मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोजक्या शब्दांमध्ये सूचक उत्तर
मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि भाजप यांची जवळीक वाढत चालली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कोल्डवॉर सुरु असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील अंतर कमी होऊ लागलं आहे. त्यातच एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत सूचक उत्तर दिले.
उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणीची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. पाच वर्षांमधील अनुभवातून मी एक गोष्ट नक्की शिकलो. एखाद्या गोष्टीला नाही म्हटले म्हणजे ती गोष्ट नाहीच होणार असे नाही, अशी पुस्तीही फडणवीसांनी पुढे जोडली. मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत माझे संबंध कधीच वाईट नव्हते, असे फडणवीस म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधकांना शत्रू समजले जात होते. पण मी पुन्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट केली होती. मी इथे बदल घडवण्यासाठी आलो आहे, बदला घेण्यासाठी आलेलो नाही. मला संवाद कायम ठेवायचा आहे. माझे लक्ष विकासावर आहे. विरोधकांसोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो,’ असे फडणवीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा फोन घेतला असता, कॉल उचलला असता, तर दोन पक्षांमध्ये फूट पडलीच नसती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ‘ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता, तर आताची परिस्थितीच वेगळी असती. पण आता आम्ही एकमेकांचे फोन घेतो,’ असं सांगत फडणवीसांनी ठाकरेंसोबत आता त्यांचे संबंध सुधारले असल्याचे सूचक संकेत दिले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. पण राजकारणात काहीही घडू शकते, असेही ते पुढे म्हणाले. ‘राजकारणात कोणीही कोणासोबत जाऊ शकतो, हेच गेल्या ५ वर्षांत मी शिकलो आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता, मला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही,’ असे फडणवीस म्हणाले.