मृणालिनी कुलकर्णी
प्राचीन परंपरा लाभलेला ‘होळी’ हा भारताचा राष्ट्रीय सण असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. होळी सणाला होळीपौर्णिमा, होलिका दहन, शिमगा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. होलिकोत्सव मुख्यतः हिरण्यकशिपूच्या मिथकाशी आणि कृष्ण राधाच्या स्वर्गीय प्रेमाच्या कथेशी जोडलेला आहे. अग्नीत भक्त प्रल्हादला काहीही न होता दुष्ट, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या होलिकाचे दहन होते. याच होलिका दहनाने होलिकोत्सव सुरू होतो. ‘बुराईपर अच्छे की जीत’. वाईटावर चांगल्याच विजय हाच होळी सणाचा मुख्य उद्देश आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जाणारे होलिका दहन नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळी पेटवून (शेकोटी) आपण भगवान विष्णूंचा सन्मान करतो. अत्याचार, कपट यावरचा हा धार्मिक विजय होय. मार्च महिन्यातील होळी हा सण, मराठी महिन्यातील शेवटच्या फाल्गुन पौर्णिमेला येतो. पौर्णिमा संध्याकाळी चालू होत असल्याने तिन्ही सांजेला घराच्या अंगणात एक मोठी फांदी घेऊन भोवती जमा केलेल्या काटक्या, एखाद दुसरे लाकूड, गोवऱ्या रचून लावतात. मंत्रोच्चारांत पेटलेल्या अग्नीची होळीची पूजा करून, नारळ, पुरणपोळी आणि शेतकरी बांधव त्यांच्या शेतात उगवलेले नवीन पीक त्या होळीला अर्पण करतात. प्रत्येकाने स्वतःचा आळस, निराशा होळीत जाळून अंगी चांगले गुण यावे अशी प्रार्थना करावी. होळीच्या पेटलेल्या ज्वाला हवेतील अशुद्धता नष्ट करते. अग्नीच्या पूजेनंतर, पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा मारताना त्या ज्वाळाचे तेज आपल्या शरीरावर झळकते. त्याच रात्री दिल्या जाणाऱ्या शिव्याबाबत असे ऐकले, वाईट प्रवृत्ती बाहेर टाकण्याचा तो एक भाग आहे. तरीही ती प्रथा बंद व्हावी.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड. या नव्या दिवसांची सुरुवात वसंत ऋतूच्या आगमनाने होते. निसर्गात सर्वत्र झाडांना फुटलेली नवी पालवी, विविध फुलापानांच्या रंगानी, सुवासाने वातावरण आल्हादायक बनलेले असते. गुलमोहर, पांगारा, पलाश, कडुनिंब, हळद अशा काही फुलातून तयार केलेले नैसर्गिक रंग एकमेकांना लावून रंग उधळून होळी वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करते. हा आनंदोत्सव तोच रंगोत्सव (धुळवड).
निसर्गातील प्रत्येक रंग कशाचे तरी प्रतिनिधित्व करतो. जसे लाल रंग प्रेम आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक, हिरवा रंग पुनर्जन्म, वसंत ऋतू हा जीवनाच्या पुनर्जन्माचे प्रतीक! असा हा फुलणारा, बहरणारा वसंत ऋतू सर्वांच्या जीवनात यावा. होळी हा रंगांचा सण आहे. जुना राग, द्वेष, भांडण विसरून सारे अंगणात येतात. ‘बुरा ना मानो, होली है’ असे म्हणत एकमेकांना रंग लावत सारे रंगोत्सवात रमतात. असा हा ‘एकात्मतेचा संदेश देणारा होलिकोत्सव!’ अलीकडे होळी सण संध्याकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी संपतो. रंगोत्सवाची सुरुवात कृष्ण राधेच्या स्वर्गीय, निरागस प्रेमातून झाली. राधा गोरीपान ! कृष्ण सावळा. राधा आपल्याला स्वीकारेल का? ही कृष्णाची चिंता यशोदाने सोडवली. सुवासिक फुलांचे काही रंग कृष्णाने राधेला लावले. मग साऱ्या गोपगोपिकांत या रंगोत्सवाला सुरुवात झाली.(कृष्णपंचमी). हा रंगोत्सव राधा आणि कृष्णाच्या प्रेम आणि भक्ती या नात्याचे प्रतीक आहे. होळी सणाचे महत्त्व असे, ‘होळी हा सण प्रेमाचा, रंगाचा, वसंत ऋतूचा आणि एकात्मकतेचा सण आहे.
होळीशी निगडित छोट्या तीन गोष्टी.
१. लहान वयातील कृष्णाला गोपिका त्याला लागणार नाही अशी काळजी घेत लाडाने छडी मारत. ‘छडी मार होळी’!
२. बालपणातील पौराणिक कथेत बलराम कृष्ण या भावांच्या अतूट नात्यातील होळीचे काही प्रसन्न आहेत. जयपूर येथील श्रीकृष्ण बलराम मंदिर होळीला फुलांनी सजवतात.
३. कामदहन भगवान शंकरच्या ध्यानांत विघ्न आणणाऱ्या कामदेवाचे, भगवान शंकर तिसरा डोळा उघडताच कामदेव भस्मसात होतात. कामदेवाची पत्नी रती आपला पती जिवंत व्हावा म्हणून भगवान शंकराकडे प्रार्थना करते. रतीच्या चाळीस दिवसांच्या समाधीनंतर कामदेव जिवंत होतो. या आनंदप्रीत्यर्थ रंगाची होळी खेळतात. या घटनेकडे पाहता, वसंत पंचमीनंतर चाळीस दिवसांनी होळी येते.
शेतकरी होळी सणाला विशेष महत्त्व देतात. शेतात शिशिर ऋतूमुळे जमा झालेला पालापाचोळा जाळतात. कापणीचे दिवस असतात. होळीच्या दिवसात गव्हाचे पीक तयार होते. त्या गव्हाच्या ओळंब्या होळीच्या आगीत भाजतात. शेतात पिकलेल्या धान्याबद्दल शेतकरी देवाचे आभार मानतात. काही समाजात होळीच्या रात्री पारंपरिक वेष परिधान करून गाणी म्हणत नृत्य सादर करतात. हिवाळ्यात आळसावलेले शरीर ताजेतवाने होते. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या समजुतीनुसार होळी हा सण साजरा केला जातो. सध्या होळीसणाविषयी विशेष उत्साह दिसत नाही. त्याचे प्रमुख कारण लाकूड जाळणे, या सणाच्या दिवशी एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फुगे मारणे, त्वचेला अपाय होणारे रासायनिक रंग लावतात जे लवकर निघत नाहीत. होळीच्या रात्री दारू पिऊन शिवीगाळ करणे. थोडक्यात पूर्वीचा आपापसातला भाईचारा, निर्वाज्य प्रेमाची होळी न राहता अशीलतेकडे वळली आहे. अनेक ठिकाणी पाणी नसताना पाणी फुकट घालविणे सारेच चुकीचे आहे. होळी सण सर्वांना आनंद मिळण्यासाठी, सर्वांनी आचरणातून दाखवून द्यावे. येथे पालकांचा रोल महत्त्वाचा वाटतो. नैसर्गिक रंगाचा वापर, लाकडाऐवजी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या वापराव्यात. गोवऱ्या किडनाशक असून वातावरण शुद्ध करते. लाकडाची बचत होईल. देशी गाईचे महत्त्व वाढेल. जबरदस्तीने होळीसाठी कुणाकडे पैसे मागू नका, कुणाला रंग लावू नका ‘होळी दरवर्षी येते आणि सर्वांना रंग लावून जाते; लावलेला रंग निघून जातो, लक्षात ठेवा प्रेमाचा रंग राहतो.’ होलिकोत्सवाचे महत्त्व हेच आहे, शेवटी सत्याचा विजय होतो. चला, तर “असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवू या.’’
[email protected]