
राजश्री वटे
जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीत आहे, कसा मार्ग काढावा सुचत नाही आहे त्यावेळी प्रत्येकजण हे वाक्य बोलत असतो...
‘एक सुचवू का’... या वाक्यात अनुभवही असू शकतो, मीच किती हुशार असेही असू शकते किंवा मी सुचवतो ते ऐक...!
अडचण राहते बाजूला, सल्लेच जास्त मिळतात व प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर व माझंच ऐकावं... वेडं करून सोडतात त्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला! मार्ग तर सापडतच नाही पण गोंधळ उडतो फार... काय करावं... कोणाचं ऐकावं... डोकं पिसाळून जातं. असे आपल्याभोवती अनेक सल्लागार वावरत असतात. त्यांना संधीच पाहिजे असते, एखादी व्यक्ती विचारात दिसली की, खोदून खोदून विचारायचं व उपाय म्हणून सल्ले द्यायचे, सल्ले द्यायचे म्हणजे फुशारक्या! मी असा सल्ला दिला, माझं ऐकलं म्हणून किती बरं झालं वगैरे... स्वतःची पाठ थोपटून घेतात. सल्ला द्यायला काही लोकांना फारच आवडतं... सल्ला देतात मोठेपणानी... पण खात्री नसते या सल्ल्याने काय होईल... म्हणून वर म्हणायचे मी तर सांगितलं बाबा, पण तुझं तू ठरव! म्हणजे सल्ला कामी नाही आला व त्यात काही चुकलं तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटू नये याची सुद्धा काळजी घेतली जाते बरं का...!
असे सल्ले मिळण्याचे अनेक मार्ग आहेत फक्त व्यक्ती सापेक्षच नव्हे... अभंग, कविता, लेख, समुपदेशक यांच्या वाचण्या ऐकण्यातून कधीकधी आपल्या मनातल्या प्रश्नांवर तोडगा सापडतो... मार्ग निघतो तर हा सुद्धा एक आडवळणांनी मिळणारा सल्लाच समजायचा... अध्यात्मिक वाचनातून मिळणारे सल्ले हे आपल्या रोजच्या जीवनपयोगी सल्ले ठरतात व आपण ते स्वतःला पटवून देतो की हां हे बरोबर आहे. पण हाच सल्ला कोणी द्यायचा प्रयत्न केला की, आला मोठा शहाणा असे म्हणून धुडकावून लावले जाते, पण स्वतःचा इगो जोपासण्यात चांगले सल्ले पण पटवून घेतले जात नाही व कित्येकदा नुकसान होऊन बसतं!
माझं ऐकलं, मी सल्ला दिला, असा मोठेपणा मिरवायला पण फार आवडतं काही जणांना... त्या दिलेल्या सल्ला समोरच्याने अमलात आणला व त्याचा फायदा झाला...पण... त्याने सल्ला देणाऱ्या जवळ कृतज्ञता व्यक्त केली नाही तर केवढा अपमान झाल्याचा फील येतो की ज्याचं नाव ते!... ज्याचं करावं भलं... असे डायलॉग निघतात तोंडातून... कशाला गेलो मी लष्कराच्या भाकरी भाजायला... असं ही ऐकवलं जातं! कधी सल्ला दिला अन् तो ऐकला नाहीतर मग तो जळफळाट विझवायला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज पडते.
म्हणून सल्ला विचारू नये व सांगूही नये विचारल्याशिवाय... कधी हे सल्ले फायद्याचे असतात तर कधी धोक्याचे! म्हणून सल्ले देण्या-घेण्याच्या भानगडीत पडूच नये... कोणी दिलाच तर... ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे... शेवटी विजय होतो... मनाच्या श्लोकाचाच!