Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

मुर्खांकडे लक्ष देऊ नकोस

मुर्खांकडे लक्ष देऊ नकोस

शमीवर टीका करणाऱ्यांना जावेद अख्तर यांनी सुनावले

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. भारताच्या या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही महत्त्वाचा वाटा आहे. फिरकी गोलंदाजांना दुबईत साथ मिळत असली, तरी वेगवान गोलंदाजीची धूरा शमीने समर्थपणे पेलली आहे. अशातच तो नव्या वादात अडकला. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु असून मुस्लिम लोक यादरम्यान रोजा ठेवतात. मात्र शमी सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असल्याने त्याने रोजा न ठेवल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शमी एनर्जी ड्रिंक पीत होता. हे पाहून मुस्लिम समाजातील काही लोकांनी त्याच्यावर टीका केली आहे, तर काहींनी धर्माच्या आधी देशाला महत्त्व दिल्याबद्दल कौतुक केले आहे. मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी मात्र शमी गुन्हेगार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, इस्लाममधील शरियत कायद्यानुसार रोजा न ठेवणे मोठा गुन्हा आहे. पण दिल्लीतील मौलाना अरशद यांनी मात्र शमीला पाठिंबा दिला असून त्यांनी त्याच्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे. अशात आता याबाबत दिग्गज संगीतकार जावेद अख्तर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शमीवर टीका करणाऱ्यांना आणि त्याला गुन्हेगार म्हणणाऱ्यांना मूर्ख म्हटले आहे.

जावेद अख्तर यांनी ट्वीट केले की ‘शमी साहब, दुबईच्या त्या रखरखत्या उन्हात क्रिकेटच्या मैदानात पाणी पिण्यावरून टीका करणाऱ्या मुर्खांकडे लक्ष देऊ नकोस. त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्हा सर्वांना अभिमान वाटत असलेल्या भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंपैकी तू एक आहेस. माझ्या तुला आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा आहेत.'

मोहम्मद शमीला याशिवाय देखील अनेकांनी पाठिंबा दिला आहे. हरभजन सिंगनेही सामन्यावेळी उन्हात पाण्याची आणि अन्नाची शरीराला गरज असते, असे म्हणत शमीचे समर्थन केले आहे. दरम्यान, शमीने मात्र यावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments
Add Comment