Share

माेरपीस : पूजा काळे

जवळपास महिनाभर आधी महिलादिनाचं शिंग फुंकलं जातं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भेटीगाठी, पुरस्कृत, सत्कार, उल्लेखनीय पुरस्कार, समारंभ ते पैठणी जिंकण्याचा मान कोणाच्या पदरात पडणार? सगळे पत्ते असे काही लागलेले असतात की, एक नवरात्र सोडली तर, आठवड्याच्या साड्यांची घडीमोड याचं दिवसात व्हावी, हे या दिवसाचं खास वैशिष्ट्य. मुंबईची नाडी म्हणून ओळखली जाणारी जीवनदायीनी अर्थात लेडीज स्पेशल लोकलची गोष्ट काहीशी अशीच. गेल्या दहा-बारा वर्षांत वेगवेगळ्या पातळीवर महिलांच्या मान-सन्मानाचा उच्चांक पाहता, लेडीज स्पेशलची वर्णी आनंदाची म्हणावी लागेल. एक पाऊल तुझं, एक पाऊल माझं या प्रकारची मानसिकता सांभाळणाऱ्या स्त्री- पुरुष वर्गाचं कौतुकं करावं तेवढं थोडं. स्त्री आणि पुरुष समाजाची दोन चाकं असल्याने दया, क्षमा, शांती गुणातीत परीपूर्ण अशी ती काळाला मागे सारते. आव्हानांना सज्ज होते. तिच्यासाठी उन्नत्तीचे दरवाजे खुले होतात. त्यातलाचं एक दरवाजा लेडीज स्पेशल लोकलचा. कंपार्टमेंटमधल्या दरवाजातून कर्तव्याच्या जाणिवा बाळगत आत गेलेल्या, ललना ज्यांच्या भविष्याची स्वप्न वर्तमानाच्या मेहनतीने भरली आहेत. या मेहनतीला न्याय देणारी आपली महिला लोकल जगात विशेष गाजतेय. याचा अर्थ एकविसाव्या शतकातील स्त्री हुशार, कर्तबगार, स्वतंत्र, काळजीवाहक, सर्वसमावेशक सांगड घालताना दिसते. जी गोष्ट लढवय्या स्त्रीची तीच गोष्ट मुंबईची जीवनदायीनी लेडीज स्पेशलची. जी कुणाला नवीन नाहीय. त्यात स्थानापन्न असतात मुंबईच्या राण्या. मागून दुसरा, पुढून पाचवा, फस्ट क्लासच्या शेजारचा किंवा गार्डच्या मागचा याप्रमाणे प्रत्येकीचा डबा ठरलेला असतो. फलाटावर रेंगाळत बसलेल्या बघ्या लोकांची गर्दी महिला स्पेशल लोकलला उत्सुकतेने कुर्निसात घालते. हे आपलं माझं माझं निरीक्षण हो! कशाला म्हणून काय विचारतायं? मी ही त्याचं महिला लोकलची प्रवासी आहे. काय म्हणता! कोणाला वेळ आहे एवढं पाहायला? हा समज लेडीज स्पेशल लोकलला सपशेल बाद आहे! घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या, धडधडणाऱ्या डब्यांना, स्त्री मनाच्या रंगाची लागण केव्हाच झालीय. गुणांच्या कमानीवर यशाचं शिखर गाठणारी क्षणाची पत्नी अन् अनंत काळची माता असलेली ती, लोकल प्रवासाचे अनुभव घेत, परिणामांना तोंड देते. कुटुंबाचे भवितव्य सांभाळतं भरारी घेते.

दहिसरहून वळणं घेत येणारी १०.२२ बोरिवली चर्चगेट स्पेशल लांबूनच भारी वाटते. विरारहून भरून आलेल्या लोकलची तुम्ही वाट पाहत असता, एखादं वेळी तिचं तुमच्यासाठी थांबवते सिग्नलला. धावत येणाऱ्या बायका पाहून काही सेकंद गार्डला देखील लोकल सोडाविशी वाटत नाही. म्हणजे काय? एक लोकल सुटली तर, वेळेची गणितं बिघडतात ना राव…! भरीस भर म्हणून पुढची लोकल मिळेपर्यंत, तीत चढायला मिळेपर्यंत काही खरं नसतं. गाड्या उशिरा धावू लागल्या की, मनगटावरच्या घड्याळासकट होणारी तगमग म्हणजे कामावर लेटचा मार्क. आई गं… आजही लेटमार्क. साहेबाला काय बोलायला… ट्रेनने ये म्हणावं! अशावेळी फुकट प्रसाद वाटला जातो मग त्याचे धनी आपले नवरे, आपल्या सासवा, कामवाली बाई, रिक्षावाला, रस्त्यातले खड्डे, गार्ड कोणीही असू शकतं, हे असं थोडबहुत चालतचं. १०.२२ लोकल म्हणजे माझी प्रिय सखी. माझ्याप्रमाणे इतर बायकांचाही जीव की प्राण. पंधरा डब्यात सामावलेलं अंतर्बाह्य जग ते. एक-दीड तासांच्या प्रवासातल्या डब्याच्या, बसण्याच्या जागा कायम असल्या तरी दरदिवशी येणारे अनुभव वेगळे असू शकतात. बायकांचं बोलणं हा विषय आपल्यापैकी कुणाला नवा नाही. त्यामुळे महिला स्पेशल खळाळणारा हशा, टाळ्यांचा खदखदणारा लाव्हाचं जणू. फलाटावर लोकल लागताचं वरून शांत दिसणाऱ्या डब्यात ऐकू येतो आतला कल्लोळ.

राधा, सीमा ये, ये, पटकन बस, ती विंडोवाली अंधेरी आहे तिला विचार. चौथ्या सीटवर जागा होईल बघ, काय मेली वेंधळी आहे जोरात पाय दिला पायावर. गीता नवीन पर्स? कुठे घेतली? मस्त आहे गं… मीना, आज ना मी ढोकळा आणलाय, कामवाली बाईचं आलीचं नाही. काय ! तू पन्नाशीची वाटत नाहीस? पुढची स्टेशन गाठणाऱ्या लोकल सोबत सळसळता दांडगा उत्साह पुढे सरकत असतो. थंड वाऱ्याच्या झुळकी सरशी जागरण, अपुऱ्या झोपेमुळे एखादीला डुलकी लागते. कोण वाचनात रममाण तर कोण मोबाईलमध्ये व्यस्त. वेळ काढायला गाण्याच्या भेंड्या असतातचं सोबत नाचगाणी रंगतात, एकीकडे चढायची घाई तर दुसरीकडे, उतरण्याची गडबड. वेफर्स, गोळ्या, चॉकलेट, मिठाया, भेळ, समोसा, फरसाण इत्यादींच्या आदानप्रदानात हसण्या-खिदळण्याच्या नादात स्टेशन्स भुर्रकन निघून जातात आणि पंधरा डब्यांतल्या बायकांचं चालतं-बोलतं विश्व फलाटावर उभ्या असलेल्यांच्या माना वळवायला भाग पाडतात. सुखदुःखाच्या प्रसंगात एकत्रित येत समजुतीच्या दोन-चार गोष्टी शेअर केल्या जातात. टिकली ते ड्रैस, मुलांचा डबा, शाळा-कॉलेज, नवरोबाची ट्रान्स्फर, सासऱ्याचं आजारपण, लग्नाचा वाढदिवस, घेतलेला नवीन आयफोन, समोरच्या सीटवरची उद्धट मुलगी, नणंदेने दिलेली नवी कोरी साडी, खडूस साहेब, वाढीव पगार, शिल्लक रजा, बँक हॉलिडे म्हणायला भरपूर विषय असल्याने चालता-बोलता रेडिओ घेऊन महिला स्पेशल धावत असते रुळावर. जलद ट्रॅकवर धावणारी गतिशील लोकल वाढवते महिलांची सकारात्मकता. तीत चढणारे प्रवासी सहप्रवासी देतात स्वयंप्रेरणा. पोटापाण्यासाठी गाडीतही घडतात व्यवहार. पोराला पोटाशी बांधून काहीबाही विकणाऱ्या बायकांमध्ये आढळते जगण्याची उमेद. तिला मदत म्हणून आम्ही विकत घेतो दोन-चार गोष्टी. आवडीनिवडी कोपऱ्यात सारून बसलेली, स्वत:ला वेळ न देणारी ती, या मुक्त प्रवासात आनंदी असते. हळदीकुंकू, वाढदिवस, पार्ट्या, सहली, नवरात्र, रंगपंचमी या उत्सवांनी लोकल रंगते. हाय-बाय, कशी आहेस ने झालेला संवाद संध्याकाळला भाजी कोणती करावी इथंपर्यंत पोहोचतो.

टाइपरायटरच्या बटणाप्रमाणे सहस्रांदी विचार बाई नामक यंत्रात लोकलमधल्या विविध डब्यात एकाचवेळी दिसून येतात. हा चमत्कारचं म्हणायला हवा. लोकलच्या असण्या-धावण्यावर आपलं जगणं, हसणं सामावून जातं. एकमेव सखी म्हणून सुखदु:ख वाटून घेणाऱ्या महिला स्पेशलची खासियत चकित करणारी असते. आपल्या आयुष्यात वगळता न येणारी माणसं जशी असतात, तशीचं वगळता न येणारी १०.२२ बोरिवली चर्चगेट महिला स्पेशल लोकल. पर्यायाने कामासाठी दुसरा दिवस गाठणं महत्त्वाचं असल्याने लोकल आणि महत्त्वाकांक्षी महिला वर्गाचं नात दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जातं. हिरा जो वही, अंधेरी मे भी चमकता है… ओर अपनी निशान छोड जाता है. तसाचं काहीसा परिचित, हक्काची माणसं सोबत घेऊन केलेला प्रवास कायम स्मरणात राहतो. दुसऱ्या दिवशी नवऊर्जा घेतलेली मी सुद्धा वाट पाहत फलाटावर उभी असते १०.२२ लेडीज स्पेशलची.

Recent Posts

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

4 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

12 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

49 minutes ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

1 hour ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

1 hour ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

3 hours ago