गज संघांविरोधात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या संघांविरुद्ध विजय मिळत होता. त्यामुळे बेदी यांच्या विशाल वटवृक्षासमोर शिवलकर किंवा राजिंदर गोयल हे त्यांच्याइतकेच क्षमतेचे असूनही झाकोळले गेले. त्यामुळे त्यांना चान्स मिळू शकला नाही. हेच त्यांचे दुर्दैव होते. डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून शिवलकर यांचा लौकिक असामान्य होता. मुंबईतर्फे रणजी सामन्यात शिवलकरांचे रेकॉर्ड अप्रतिम आहे. त्यांनी १२४ रणजी सामन्यात ५८९ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यावेळी त्यांच्यासमोर रणजीतही असामान्य क्रिकेट खेळाडू होते. त्यामुळे त्यांचे हे रेकॉर्ड असामान्य आहे. त्यांच्यासमवेत आणि विरुद्ध खेळलेल्या अनेक महान क्रिकेटपटूंनी त्यांच्यासमोर क्रिकेट खेळणे किती अवघड होते हे लिहून ठेवले आहे. कित्येकांनी त्यांना क्रिकेटपटू म्हणून पाहणेही आमच्यासाठी एक आदर्श होता असे म्हटले आहे.

रवी शास्त्री याने लिहिले आहे की, पॅडीला तुमच्या संघात असताना तो किती महान आहे हे जाणवते. त्यांनी कसोटी क्रिकेट खेळले नसतील पण ते क्रिकेटचे महान सेवक होते या शब्दांत त्यांनी शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवलकर यांचे दिशा आणि टप्पा यांवर असामान्य नियंत्रण होते. याबद्दल अनेकांनी लिहिले आहे की, शिवलकर यांना वयाच्या ४८ व्या वर्षी दिलीप वेंगसरकर यांनी पाचारण केले आणि मुंबई क्रिकेटसाठी त्यांनी त्याही सामन्यात दोन बळी मिळवून दिले. ही असामान्य कामगिरी होतीच पण शिवलकर यांची चेंडूवरील असाधारण पकड आणि कितीही ओव्हर्स टाकल्या तरी न थकण्याची खुबी ही त्यात आहे. सुनील गावस्कर यांनी लिहिले आहे की, शिवलकर यांनी कसोटी क्रिकेट खेळले नाही पण त्यांच्यापेक्षा कितीतरी लोकांना कसोटी क्रिकेटच्या मांडवाखालून जाण्याची संधी मिळाली. सुजीत सोमसुंदर आणि दीप दासगुप्ता यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू आज कसोटीच्या मांडवाखालून गेले आहेत पण गोयल आणि शिवलकर यांना ते भाग्य मिळू शकले नाही. गावस्कर यांनी खंत बोलून दाखवली आहे की, मी कर्णधार म्हणून त्याना संधी द्यावी म्हणून निवड समितीला पटवून देऊ शकलो नाही. हा डावखुरा स्पिनर इतर कोणत्याही कसोटी क्रिकेट खेळलेल्या पेक्षा जास्त लायक होता. मुंबई क्रिकेटमध्ये त्यावेळी बेस्ट स्पिनर्स होते आणि त्यामुळेच शिवलकर आणि राजिंदर गोयल यांना संधी मिळू शकली नाही. कारण क्रिकेटच्या क्षितिजावर त्यावेळी फिरकी चौकडी तळपत होती आणि त्यामुळे राजिंदर गोयल असो किंवा शिवलकर यांच्यासारखा स्पिनर असो यांना संधी मिळाली नाही हे वास्तव आहे. शिवलकर यांचे रणजी क्रिकेटमधील रेकॉर्ड तर असामान्य आहेच. फक्त वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी १२४ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि त्यात ५८९ विकेट्स घेतल्या. हे रेकॉर्ड अद्वितीय आहेच. कारण आज रणजी सामन्यात किंवा कसोटी किंवा वनडेचा टिळा लागलेला एखादा कुणीही खेळाडू या रेकॉर्डवर दिवस काढून जातो. पण शिवलकर यांना ती संधी मिळाली नाही. कारण त्यांचा सामना बेदी आणि चंद्रा यांसारख्या फिरकी चौकडीशी होता.

१९६१-६२ ते १९८७-८८ पर्यंत ते रणजी सामने खेळत राहिले आणि त्या काळात मुंबईसाठी त्यांनी ३६१ विकेट्स घेतल्या. त्यात त्यांचा स्टॅमिना अफाट होता. कित्येक तासच्या तास ते चेंडू टाकू शकत असत. प्रथम श्रेणीत त्यांची सरासरी आहे ती केवळ १९.६० आज या सरासरीवर सामान्य क्रिकेटपटू कितीतरी सामने खेळून जातो. पण शिवलकर यांना तेही भाग्य लाभले नाही. शिवलकर हे असे गोलंदाज होते की, ज्यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज वाट्याला येत असे आणि त्याविरुद्ध गोलंदाजी करणे अवघड जात असे, पण शिवलकरांनी त्याविरोधात कधीही असंतोष दाखवला नाही आणि आपल्यावर सोपवलेले काम करत राहिले. वर्षानुवर्षे आणि त्याचे बक्षीस त्यांना मिळाले ते २०१७ मध्ये बीसीसीआयने लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवाॅर्ड देऊन, बीसीसीआयला आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्ज करण्याची संधी गमवावी वाटली नसणार आणि त्यामुळे त्यांना अखेरच्या क्षणी शिवलकर यांना पुरस्कार देऊन बीसीसीआयने आपल्याकडून झालेल्या अन्यायाचे परिमार्जन केले. पण शिवलकर यांनी खंत व्यक्त केली आहे ती म्हणजे त्यांना कसोटी क्रिकेटचा टिळा कधीही लागू शकला नाही. ही खंत घेऊनच ते वर गेले आहेत. त्यांनीच गायिलेले गीत यानिमित्ताने आठवते. ते चांगले गायकही होते. त्यांचे बोल असे होते हा चेंडू दैवगतीचा. तेच गाणे त्यांच्या जीवनाचे ठरले. या महान फिरकीपटूला मानाचा मुजरा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -