Sunday, May 11, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना नोटीस

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना नोटीस

जयपूर : बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे नोटीस जारी करण्यात आली आहे.जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाने या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत ही सूचना जारी करण्यात आली आहे.पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी या कलाकारांवर आधीच बरीच टीका झाली आहे. आता हे तिघेही या प्रकरणाबाबत कायदेशीर अडचणीत अडकले आहेत.


जयपूरचे रहिवासी योगेंद्र सिंह यांच्या तक्रारीवरून आयोगाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा आणि सदस्या हेमलता अग्रवाल यांनी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांनी 'विमल पान मसाल्या'ची जाहिरात केली आहे जी 'बोलो जुबा केसरी' या टॅगलाइनसह येते. या जाहिरातीत असा दावा केला आहे की, पान मसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केशर असते. जाहिरातीत तिन्ही कलाकार 'दाने-दाने में केसर का दम' असे म्हणताना दिसतात.त्यांनी असेही सांगितले की, या तिन्ही अभिनेत्यांना मोठी चाहतावर्ग आहे आणि अनेक तरुण त्यांना रोल मॉडेल मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा भ्रामक प्रचाराची अपेक्षा करता येत नाही.


याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, केशराची किंमत लाखो रुपये प्रति किलो असते, तर या पान मसाल्याची किंमत फक्त 5 रुपये आहे. त्यामुळे या उत्पादनात केशर असणे तर दूरच, त्याचा सुगंधही शक्य नाही. शिवाय, असे पदार्थ कॅन्सरला प्रोत्साहन देतात, त्यामुळे या जाहिरातीवर त्वरित बंदी घालावी.


या प्रकरणाची सुनावणी १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. आयोगाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, या तिन्ही अभिनेत्यांना ३० दिवसांच्या आत आपली बाजू मांडावी लागेल.

Comments
Add Comment