पूनम राणे
गोष्ट आहे २०१४ सालातील. वृत्तपत्र वाचत असताना, अशी पाखरे येती, अन् स्मृती ठेवुनी जाती… या कार्यक्रमाचे बोरिवली येथील रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी रात्री नऊ वाजता आयोजन करण्यात आले होते. ही बातमी वाचताच, आनंद गगनात मावेनासा झाला. ताबडतोब मोबाईलवर दोन तिकिटे बुकिंग केली. कार्यक्रमाचा दिवस जवळ आला. पुष्पगुच्छ घेऊन कार्यक्रमाला मी व माझा मुलगा हजर राहिलो. स्टेजच्या जवळच दुसऱ्या रांगेत बसून संगीताचा कार्यक्रम पाहत होतो. ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाला जायचे ठरले होते, ते पहिल्या रांगेतच बसले होते; परंतु उठून जाऊन त्यांना भेटणे प्रशस्त वाटत नव्हते. मध्यंतरानंतर ते स्टेजवर आले. आता आपली भेट होणार नाही. या भावनेने जीव व्याकुळ होत होता. काय करावे? कळत नव्हते. क्षणात विचार आला, इतक्या महान व्यक्तीला देण्यासाठी पुष्पगुच्छ आणला आहे. तो कसा द्यावा?” ‘‘सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मला हा पुष्पगुच्छ मंगेश पाडगावकर यांना द्यायचा आहे. कृपया परवानगी मिळावी.” असे एका कागदावर लिहून कागद संयोजकांकडे दिला आणि काय, आश्चर्यच! क्षणार्धात नाव पुकारले गेले. बेभान होऊन स्टेजच्या दिशेने चपळाईने धावत सुटले. मंगेश पाडगावकरांच्या चरणावर नतमस्तक झाले. हे पाहून पाडगावकर सर म्हणाले, ‘‘पहिल्यांदा असा नमस्कार करताना मी माझ्या एका वाचकाला पाहतो आहे.” मला याचे कारण कळेल का? असे म्हणून त्यांनी माईक माझ्या हातात दिला.
कुकरमधून दबलेली वाफ बाहेर यावी, याप्रमाणे भावना व्यक्त होत होत्या. “ग्रंथ कोंडून ठेवू नका, सुरक्षित कपाटात, नको पहाऱ्यावर, तुसड्या चेहऱ्याचे रखवालदार, जिथे ग्रंथ कोंडले जातात, तिथे राष्ट्र कोंडले जाते, कपाटांच्या कबरीत, गाढले जातात विचारांचे मुडदे” “ग्रंथपाल हसतो तेव्हा, ग्रंथालय होते एक फुलबाग, न कोमेजणाऱ्या, असंख्य फुलांनी बहरलेली”
ग्रंथ या आपल्या कवितेत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. बॅचलर ऑफ लायब्ररीयनची पदवी घेताना १०० मार्कांचा एक उपक्रम असतो. त्यासाठी मी मंगेश पाडगावकर या कवींच्या पुस्तकांची निवड करून कवितांची सूची तयार केली. सरांना पत्रही लिहिले होते. पत्रात त्यांना भेटायची इच्छाही व्यक्त केली होती. घरी फोन करून भेटायचं आहे असंही सांगितलं होतं; परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने भेटणे शक्य नाही, असा निरोप मिळत होता. पण वृत्तपत्रामुळे या महान व्यक्तीची भेट घडली. प्रोजेक्ट करताना माहीत नाहीत, अशा कितीतरी कविता, गाणी, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलीत. याचे नवल वाटले आणि आज, प्रत्यक्ष भेटीचा दिवस ठरला. म्हणतात ना, जबरदस्त इच्छाशक्ती असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. कोणतीही गोष्ट वेळेआधी प्राप्त होत नाही. हेच खरे.
बोलगाणी या काव्यसंग्रहातील अप्रतिम कविता आजही रसिकांच्या ओठावर आहेत. धारानृत्य, जिप्सी, सलाम, गझल, भटकेपक्षी, उत्सव असे अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. ‘जिप्सी आणि छोरी, या काव्यसंग्रहाला राज्य पुरस्कार लाभला. सलाम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या रचना ऐकताना शब्द, भाव, अर्थ, सूर, ताल यांचा अप्रतिम संगम असलेला जाणवतो.
“माझ्या वर्गात एक वाघ असतो,
माझ्याच मागच्या बाकावर बसतो,
आमचे हेडमास्टरसुद्धा त्याला घाबरतात,
वर्गाच्या बाहेर राहून दुरूनच पाहतात”
यासारख्या अनेक बालकांना आवडणाऱ्या बाल कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
“अशी पाखरे येती, अन् स्मृती ठेवुनी जाती”…
या उक्तीनुसार, आज पाडगावकर आपल्यात नाहीत, मात्र लेखणी रूपाने प्रसवलेले त्यांचे शब्दधन त्यांचे विस्मरण कधीही होऊ देणार नाहीत.