मेघना साने
महिला दिनानिमित्त आचार्य ९० FM रेडिओवर तुमची मुलाखत घ्यायची आहे.” असा RJ तेजस्विनीचा फोन आला. हा कुठला रेडिओ आहे म्हणून मी चक्रावूनच गेले. तिने सांगितलेल्या माहितीवरून हा आचार्य मराठे कॉलेजचा, कॉलेजने तयार केलेला स्वतःचा रेडिओ आहे, असे कळले. गेली दोन अडीच वर्षे हे त्यांचे रेडिओ स्टेशन अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेऊन, विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करतात आणि यूट्युबवर असल्यामुळे या मुलाखती पालकही पाहू शकतात. मात्र तेजस्विनीने सांगितले की ही मुलाखत व्हीडिओ स्वरूपात असणार आहे. ठरल्याप्रमाणे ४ मार्च २०२५ला आचार्य मराठे कॉलेजच्या सहाव्या मजल्यावरील रेडिओ स्टेशनला जाण्यासाठी मी घरून निघाले तेव्हा कल्पना करत होते की कॉलेजचे रेडिओ स्टेशन म्हणजे काय असणार? एखादा वर्ग रिकामा झाला की तेथेच मोबाईलने मुलाखत शूटिंग करून घेत असतील. पण प्रत्यक्षात मी आचार्य मराठे कॉलेजच्या सहाव्या मजल्यावर गेले, तेव्हा पाहिलं ते एक तीन-चार खोल्यांचे चकचकीत रेडिओ स्टेशन. आकाशवाणीत मुलाखत घेताना असते तशीच व्यवस्था! टेबल, माईक वगैरे… दुसऱ्या खोलीत एडिटिंग… आलेल्या पाहुण्यांना बसायला एसी रूम, सोफे वगैरे छान नटवले होते.
सुहास्यवदना RJ तेजस्विनी स्वागत करत होती. RJ कोमल देखील होती. “आजपर्यंत तुम्ही किती मुलाखती घेतल्यात?” मी तेजस्विनीला विचारले. “विविध क्षेत्रातल्या एकूण ९०० मुलाखती घेतल्या आहेत.” “अरे बापरे” मी कौतुकाने म्हटले. “मग मलाच तुमची मुलाखत घेतली पाहिजे.” आमचा संवाद सुरू असतानाच तेथे आचार्य मराठे कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. जयश्री जंगले आल्या. त्यांची माझी फोनवरून ओळख झालीच होती. त्यांनी मुलाखतीसाठी माझी संपूर्ण माहिती नोंद करून घेतली होती. आम्ही लगेच स्टुडिओत गेलो. आरजे तेजस्विनी आणि जंगले मॅडम, दोघींनी मिळून माझी समरसून मुलाखत घेतल्यानंतर आम्ही काही फोटो वगैरे काढले आणि मग खरोखरच या रेडिओ स्टेशनची माहिती घेण्यासाठी मी दोघींना पुन्हा बोलते केले. १३ जुलै २०२२ ला ‘आचार्य ९० एफ. एम’. या रेडिओ स्टेशनची स्थापना झाली. गेल्या दोन अडीच वर्षात साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रातल्या ९०० हून अधिक मुलाखती या रेडिओवर प्रसारित झाल्या. अनेक क्षेत्रातले अनेक लोक या रेडिओशी जोडले गेले.
ना. ग. आचार्य आणि दा . कृ. मराठे या दोन महान व्यक्तींनी आचार्य मराठे कॉलेजची स्थापना केली. थोर समाजसेवक ना. ग. आचार्य यांचे सुपुत्र स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांचे नाव चेंबूर आणि पंचक्रोशीत गाजतच आहे. आपल्या समाजातील लोकांनी सुशिक्षित होऊन विविध क्षेत्रात कार्यरत व्हावं या उद्देशाने ते सतत झटत असत. शिक्षण हा त्यांचा श्वासच होता. महापौर शरद भाऊ यांचे सुपुत्र सुबोध यांना नावीन्याचा ध्यास होता. कॉलेजमध्ये मास मीडिया अभ्यासक्रम असल्याने रेडिओ स्टेशन हे पूरक प्रसिद्धी माध्यम ठरेल हे त्यांनी जाणले. रेडिओची आपल्याला सुचलेली संकल्पना त्यांनी आपले बंधू शैलेश आचार्य यांना सांगितली. मग त्यांनीही आपल्या बंधूंचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे म्हणून मेहनत घेतली. आपले कॉलेजमधील सहकारी माहेश्वरी मॅडम, योगेश धनजानी, संदेश पाटील यांनीही खूप मदत केली असे ते सांगतात. रेडिओ स्टेशन स्थापन झाल्यानंतर त्याला नाव दिले ‘आचार्य-९० FM’ आणि प्रसिद्ध अभिनेते आणि मुलाखतकार आदेश बांदेकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. कल्याणी, नेहा, तेजस्विनी आणि कोमल या आरजे यांनी मुलाखती घ्यायला सुरुवात केली. डॉ. राहुल भांडारकर आणि मंगेश पवार हे मीडिया कन्सल्टंट म्हणून जोडले गेले. अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना या रेडिओची मीडिया पार्टनर म्हणून साथ मिळाली. यात प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच फॅशन शो, पुस्तक प्रकाशन सोहळा, उद्योजकता विकास कार्यक्रम अशा कार्यक्रमांचाही समावेश आहे.
तेजस्विनीने सांगितले की, आजवर साहित्य व नाट्य क्षेत्रातीलही अनेक कलाकारांना त्यांनी मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. अभिनेते अंशुमन विचारे, संतोष पवार, शंतनू मोघे, अनिकेत केळकर, माधव देवचके, संदेश उपश्याम, अभिनेत्री अदिती सारंगधर, संजीवनी पाटील, नम्रता गायकवाड, बालकलाकार नित्य पवार यांचे सेलिब्रिटी शो झाले आहेत, तर साहित्यिक, अशोक नायगावकर, हेमांगी नेरकर, प्रमोद पवार, प्रवीण दवणे, शुभदा दादरकर, रोहिणी निनावे, मंजिरी मराठे, अशोक हांडे, मीनाक्षी पाटील, मोनिका गजेंद्रगडकर, सदानंद राणे, विसुभाऊ बापट, पार्थ बावस्कर, वंदना बोकील कुलकर्णी, मुकुंद कुळे, चंद्रशेखर वझे, चंद्रशेखर साने, सु. ग. शेवडे गुरुजी, इ. यांनाही बोलाविले होते. कलाकारांमध्ये दीप्ती भागवत, नचिकेत देसाई, कांचन अधिकारी, सोनिया परचुरे, भरत दाभोळकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, नयना आपटे, सत्यजित पाध्ये, रणजित सावरकर, राजेंद्र पै, कौशल इनामदार, अनिल अरुण दाते, रामदास अपर्णा पाध्ये, निनाद आजगावकर अशा वेगवेगळ्या व्यक्तींचा यशाचा मार्ग जाणून घेणे हे या मुलाखतीचे उद्दिष्ट असते. विद्यार्थ्यांना यातून नवविचार मिळू शकतात. सेलिब्रिटी शो प्रमाणेच ‘हॅलो डॉक्टर’ आणि ‘बिझनेस मंत्रा’ हे दोन कार्यक्रम देखील त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींना बोलावून, त्यांच्याशी संवाद करून सादर होतात. ‘बिझनेस मंत्रा’मध्ये विको लेबोरेटरीजचे संजीव पेंढारकर, बेडेकर मसालेच्या अनघा बेडेकर, केटरिंगवाले राजेश मोहिले, सांडू ब्रदर्सचे प्रशांत सांडू, फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, आम्ही उद्योगिनीच्या मीनल मोहाडीकर अशा अनेक दिग्गज व्यक्तींना बोलावून त्यांच्यावर एपिसोड निर्माण केले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची मुलाखत खास घेण्यात आली होती. या सर्व उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना करिअर करताना नक्कीच होईल.
[email protected]