Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

छावा बघणाऱ्यांनी पसरवली अफवा

छावा बघणाऱ्यांनी पसरवली अफवा
बुऱ्हाणपूर : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या छावा या हिंदी चित्रपटाने ४९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवा गोंधळ सुरू झाला आहे. छावा चित्रपट बघितलेल्या काही प्रेक्षकांनी केलेल्या चर्चेतून या अफवेचा जन्म झाल्याचे वृत्त आहे. चित्रपटात मोगलांनी मराठ्यांची संपत्ती लुटून बुऱ्हाणपूरच्या असीरगड येथे ठेवल्याचे दाखवले आहे. हे दृश्य बघितल्यानंतर संपत्ती नेत असताना काही सोन्याची नाणी, दागिने गडाच्या परिसरात पडले असतील आणि मातीखाली दबले असतील असे कोणीतरी म्हणाले. हाच मुद्दा मग झपाट्याने कानोकानी पसरला. किल्ल्यात आणि आसपासच्या आवारात मातीत दबलेली सोन्याची नाणी सापडतील या आशेने नागरिकांनी असीरगडाच्या दिशेने कूच केले. शेकडो नागरिकांनी असीरगड आणि आसपासच्या परिसरात गर्दी केली. मिळेल त्या साधनाने माती उकरून आणि धातू शोधक यंत्राने तपासून सोनं शोधण्याचा प्रयत्न नागरिक करू लागले.





 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)






अनेकांनी कुदळ - फावडे घेऊन मोठे खड्डे करुन माती चाळणीने चाळून बघायला सुरुवात केली आहे. धातू शोधक यंत्राच्या मदतीने मातीत कुठे सोनं आहे का हे तपासण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील काही दिवसांपासून रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी असीरगडाच्या एका सोन्याचांदीच्या नाण्यांचा आणि दागिन्यांचा साठा सापडला होता. यामुळे आता पण बुऱ्हाणपूरमध्ये सोनं सापडेल या आशेने गर्दी झाली आहे.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर ही मोगलांची छावणी होती. दक्षिण आणि उत्तर भारतातील राज्यांना जोडणारे मुख्य शहर म्हणून बुऱ्हाणपूर महत्त्वाचे होते. सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू बुऱ्हाणपूर मार्गे दिल्लीला जात होत्या. मोगलांची नाण्यांची मोठी टाकसाळ बुऱ्हाणपूरमध्येच होती. विविध मोहिमांनंतर ज्यावेळी सैनिक बुऱ्हाणपूर छावणी येथे येत, त्यावेळी ते आजूबाजूच्या शेतात लुटीचा थोडा माल खड्डा खोदून लपवून ठेवत असा दावा काही जणांनी केला आहे. याच दाव्यांमुळे बुऱ्हाणपूरच्या असीरगड आणि आसपास सोनं सापडेल या आशेने नागरिक खड्डे खोदत आहेत. सोन्याचा शोध घेत आहेत.
Comments
Add Comment