Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीयतात्पर्य‘ती’चा क्षितिजापार प्रवास पण...

‘ती’चा क्षितिजापार प्रवास पण…

डॉ. दर्शना प्रशांत कोलते

८०-८५ वर्षांपूर्वी कोकणातील एका छोट्याशा खेड्यातल्या दोन अशिक्षित विधवा बायका, एकमेकींच्या जावा-जावा, दोघींच्या मिळून पाच मुलांना हिंमतीने वाढवतात, शिकवतात… नवऱ्याच्या पश्चात असलेल्या जमिनी, झाडंपेडं आणि स्वाभिमान यातलं काहीही न विकता कष्टाने संसार उभा करतात… मला कायम अभिमानास्पद वाटत आलेली माझ्या आजीची आणि चुलत आजीची ही गोष्ट… स्त्री सक्षमीकरण याहून वेगळे काय असते…? आज महिला दिनानिमित्त आपण स्त्रीच्या सबलीकरणाबद्दल बोलत राहतो. मोठमोठ्या कर्तबगार, प्रसिद्ध स्त्रियांचे दाखले देत राहतो पण ही डोळ्यांसमोरची उदाहरणे… यांच्याकडे दुर्लक्षच होते आपले! सासुसासऱ्यांनी केलेला छळ सहनशक्तीपलीकडे गेला, तेव्हा एक दिवस त्यांच्यासमोर कुऱ्हाड घेऊन दुर्गेच्या रूपात उभी राहिलेली माझी मावशी! त्यानंतर मात्र त्या घरात तिला छळण्याची कुणी हिंमत केली नाही. दारूड्या नवऱ्याला झेलत संसाराचा गाडा एकटीने ओढणाऱ्या आणि मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या कष्टकरी महिला तर आपल्या आजूबाजूला कितीतरी पाहतो आपण! त्यांना स्त्रीमुक्ती, स्त्रीशक्ती, समानता, सबलीकरण हे शब्द माहीत नसतात, पण त्या जे जगत असतात ते याहून वेगळे काही नाहीच!

Social Worker Women : एक संवाद आपलेपणाचा – नेहा भगत

नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात आदरणीय तारा भवाळकर म्हणाल्या तसं रूढार्थाने बायका शिक्षित फार उशिरा झाल्या असतील पण त्या अशिक्षित होत्या म्हणजे अडाणी होत्या असं नव्हे, उलट एक व्यवहारी शहाणपण त्यांच्यात होतं. साध्या भाषेत कॉमन सेन्स होता! पण याच पार्श्वभूमीवर जेव्हा आताची तरुणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहतो तेव्हा मात्र सुशिक्षित असूनही सुजाण न झालेली तरुणी बरेचदा बऱ्याच ठिकाणी जाणवत राहते. आधीच्या पिढीतील समाजसुधारकांनी स्त्रीला शिक्षित करण्याचा अट्टहास याचसाठी केला होता का असेही वाटत राहते कधीकधी! अर्थात ही स्थिती सार्वत्रिक नसली तरी अगदी अपवादात्मकही नाही! मध्यंतरी वाचलेली एक बातमी… दारू पिणाऱ्या महिलांच्या संख्येत २.५ % वरून ५ % इतकी वाढ! म्हटले वा! याबाबतीत ही लवकरच महिला पुरुषांची बरोबरी करू शकतील यात शंका नाही! समानतेचा अर्थ बरेचदा स्त्रीने पुरुषासारखे वागणे असा उथळपणे घेतला जातो. स्त्री आणि पुरुष या विधात्याच्या दोन स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आहेत. एकाने दुसऱ्यासारखे बनण्याचा अट्टहास कशासाठी? समाज माध्यमे, प्रसार माध्यमे, सवंग मालिका, चित्रपट यातून हेच बिंबवले जाते की, पुरुषांसारखी वेशभूषा, केशभूषा करणारी आणि बेफिकीर असणारी स्त्री म्हणजे आधुनिक! वरवरच्या या वेष्टनामध्येच नवी उमलणारी पिढी इतकी गुरफटून गेलीय की आतला गाभा तसाच कच्चा राहिलाय हे पदोपदी जाणवते.

पण बेफिकीर किंवा परिणामांची पर्वा न करता वागल्यामुळे नंतर पश्चाताप कराव्या लागणाऱ्या मुलींना पाहिले की हळहळ वाटते. मुळात ते प्रेम नसून आकर्षण आहे हे न कळल्यानेच अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. भावनेच्या भरात आई-वडिलांना दूर लोटून आवडत्या जोडीदाराशी लग्न केले जाते. लग्नानंतर मुखवटे गळून पडतात आणि खरा चेहरा दिसू लागतो. मुलीला सासरच्यांसोबत जुळवून घ्यावे लागते. वर्ष व्हायच्या आत पदरात पोर असते, त्याला कसे सांभाळावे हे कळत नसते, कारण स्वतःला सावरायलाच वेळ मिळालेला नसतो… अशा पिचलेल्या, खचलेल्या तरुण सुशिक्षित मुली जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरंच वाटते हेच का महिला सबलीकरण? लग्नाआधीच्या प्रेमसंबंधातून राहणारी प्रेग्नन्सी हे आणखी एक उदाहरण!

आपण कितीही स्त्रीला पुरुषासारखे बनवण्याचा प्रयत्न केला तरी निसर्गाने अजूनही मातृत्वाची देणगी स्त्रीलाच बहाल केलेली आहे. या देणगीचा शाप वाटू नये हीच अपेक्षा आहे. पेहरावाचे, वागण्या-बोलण्याचे, फिरण्याचे स्वातंत्र्य जसे मुलाला आहे तसे मुलीलाही असायलाच हवे. पण या स्वातंत्र्यामधून आपलीच सुरक्षितता धोक्यात येत नाही ना… याची खबरदारी मुलीलाच घ्यावी लागणार आहे. कारण अजून तरी बलात्कार पुरुषाकडून स्त्रीवरच केला जातो. तिथे समानता नाही! असुरक्षित सामाजिक वातावरण, बघ्याची भूमिका घेणारा समाज आणि पुरुषाची स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याची मानसिकता हे बदलायला हवेच आहे. पण हा बदल फार धीम्यागतीने होणारा आहे. तोपर्यंत स्त्रीला स्वतःलाच स्वतःचा पाठीराखा कृष्ण व्हावे लागणार आहे. कान आणि डोळे उघडे ठेवून, मेंदू जागृत ठेवून, भावनेच्या भरात वाहवत न जाता सबल, सक्षम, सजग होऊन समाजात वावरावे लागणार आहे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -