मुंबई (सीमा पवार) : चार भितींनी तयार झालेलं घर, बंगला, वाड्याला जेव्हा आकर्षक पडद्यांनी, बेडवर टाकलेल्या बेडशीटने ते घर सजतं तेव्हा ते घर सजून परिपूर्ण होतं. विशेषत: घरातील सगळ्यात महत्वाचं बेडरूम. जिथे असलेल्या बेड आणि त्यावर असलेली ती मऊसूज बेडशीटचा स्पर्श आपला दिवसभराचा आलेला क्षिणभाग दूर करते, हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकांचा आपल्या बेडरूमला सजवण्याचा प्रयत्न असतो. कारण हीच तर जागा असते जिथे आपण आपला दिवसभराचा सारा लेख जोखा मांडतो. त्यामुळे या व्यवसायाकडे अशाच दृष्टिकोनातून पहाणाऱ्या विनीता यांनी महिलांच्या पसंतीचा अधिक विचार करताना गृहसजावटीतील या महत्वाच्या बेडशीटचा व्यवसाय करण्याचे ठरविले. या व्यवसायात एक महिला म्हणून पदार्पण करताना त्यांना अनेक अनुभव आले. त्या व्यवसायात आल्या तो योगायोग होता. ठरवून केलेला व्यवसाय नव्हता. पदवीचं क्षिक्षण त्यांनी पूर्ण केल. टाटा इन्स्टिट्यूट मधनं कॉम्प्युटर डिप्लोमा केला. शिक्षणपूर्ण केल्यानंतर परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विनीता यांनी भारतातच स्थायिक होणं पसंत केलं. इथेच व्यवसाय करायचं ठरवलं. महिलांची अधिक पसंती असणाऱ्या काही प्रोडक्टसवर काम करायचं आणि तोच व्यवसायासाठी निवडायचं ठरलं. घराच्या सजावटीतून सौंदर्य पूर्ण करणारा व्यवसाय निवडला. हा व्यवसाय नुसताच व्यवसाय म्हणून निवडला नाही. तर तो त्यांनी मिरवलाही. बेडशीटच्या अनेक व्यवसायात गुजराथी वर्ग अधिक दिसतो. ही खदखद मनात होतीच. या क्षेत्रात एकही मराठी व्यक्ती नाही. त्यामुळे आज या व्यवसायात महिला आणि तीही मराठी असल्याचा अभिमान त्यांना आहे.
श्रीलंकेतील एका कंपनीने मुंबईतील काही निवडक २५ शो रूम्स निवडले त्यात विनिता पेडणेकर यांची निवड झाली. शुन्यातून हा व्यवसाय उभा करणारी विनिता यांनी केवळ पॅशन म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं नाही. तर अपलं घर सजवताना एखादी स्त्री जितकी त्यात आपला प्राण ओतते. तितकाच विचार विनिता यांनी आपला व्यवसाय उभा करताना केला. याची माहिती घेतली. एक शंभर टक्के कॉटन आपल्याला जर द्यायचं आहे तर त्या बेडशिटची क्वॉलीटी कशी ओळखायची याची माहिती त्यांनी घेतली. जिथे बेडशिट बनवल्या जातात त्या राजस्थान, पंजाब, लुधियाना या ठिकाणी याचे मुख्य हब आहे, तिथे जावून प्रथम याचा संपूर्ण अभ्यास केला. माहिती घेतली. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंभर प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करत आपलं प्रॉडक्ट कसं शंभर टक्के पक्क आहे हे काम त्यांनी पहिल्यांदा केलं. या उप्तादनात प्रत्येक कापड, त्याची पोत, रंग, प्रिंटिंग कसं होतं, कसा असायला हवा, एखाद्या कपड्याची एलर्जी कशी होणार नाही याचा आधी विचार केला.
१९९२ पर्यंत महिला घरगुुती व्यवसायात उतरल्या होत्या. त्यामुळे ३० ते ३२ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या व्यवसायाबाबत प्रत्येकाला एक अप्रुप होतं. त्यामुळेच या व्यवसायात त्या अभिमानाने मिरवण्याइतका यशस्वी नक्कीच आहे. दुकानात येणारा आपला कस्टमर्स हा आपल्याकडे विश्वासाने आलेला असतो. त्याला फसवून माल कधीच गळ्यात बांधायचा नाही हे एक तत्त्व त्यांनी सांभाळलं. त्यांच्याकडून त्यांची गरज, त्यांना कोणत्या किमतीचा माल हवाय, हे समजून घेताना येणाऱ्या कस्टमर्सची इमेजही जपली जाते. त्यामुळे अगदी जुन्यातला जुना कस्टमर्सही तुमच्या दुकानात जे मिळतं ते इतर कुठेही मिळत नाही हे सांगायला विसरत नाही. क्वॉलिटीमध्ये कधीही फसवणूक होणार नाही किंवा कस्टमर्सकडून येणारे प्रश्न आणि त्याचं निरसन करून त्याला ते पटवून देताना डोक्यावर बर्फ आिण जिभेवर साखर ठेवून या दुकानात त्याच नाही तर त्यांचा स्टाफही उभा असतो. त्यामुळे कटू अनुभव आजपर्यंत विनीता यांना आलेला नाही. त्यांच्या दुकानातील चटया ४००, क्युशन कव्हर १०० तर डबल बेडशिट ७०० पर्यंत उपलब्ध आहेत.
आज सगळ्याच व्यवसायात स्पर्धा सुरु आहेत. त्यामुळे आपलं पद इथे टिकवून ठेवताना या व्यवसायाची संबंधित सगळ्यांशीच नाती टिकवणं त्यांना खूप महत्वाचं असतं. व्यवसायात अनेक चढ-उतार आले तरी नफा आिण तोटा या दोन्ही बाजू स्वीकारत तुम्हला पुढे जायचं आहे हाच एक मोलाचा संदेश त्यांच्याकडून मिळतो. यशानं हुरळून न जाता आणि अपयशानं खचून न जाता भक्कमपणे या व्यवसायात त्या उभ्या आहेत. कारण उद्याचा दिवस हा आपला असणार आहे हा विश्वास त्यांच्याजवळ आहे. एका गुजराथ्यानं आपल्याला कमी लेखणं हे त्यालाच कीती महागात पडेल हे त्याला दाखवून दिलं. उठावदार दिसणारी प्रत्येक वस्तू ही सुंदर नसते. त्यामुळे या व्यवसायात कुठेही चायनीज मालाला जागा नाही. मेक इन इंडियावर अिधक भर दिला जातो. आज ८ ते ९ कंपन्यांचे रिटेलरशिप त्यांच्याकडे आहे. याचं कारणं तुम्ही या व्यवसायात कसे वावरता हे देखील महत्वाचं आहे. इथे येणाऱ्या कस्टमर्सने इतर दुकानात जावू नये हे गणित जमवताना तो प्रत्येक कस्टमर्स इथे या दुकानातच आलेला दिसतो.
हॅंडिक्राफ्ट चटयांनाही इथे अधिक मागणी आहे. व्यवसाय हा मराठी माणूस करूच शकत नाही, हा मराठी लोकांच्या विचाराला छेद देत त्या या व्यवसायत आज यशस्वीपणे मिरवतात. एक हिंमत लागते व्यवसायात उतरुन तो पुढे नेण्याची. पुढे नेताना आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन जाताना त्यांच्या परिने पुढे जाण्याचा सुकर मार्गही तितकाच महत्वाचा असतो. हे सगळं काही जमवत विनीता यांनी व्यवसायत उडी घेतली. या व्यवसायात उतरण्यापूर्वीच एक ठोकर लागली. एका डिलरकडे पोहोचलेल्या विनीता यांना एक महिला म्हणून नाकारण्यात आलं. ‘तुम लेडीज ये क्या धंदा करोगे’ असं ऐकावं लागलं. पण हेच मनाशी पक्क केलं आणि एक दिवस याच डिलरशीपला ‘हमारा माल भी उठावो ना मॅडम’ असं म्हणण्यास त्यांनी भाग पाडलं. कोणत्याही व्यवसायात उतरताना स्वत:वर विश्वास हवा. मी हे करून दाखवीन या विश्वासानेच या व्यवसायात उतरलेल्या विनीता यांनी मोठ्या पगाराच्या नोकरीचाही कधी विचार केला नाही. त्यामुळे निवडलेला व्यवसाय चुकीचा निर्णय नव्हता हे त्यांनी सिद्ध करत अशा डिलर आणि इतरांना मारलेली चांगलीच चपराक आहे.