युवराज अवसरमल
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी, नायक, खलनायक, विनोदी भूमिका लीलया पेलणारे, करारी आवाज व दमदार अभिनयाने मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजविणारे कलाकार स्व. निळू फुले हे सर्व प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिलेले आहेत. त्यांची कन्या गार्गी हिने देखील अभिनयाच्या क्षेत्रात आपले स्थान भक्कम केलेले आहे. गार्गीचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव मराठे हायस्कूलमध्ये झाले. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. शाळेतील गोठकर सर जे मराठी शिकवायचे, त्यांनी अनेक नाटके बसवली. थोर साहित्यिक कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत हे जे गीत नाट्यानुभव त्यांनी बसविले होते, त्यामध्ये गार्गीने भाग घेतला होता. ती कथ्थक, भरतनाट्यम शिकली. शाळेतील स्नेहसंमेलनात तिने कथ्थक, भरतनाट्यमचे नृत्य सादर केले होते. त्यानंतर तिने फर्ग्युसन कॉलेज व एस. एन.डी. टी. कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. एस.एन.डी.टी. कॉलेजमध्ये असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. प्रसाद वनारसे व विद्यानिधी वनारसे यांचं नाट्यवेध हा अक्टिंग कोर्स होता जो दिल्लीच्या एन.एस. डी.ने मंजूर केला होता. तेथे तिने अभिनय प्रशिक्षण घेतले. तिथे मार्गदर्शनासाठी अभिनेता आशिष विद्यार्थी, अतुल कुलकर्णी, लोकेश गुप्ते आले होते. समन्वय या संस्थेची ती संस्थापक सदस्य आहे. या संस्थेअंतर्गत दहा ते बारा नाटकासाठी तिने काम काम केले. कधी अभिनय तर कधी वेशभूषेचे काम तिने पाहिले. महेश एलकुंचवारच ‘सोनाटा’ हे नाटक केलं. सुदामा के चावल हे नाटक तिने केलं. त्याचवेळी तिचे दोन ब्युटिक पुण्यात होते, ते ती चालवत होती व प्रायोगिक नाटकात काम करणं देखील सुरू होतं. पंडित सत्यदेव दुबेची कार्यशाळा व कार्यक्रमात तिने भाग घेतला. प्रेमाची गोष्ट, अहिल्याबाई होळकर या चित्रपटासाठी वेशभूषेचे काम तिने पाहिले. अमोल पालेकरांच्या ध्यासपर्व या चित्रपटात छोटीशी भूमिका तिने केली होती. अमोल पालेकरांनी लेखक विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित ‘ते आणि ती’ हा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये श्रीमंत नावाचं नाटक तिने केलं, ज्यामध्ये मथू नावाची व्यक्तिरेखा, जी पूर्वी विजय मेहतांनी केली होती. ती तिने साकारली होती. शर्वरी जमेनीस सोबत तिने कवितांचा कार्यक्रम केला. त्यानंतर लग्न संसारामध्ये तिची दहा वर्षे गेली.
पुढे तिच्या जीवनात टर्निंग पॉइट आला, ‘कट्टी बट्टी’ ही मालिका तिला मिळाली. त्यामध्ये जाधव फॅमिली दाखविली होती, त्यातील राजकारणी काकू तिने साकारली होती. या मालिकेचे शूटिंग अहिल्यानगरमध्ये झाले. जे तीच आजोळ होत. ही मालिका संपण्याच्या आतच तिला ‘तुला पाहते रे’ ही मालिका मिळाली. ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’,‘शुभ विवाह’, इंद्रायणी, थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिका मिळत गेल्या. पुढील वर्षी मालिकेमध्ये काम करून तिला दहा वर्षे होतील. आतापर्यंत १९ मालिकेमध्ये तिने काम केले आहे. ‘तुला पाहते रे ‘या मालिकेतील पुष्पा ही तिची व्यक्तिरेखा खूप गाजली. ती ईशाची (गायत्री दातार) आई असते. तिच्या तोंडी एक संवाद असतो ‘बोलले बोलले निमकर बोलले.’ हा संवाद खूपच गाजला. प्रेक्षकांनी त्या संवादावर रिल्स बनविल्या.
‘सॉलिट्यूड’ हा एक प्रकारचा ट्रॅव्हल अँप आहे. सॉलिट्यूड हॉलिडे पॅकेज आहे. ह्यावेळी सात सेलिब्रिटीना घेऊन भारतात व भारताबाहेर भ्रमंती केली जाणार आहे. सामान्य लोकांना देखील सेलिब्रिटींसोबत फिरता येणार आहे. गार्गीला फिरणे व वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड आहे. त्यामुळे सॉलिट्यूड हॉलिडेची कल्पना तिच्या मनामध्ये आली. मे महिन्यात मनमोहन तिवारी या भोजपुरी कलाकारांसोबत नेपाळची टूर व अभिनेता ओमप्रकाश शिंदे सोबत काश्मीर टूर आहे. जूनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखलेसोबत लेह लडाखला टूर आहे, सप्टेंबरमध्ये अभिनेत्री सायली संजीव सोबत मालदीवची टूर आहे. ऑक्टोबरमध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत बाली व गार्गी सोबत दुबईला टूर आहे. डिसेंबरला अभिनेता आशुतोष गोखलेसोबत श्रीलंकेची टूर आहे. गार्गीचा हा सॉलिट्यूड हॉलिडेचा प्रवास दूरचा प्रवास गाठू दे ही सदिच्छा!