दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या कठोर परिश्रमामुळे आज भारतातील महिला शिकल्या. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू लागल्या. रिक्षा चालवण्यापासून ते थेट लढाऊ विमान चालवण्याइतपत महिला आज सक्षम झाल्या आहेत. ती सुद्धा एक पत्नी, आई आणि रोजंदारीवर काम करणारी महिला आहे. पण त्याचसोबत आज तिची ओळख पीएच. डी. धारक आहे. ही उल्लेखनीय कहाणी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एका महिलेची आहे, जिने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका योद्ध्याप्रमाणे तिच्या आयुष्यात अनंत अडचणींचा सामना केला. गरिबीसारख्या आव्हानांना न जुमानता, तिने रसायनशास्त्रात पीएच. डी. मिळविण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. ही प्रेरणादायी गोष्ट आहे, डॉ. साके भारती यांची.
साके भारतीची कहाणी खूपच विलक्षण आहे. साके मूळची अनंतपूर जिल्ह्यातील नागुलागुद्दम गावातील रहिवासी. साकेला तीन बहिणीच होत्या. त्यामध्ये साके सर्वांत मोठी. आपल्याला तिन्ही मुलीच आहेत याची तिच्या बाबांना नेहमीच खंत वाटे. ते दारू पिऊन यायचे आणि मुलगा न झाल्याबद्दल साकेच्या आईला मारहाण करायचे. साके हे पाहायची. तिचे बाबा तिला सुद्धा अद्वा तद्वा बोलायचे. साकेच्या मनावर याचा कळत नकळत परिणाम होत होता. मात्र साकेला मोठा आधार होता तो तिच्या आजोबांचा. त्यांच्या पाठिंब्यामुळे साकेला शाळेत जाता आले. बारावीपर्यंत शिकता आले. दुर्दैवाने साके शिकत असतानाच तिचे आजोबा निर्वतले. बारावीनंतर साकेचे लग्न तिच्या मामाशी झाले. भारताच्या बहुतांश भागात काही समाजामध्ये आज देखील अशाप्रकारे जवळच्या नात्यामध्ये लग्न होते.
सुदैवाने साकेचे पती-पती शिवप्रसाद हे तिच्यासाठी मोठा आधार ठरले. त्यांनी साकेला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे महिला कष्ट आणि गरिबीतून बाहेर पडू शकतात, असं शिवप्रसादचं म्हणणं होतं. शिवप्रसाद स्वतः दहावी नापास आहे. बायकोला शिकवतोय म्हणून शिवप्रसादला नातेवाइकांची, समाजाची बोलणी खावी लागली. ‘बायकोला एवढं शिकवून काय फायदा, शेवटी चूल अन् मूल पाहायचं आहे.’ असे अनेक जण बोलायचे. शिवप्रसादने त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केले. साकेला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आपण नेहमी सोबत असू हे वचन शिवप्रसादने खरे करून दाखवले.
मात्र शिक्षण पूर्ण करायचे म्हणजे पैसे लागणार. इथे मूलभूत गरजा भागवतानाच नाकीनऊ यायचे. मात्र शिवप्रसाद आणि साकेने कंबर कसली. आत्यंतिक गरिबीसोबत दोन हात करण्याची त्यांनी तयारी केली होती. साके सकाळी पहाटे लवकर उठून घरातील कामे आटोपायची. त्यानंतर शेतमजूर म्हणून शेतात राबायची. त्यानंतर ३० किलोमीटर कधी बसने तर कधी रिक्षाने प्रवास करत तर काही वेळेस पायी चालत ती कॉलेजला जायची. पुन्हा घरी येऊन जेवण बनवून घरातील कामे आटोपून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसायची. बहुतांश वेळेस एक दिवस आड कॉलेजला जायची. कारण जाण्यासाठी पैसेच नसत. अनेकवेळा अनुपस्थित राहण्याचे कारण दाखवण्यासाठी तिने वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे. उदरनिर्वाहासाठी ती रोजंदारीवर काम करत होती. तिचे अपूर्ण घर, जे तिने आणि तिच्या पतीने त्यांच्या बचतीतून बांधले होते, ते तिच्या वेदना, संघर्ष आणि क्लेशांची साक्ष देते. घर बांधण्यासाठी अनेकवेळा त्यांनी एक वेळ उपाशीपोटी राहून पैशाची बचत केली होती.
वर्षानुवर्षे केलेले कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे फळ मिळाले. साकेने अखेर तिचे पदवी पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले. पदव्युत्तर पदवी वर्गात शिकत असताना तिने चिमुकल्या मुलीला जन्म दिला. बाळंतपण, मुलीचा सांभाळ करत पदव्युत्तर पदवी मिळवली. पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर, शिवप्रसाद यांना तिने डॉक्टरेट पदवीसाठी प्रवेश घ्यावा असे वाटत होते. सहा वर्षे, साके हिने बायनरी द्रव मिश्रणांवर संशोधन करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यानंतर भल्याभल्यांना न जमणारे काम तिने केले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एम. अब्दुल नजीर यांनी ‘बायनरी लिक्विड मिश्रण’ या विषयातील संशोधनासाठी तिला पीएच.डी. प्रदान केली. साकेने अखेरीस श्री कृष्णदेवराय विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. मिळवली. भारतीला पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी जवळजवळ सात वर्षे लागली. साके तिच्या प्राध्यापिका डॉ. एमसीएस शुभा आणि त्यांच्या पतीचे आभार मानते. कारण त्यांनी तिला श्री कृष्ण देवराज विद्यापीठात पीएच.डी. कार्यक्रमात प्रवेश दिला आणि दररोज कॉलेजला जाण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केली.
डॉक्टरेट मिळवूनही साके नोकरीच्या शोधात आहे. अजूनही नोकरी शोधण्याचे आव्हान आहे. पात्रता असूनही, रिक्त जागा निर्माण झाल्यावर साके भारतीला स्थानिक महाविद्यालयात नोकरी मिळवू शकल्या नाहीत. जगन्ना कल्याणकारी योजनेअंतर्गत तिने स्थानिक आमदाराकडे घराची विनंतीही केली; परंतु आतापर्यंत तिला काहीही मिळालेले नाही. डॉ. साके भारती यांचे पती शिवप्रसाद म्हणतात, “नोकरी हे अंतिम ध्येय असू शकते, पण ते पूर्णपणे आपल्या हातात नसते. जर तिला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली तर ते स्वप्न पूर्ण होईल. जर नाही मिळाली तर आपण शिक्षणाला स्वतःचं एक ध्येय मानतो.” साके आपल्या मुलीला डॉक्टर बनवू इच्छिते. तिची मुलगी सध्या अकरावीत शिकत आहे. डॉक्टर बनून आपल्या मुलीने गरिबांची शुश्रूषा करावी अशी साकेची इच्छा आहे.साकेची कहाणी सुफळ संपूर्ण झालेली नाही. मात्र तिने हार मानली नाही. तिचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरक उदाहरण आहे. ती आपल्याला आठवण करून देते की, आयुष्यात कितीही अडथळे आले तरी आपण कधीही आपली स्वप्ने आणि आकांक्षा सोडू नयेत. साके खऱ्या अर्थाने सावित्रीमाईचा वारसा जपत आहे.