एक सुचवू का...

राजश्री वटे


जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीत आहे, कसा मार्ग काढावा सुचत नाही आहे त्यावेळी प्रत्येकजण हे वाक्य बोलत असतो...
‘एक सुचवू का’... या वाक्यात अनुभवही असू शकतो, मीच किती हुशार असेही असू शकते किंवा मी सुचवतो ते ऐक...!
अडचण राहते बाजूला, सल्लेच जास्त मिळतात व प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर व माझंच ऐकावं... वेडं करून सोडतात त्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला! मार्ग तर सापडतच नाही पण गोंधळ उडतो फार... काय करावं... कोणाचं ऐकावं... डोकं पिसाळून जातं. असे आपल्याभोवती अनेक सल्लागार वावरत असतात. त्यांना संधीच पाहिजे असते, एखादी व्यक्ती विचारात दिसली की, खोदून खोदून विचारायचं व उपाय म्हणून सल्ले द्यायचे, सल्ले द्यायचे म्हणजे फुशारक्या! मी असा सल्ला दिला, माझं ऐकलं म्हणून किती बरं झालं वगैरे... स्वतःची पाठ थोपटून घेतात. सल्ला द्यायला काही लोकांना फारच आवडतं... सल्ला देतात मोठेपणानी... पण खात्री नसते या सल्ल्याने काय होईल... म्हणून वर म्हणायचे मी तर सांगितलं बाबा, पण तुझं तू ठरव! म्हणजे सल्ला कामी नाही आला व त्यात काही चुकलं तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटू नये याची सुद्धा काळजी घेतली जाते बरं का...!


असे सल्ले मिळण्याचे अनेक मार्ग आहेत फक्त व्यक्ती सापेक्षच नव्हे... अभंग, कविता, लेख, समुपदेशक यांच्या वाचण्या ऐकण्यातून कधीकधी आपल्या मनातल्या प्रश्नांवर तोडगा सापडतो... मार्ग निघतो तर हा सुद्धा एक आडवळणांनी मिळणारा सल्लाच समजायचा... अध्यात्मिक वाचनातून मिळणारे सल्ले हे आपल्या रोजच्या जीवनपयोगी सल्ले ठरतात व आपण ते स्वतःला पटवून देतो की हां हे बरोबर आहे. पण हाच सल्ला कोणी द्यायचा प्रयत्न केला की, आला मोठा शहाणा असे म्हणून धुडकावून लावले जाते, पण स्वतःचा इगो जोपासण्यात चांगले सल्ले पण पटवून घेतले जात नाही व कित्येकदा नुकसान होऊन बसतं!


माझं ऐकलं, मी सल्ला दिला, असा मोठेपणा मिरवायला पण फार आवडतं काही जणांना... त्या दिलेल्या सल्ला समोरच्याने अमलात आणला व त्याचा फायदा झाला...पण... त्याने सल्ला देणाऱ्या जवळ कृतज्ञता व्यक्त केली नाही तर केवढा अपमान झाल्याचा फील येतो की ज्याचं नाव ते!... ज्याचं करावं भलं... असे डायलॉग निघतात तोंडातून... कशाला गेलो मी लष्कराच्या भाकरी भाजायला... असं ही ऐकवलं जातं! कधी सल्ला दिला अन् तो ऐकला नाहीतर मग तो जळफळाट विझवायला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज पडते.


म्हणून सल्ला विचारू नये व सांगूही नये विचारल्याशिवाय... कधी हे सल्ले फायद्याचे असतात तर कधी धोक्याचे! म्हणून सल्ले देण्या-घेण्याच्या भानगडीत पडूच नये... कोणी दिलाच तर... ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे... शेवटी विजय होतो... मनाच्या श्लोकाचाच!

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले