अमृतातही पैजा जिंके अशी आमुची मराठी, असा आपण मराठी भाषेचा बेंबीच्या देठापासून उदोउदो करत असतो. कागदोपत्री देखील महाराष्ट्राची राजभाषा आपली मराठी आहे. आपल्या राज्यातही मराठी भाषाच अधिकाधिक लोकांकडून बोलली जात आहे. त्याच महाराष्ट्रात अन्य भाषांचा उदोउदो झाला तरी महाराष्ट्रातील जनता कधीही आक्षेप घेणार नाही, पण इतर भाषांचा उदोउदो केला जात असताना मराठी भाषेचे कोणी जाणीवपूर्वक अवमूल्यन करत असेल, जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही, हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. मराठी भाषेवरून वाद उफाळण्याचे अथवा भाषिक वादामध्ये मराठीला ओढण्याचे तसेच मराठी भाषेला डावलून अन्य भाषांचे अवडंबर माजविण्याचे वाद अलीकडच्या काळात वाढीस लागले आहेत. हे वाद ग्रामीण भागात न होता, शहरी भागातच होऊ लागले आहेत. बोली भाषेतील मराठीच्या व्यवहारावरून मुंब्रा भागात काही महिन्यांपूर्वीच वाद होऊन मराठीचा आग्रह धरणाऱ्या मराठी भाषिकाला मारहाण करण्याची घटना घडली होती. महामुंबई परिसरात मराठी भाषिक व गुजराथी भाषिक हे वाद अधूनमधून होतच असतात. निवडणूक काळात तर अशा वादाला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात असावे. मोठमोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये मराठी भाषिकांना सदनिका न देण्याच्या घटनाही अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत.
मराठी भाषेला एकीकडे आपल्या देशामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्राच्या भूमीतच मराठीवरून वाद निर्माण होणे, अन्य भाषेच्या तुलनेत मराठी भाषेला कमी लेखणे हा खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा नाही, तर महाराष्ट्राच्या भूमीचा, मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी भाषिकांचा अपमान आहे, त्याविरोधात मराठी भाषिकांच्या नसानसातून संताप व्यक्त होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या विरोधात वक्तव्य करण्याची आज कोणाही सोम्यागोम्याची हिंमत का होत आहे, यामागे काय पार्श्वभूमी असावी याचाही आज शोध घेणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या अवमूल्यनास आज खऱ्या अर्थांने मराठी भाषिकच जबाबदार आहेत. दाक्षिणात्य भागात जाऊन पाहा, त्या भागातील लोकांना त्यांच्या भाषिक अभिमानाला, भाषेबाबतच्या आग्रहाला खरोखरीच मानाचा मुजरा केला आहे. त्या भागातील जनता कन्नड व तेलुगू भाषा केवळ बोलत नाही, तर त्या भाषेला डोक्यावर घेऊन नाचते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यांमध्ये अन्य भाषांना डोके वर काढण्याची कधी संधी मिळत नाही आणि नजीकच्या भविष्यात मिळणारही नाही. त्या राज्यांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषेतूनच व्यवहार करण्याबाबत ते आग्रही असतात. त्यांच्या भाषेला त्यांच्या राज्यामध्ये डावलण्याची कोणीही हिंमत करत नाही, कारण त्यांची भाषा त्यांचा श्वास बनली आहे. आपल्या महाराष्ट्रात हे चित्र पहावयास मिळते.
मराठीबाबत आपण किती आग्रही भूमिका मांडतो, व्यवहारामध्ये मराठी भाषा बोलण्याविषयी आपण किती पोटतिडकीने बोलतो याबाबत खोलात जाऊन विचार केल्यास नाही हेच उत्तर येते. मुळातच मराठी भाषिकांनाच मराठी भाषा बोलण्याची आज लाज वाटत आहे, ही खऱ्या अर्थांने आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी शोकांतिका आहे. आपली मातृभाषा मराठी असताना, या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतानाही आपण हिंदी व इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व नसतानाही तोडक्यामोडक्या भाषेत का होईना, त्या भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, असे आपण का करतो? मराठीसारखी प्रभावी भाषा असताना अन्य भाषांच्या प्रेमात मराठी भाषिक अडकत असल्याने महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी भाषेला कमी लेखण्याचे धाडस याचमुळे वाढीस लागले आहे. महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक मराठी भाषिकच असताना मराठी भाषेच्या शाळा वेगाने बंद पडू लागल्या आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही मराठी शाळांना वेगाने टाळे लागत आहेत. एकीकडे मराठी भाषा बोलण्याबाबत आपली वाढती उदासीनता आणि दुसरीकडे इंग्रजी माध्यमांमध्येच मुलांना शिक्षण देण्याचा आपला आपला अट्टहास पाहता नजीकच्या भविष्यात कोणे एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा होती, असे पुढच्या पिढीला सांगण्याची वेळ नक्कीच येईल आणि सध्याची परिस्थिती पाहता, तो दिवस फार काळ काळ लांब असणार नाही, ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागातील मराठी भाषांना टाळे लागत असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढ होत आहे. पटसंख्या कमी होत असल्याने मराठी शिक्षकांच्या रोजगारावर पर्यायाने उपजीविकेवर संक्रात निर्माण झालेली आहे. शाळा बंद चालल्याने मराठी शिक्षक ‘सरप्लस’ होत असताना अनेक शिक्षकांना अन्य शाळांमध्ये लवकर संधी मिळत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलांना शिक्षण देणे, व्यवहारामध्ये मराठीऐवजी इंग्रजी भाषेचा वापर करणे ही प्रतिष्ठेची बाब समजण्याची मराठी भाषिकांची मानसिकताच आज महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अधोगतीस प्रमुख कारण ठरली आहे. ‘माय मरो, मावशी उरो’ हे सुभाषित वर्षानुवर्षे आपल्या कानावर पडत असले तरी नातेसंबंधाबाबत आहे. आईच्या तुलनेत मावशीच्या प्रेमाची महती सांगण्याबाबतच गहन आशय त्यात दडलेला असतो; परंतु मराठी भाषा या मायची आपण उपेक्षा करून आज इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषारूपी मावशीचा उदोउदो करणे योग्य आहे का? राजकारणात मतांसाठी मराठी भाषेचा पुळका अनेकांना येतो, यामागे केवळ मराठी भाषिकांची एकगठ्ठा मते लाटण्याचा हा निवडणूक काळातील स्वार्थी प्रकार असतो. मराठी भाषिकांच्या मतांवर आपली राजकीय तुंबडी भरायची आणि इतर वेळेस मराठी भाषेला, मराठी भाषिकांना वाऱ्यावर सोडायचे, हेच गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे. हे कोठेतरी आता थांबले पाहिजे. मराठी भाषेला मानसन्मान मिळवून देण्यासाठी मराठी भाषिकांनी स्वत:मध्येच परिवर्तन घडवून आणले पाहिजे. व्यवहारात मराठी भाषेचा आग्रह धरताना स्वत:ही मराठी भाषेतूनच संवाद साधला पाहिजे. आपण अन्य भाषा न बोलता इतरांनी मराठी भाषा बोलावी यासाठी आपण ठाम असले पाहिजे. महाराष्ट्राची भाषा ही मराठीच असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील कामकाजादरम्यान स्पष्ट केले आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे, ही भाषा जगविण्याची, टिकविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तरी महाराष्ट्राच्या भूमीवर मराठी भाषेच्या तुलनेत अन्य भाषा मुजोर होणार नाही, याचीही काळजी आपणास घ्यावी लागणार आहे.