रसिका मेंगळे
‘राम’ मी नसेना का….!
‘राम’ मी नसेना का…?
तू मात्र सीता हवीस!
कर्तृत्वाला माझ्या डोळ्याआड करण्यास,
तू गांधारी व्हावीस!
पगार माझा विचारू नकोस,
तू मात्र कमावती हवीस!
कामावरून आल्यावर, हसतमुख… चटकन तू त्या क्षणी गृहिणी व्हावीस!!
कुणा कवीच्या काव्यातून पुरुषी स्वभावाचे त्यांच्या अहंकाराने वर्णन एकविसाव्या शतकातही हुबेहूब लागू पडले. घर-संसार सांभाळत बाहेरील सर्व आघाड्यांवर लढून, पुरुषाच्या बरोबरीने नव्हे, तर त्याच्यापेक्षाही दोन पावले पुढेच तिची प्रगती आहे. हे सर्व करीत असताना तिची होणारी शारीरिक, मानसिक ओढाताण कधी विचारात घेतो का? सर्व असूनही नसल्यासारखी ऐहिक सुखाचा डोंगर तिच्यासमोर असताना ती अस्वस्थच. कारण हुकूमशहा, नराधमाने केलेली तिच्या आयुष्याची माती, तुटपुंज्या संसारात, फाटक्या आयुष्यात माता, भगिनी, प्रिया या नात्यांचा गुंता सोडविता सोडविताच स्वतःचा शोध घेऊ मागणारा एक प्रतिनिधिक खंबीर आत्मा!! यावरील काव्यपंक्तीच आपल्याला गंभीर बनवतात. मी सबळ आहे. सक्षम आहे, मला माझ्या स्वतःच्या क्षमतांची ओळख असून, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्राप्त होऊ शकणाऱ्या साऱ्या शक्तींची मला ओळख करून द्यायची आहे. स्त्रीविषयक दृष्टिकोनातून प्रश्नांची उकल करून आपली बाजू पटवून देण्याची हिंमत तिच्यात येऊ घातली. घरात, समाजात आपण एक व्यक्ती नागरिक म्हणून जगले पाहिजे. स्वतःच्या अस्तित्वाचे भान आणि समाजातील दुय्यम स्थान याचा सारासार विचार करून स्वतःला स्वकर्तृत्वाने अव्वल स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे सक्षमीकरणाची सुरुवात होय. नारी मे शक्ती अपार है, नारी सृष्टीचा आधार है, नारी का हमेशा सन्मान करो, नारी ही नर के जीवन का सार है.
ती पुरुषाला मागे टाकून पुढे जाण्याची स्पर्धा करीत नाही, पण वर्षानुवर्ष पुरुषकेंद्री संस्कृतीने तिच्यावर जो अन्याय केला व जोखंडात बांधले, त्यातून ती मुक्त होऊ इच्छिते. काही प्रमाणात ती मुक्त झाली हे ही तितकेच खरे. या मुक्ततेचे श्रेय काही पुरुषांनाच द्यायला हवेत. आपल्या देशात दोन महात्मे होऊन गेलेत. पहिल्या महात्म्याने जोतिराव पुरुषांनी स्त्रीला शिक्षित केले, तर दुसऱ्या महात्म्याने वर्षानुवर्ष उंबरठ्याच्या आत असलेल्या स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर राजकारण आणि समाजकारणात आणले. जीवनाचा नवा मार्ग दाखविला. जीवनाच्या सर्व अंगाचा तिने विकास केला आहे. भातुकलीचा खेळ खेळणारी, घरात आणि वाड्याच्या चौकात सागरगोटे खेळणारी मुलगी आज गावागावातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचली. मग ती पी. टी. उषा खेळणारी असो की साहित्याच्या क्षेत्रात तर निरक्षर बहिणाबाईपासून लक्ष्मीबाई टिळक, मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी अरुंधती रॉय असेल. या आणि अनेक स्त्रिया बोलू लागल्या, लिहू लागल्या, संघर्ष करीत करीत स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधू लागल्या. बाईची वेदना बाईलाच कळते म्हणून तिची सुख-दुःखे आणि आनंदही अक्षर वाङ्मयातून पानोपानी येऊ लागल्या. तिचे हे जगणे साहित्यातून भरभरून येऊ लागले. पण ती निर्भय स्वतंत्र वृत्तीची. अनिष्ट चालीरीती विरुद्ध बंड करून उभी आहे. कारण अंधकार होऊन विझायचे नाही. तर एक मशाल होऊन पेटायचे आहे. दुबळे लाचार होऊन जगायचे नाही तर अन्यायाचे उल्लंघन करायचे आहे तिला.
आजच्या काळातली जीवनमूल्येच बदललेली आहेत. नवराष्ट्र निर्माणासाठी सुसंस्कृत पिढी निर्माण करणारी ही नव महिला आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, सदसदविवेक बुद्धी, निष्कलंक, चारित्र्य इत्यादी मानवी मूल्यांची जोपासना करून ती घराघरातील महिलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतः जगा आणि दुसऱ्यांना जगण्यासाठी मदत करा. ही आपली जीवनमूल्य संस्कृती जपली तरच…. स्वतः एक बाई म्हणून अभिमान बाळगायला हवा. तरच ती दुसऱ्या बाईला सन्मानाने वागवील. अर्थार्जण करणारी बाई आणि घरात राहणारी गृहिणी यांच्यात भेद होता कामा नये. बाई म्हणून तिचे वेदना एकच आहे. मात्र तिच्या दुःखाचे पदर वेगवेगळे असू शकतील. आज समाजकारणात, राजकारणात स्त्रीचा सहभाग वाढला. तो काही अंशी आरक्षणाने. पण त्याचवेळी असंख्य समस्या ही टोकदार बनल्या आहे. एक ना अनेक प्रकारच्या संघर्षाबरोबरच इकडे कौटुंबिक ताणतणाव कलहासारख्या समस्यांना तिला तोंड द्यावे लागले. या राजकारण समाजकारण आणि कौटुंबिक पातळीवर तिचा अखंड लढा सुरू आहे. यात तिची शारीरिक, मानसिक अवस्था व सतत होणारी अवहेलना न पाहावणारी असते. यावेळेस मला चार ओळी सुचल्या…
“वार नाही तलवार आहे… ती समशेरीची धार आहे ….स्त्री म्हणजे अबला नाही… ती तर धगधगता अंगार आहे!!”
वरील चार ओळी हृदयाला आरपार करणाऱ्या आहेत. आज ८ मार्च जागतिक महिला दिन. दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी अमेरिकेतील हजारो कामगार स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी ऐतिहासिक निदर्शने केली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. महिलांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. यादिवशी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात. पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो. शेवटी एवढंच म्हणावसं वाटते, उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे. ती घर संसाराचा गाडा चालविणारी देव्हाऱ्यातील माऊली आहे. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार …लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार… कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे झालर …स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर… प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.