गीतांजली वाणी
‘विश्वनिर्मितीची ज्योत
जगतजननी नारी
त्याग समर्पण तुझे
विश्व अवघे उद्धारी’
दरवर्षी येणारा जागतिक महिला दिन म्हणजे महिलांसाठी एक दिवसाची सुखदायी मेजवानी. ८ मार्च रोजी जगभरात International womens day म्हणून कधी नव्हे तो तेवढ्या दिवसापुरती केला जाणारा समस्त स्त्री शक्तीचा उदो उदो असं म्हणाले तर वावगे ठरणार नाही. कारण युगानुयुगे तिच्यातूनच जन्मणारे विश्व सराईतपणे विसरून जाते की हीच आपली जननी आहे. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी ह्या आणि अशा नानाविध रूपातून ती आपल्याला साथ देत असते. पूर्वी चूल आणि मूल एवढंच समीकरण तिच्यासाठी होत असे. साधारण पूर्वार्धात डोकावलं तर दिसून येतं, पण तोच इतिहास स्वराज्याची निर्मिती करण्याचे सामर्थ्य शिवाजी महाराज भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ पण दाखवतात आणि आठवण करून देतात की आईचे संस्कार पाल्याला स्वराज्याचे स्वप्न दाखवते आणि ते पूर्ण करायची धमकही देते. असेच एक मोठे नाव – मेरी झाँसी नही दूंगी असे सांगणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मी बाई सुद्धा इतिहास सांगतो… त्यांनी तर तान्हुलं पाठीला बांधून शत्रूशी खिंड लढवली होती… त्यांच्या धाडसाची आणि शौर्याची महती आजच्या तरुण मुलींनी नित्य आठवली आणि तेवढी हिम्मत ठेवून जगभर वावरल्या तर निर्भया होणे नाहीच असे मला वाटते. त्याच इतिहासातून अशिक्षित असूनही ओवीतून जगाचे वास्तव मांडणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी होत्या…
आजच्या घडीला आदराने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ त्यांच्या नावाने ओळखले जाते. खूप मोठी सन्मानाची गोष्ट स्त्री जगतासाठी आहे. स्त्रियांना लिहिता-वाचता यावे म्हणून धडपडणारी अन् त्यासाठी लोकांनी मारलेले शेणाचे गोळे सहन करणारी माय सावित्री… सावित्री बाई फुले… ज्यांच्या नावाने पुणे विद्यापीठ ओळखले जाते. एक आनंदी बाई गोपाळ सुद्धा होत्या ज्या पहिल्या डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात… खूप जाचातून त्या डॉक्टर झाल्या. ह्या आणि यांच्यासारखे अनमोल योगदान देऊन स्त्री जातीचे अस्तित्व निर्माण व्हावे आणि ते टिकावे म्हणून बहुमोल योगदान देणाऱ्या अनेक स्त्रिया भारतात होऊन गेल्या आणि आजही आहेत. फक्त त्याच नाही तर त्यांच्यासारखीच सकारात्मक वृत्ती स्त्री अस्तित्वासाठी असणारे उच्च विचार व योगदान देणारे पुरुषही बरेच आहेत. पण… हा जो पण आहे ना तो इतिहासापासून आजपर्यंत स्त्रीच्या जीवनातून गेलाच नाही… कारण तो तिच्या पूर्णत्वातून अपूर्णतेची पोकळी निर्माण करतो. मग ती पोकळी फक्त बलात्कार करणारे करतात असे अजिबात नाही. अगदी घरापासून सुरुवात होते. बहीण भावंडात नेहमी घरात भावाला अग्रस्थान मिळते. मुलगी झाली की, आनंद होण्यापेक्षा तिच्या भविष्याच्या चिंतेपोटी घरात तिला दुय्यम वागणूक मिळते.
स्त्री स्वतः स्त्री असूनही पर स्त्रीचा हेवा करते, तिला उपद्रव होईल असे काहींना काही प्रयत्न करते. घराघरात सासू-सुना, जावा, नणंद, भावजई नात्यात असणारे वितुष्ट हे सुद्धा त्या अपूर्णतेचे कारण असते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या व्यवहारातूनही तिचे पूर्णत्व किती हे सहज डोकावता येते. अलीकडे तर २१व्या शतकात असं काहीच नाही जे तिने केलं नाही. ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीनेच नाही तर त्याच्यापेक्षा यशस्वी कार्य सर्व क्षेत्रात करते. पण हे करताना तिची घरात होणारी तारांबळ, कामाच्या ठिकाणी होणारी अवहेलना, सोबत असणारे सहयोगीचे वर्चस्व, जाळपोळ, मारहाण, बलात्कार, मारून टाकणे… एकूणच अस्थिरता आणि अशांती असे असणारे जीवन ती जगताना दिसते. त्यातून सहज लक्षात येत की, ते अपूर्णत्व इतरांमुळे येणार आहे आणि तिने प्रयत्न करूनही संपेल याची शाश्वती नाही. त्यावेळी जागतिक महिला दिनाला होणारा एक दिवसाचा उदो-उदो तिला फक्त एक कवडसा वाटत असावा नाही का? म्हणूनच तिच्या कर्तृत्वाला, त्याग समर्पणाला त्रिवार वंदन.