Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाने रचला इतिहास, जिंकला चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब

ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाने रचला इतिहास, जिंकला चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब

दुबई: दुबईच्या मैदानावर टीम इंडियाने इतिहास रचला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनल सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवत खिताब पटकावला आहे. न्यूझीलंडने फायनल सामन्यात भारताला विजयासाठी २५२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताने हे आव्हान बॉल राखत तसेच ४ विकेट राखत पूर्ण केले.


भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने सगळ्यात आधी २००२मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा त्यांनी श्रीलंकेसह संयुक्तपणे खिताब जिंकला होता. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने इतिहास रचला आहे.



रोहितची तुफानी खेळी, श्रेयस-राहुलची संयमी खेळी


लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान रोहित शर्मा आक्रमक अंदाजात दिसला. रोहितने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ ४१ बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली. गिलने १ षटकाराच्या मदतीने ५० बॉलमध्ये ३१ धावा केल्या. यानंतर विराट कोहलीने स्वस्तात विकेट गमावली. त्याने केवळ १ धाव केली.


त्यानंतर संघाने रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने ८३ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. यात सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद १२२ होती. रोहित बाद झाल्यानंतर अक्षऱ पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला सांभाळले. श्रेयसने ६२ बॉलमध्ये ४८ धावा केल्या. तर अक्षर पटेलने २९ धावांवर आपली विकेट गमावली.


तत्पूर्वी, न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या.


न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने यादरम्यान ३ षटकार ठोकले. तर मिचेल ब्रासवेलने नाबाद ५३ धावा ठोकल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली होती. संघाचे अर्धशतक झालेले असताना त्यांनी पहिला विकेट गमावला. त्यानंतर दोन विकेट झटपट गमावल्यानंतर न्यूझीलंडने सावरले. डॅरेल मिचेलने डाव सावरला. एकीकडे विकेट पडत होत्या. मात्र डॅरेल मिचेल आणि ब्रासवेलने संयमी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

Comments
Add Comment