Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमहिला सुरक्षेचा प्रश्न कधी सुटणार?

महिला सुरक्षेचा प्रश्न कधी सुटणार?

मधुरा कुलकर्णी

अलीकडे पुण्यामध्ये गुन्हेगारी बरीच वाढली आहे. येथील शिवशाही बसमधील कथित अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले. २०२२ मध्ये देशभरातील न्यायालयांमध्ये अत्याचारासंबंधित तब्बल दोन लाख प्रकरणे प्रलंबित होती. पैकी यामध्ये साडे १८ हजार प्रकरणात ट्रायल पूर्ण होऊन पाच हजार प्रकरणांमध्येच दोषींना शिक्षा दिली गेली, तर १२ हजारहून जास्त प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले. काय सांगते ही आकडेवारी?

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतात. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मुंबई, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांशी, जिल्ह्यांशी आणि तालुक्यांशी स्वारगेट बसस्थानकातून गाड्या सुटतात आणि येतात. अशा मध्यवर्ती आणि गजबजलेल्या बसस्थानकावर एवढे सुरक्षारक्षक, एसटी कर्मचाऱ्यांचा वाढता वावर आणि जवळच पोलीस ठाणे असताना एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षांच्या तरुणीवर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार करण्यात आला. हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर प्रशासन हलले, काही उपाययोजना केल्या; परंतु शिवशाहीमध्ये अत्याचार करणाऱ्या या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यातील सुपे, शिरूर, शिक्रापूरसह अन्य ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. महिलांची लूट, दरोडा आदी गुन्हे दाखल असताना तो जामिनावर बाहेर येतो, न्यायालयीन प्रक्रियेत आरोपांची सिद्धता न झाल्याने त्याला गुन्हे करण्याची संधी मिळते. गुन्हे दाखल झालेला दत्तात्रय गाडे तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवतो, यासारखा जगात दुसरा विनोद नाही. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले. त्याने अत्याचाराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर महिला सुरक्षिततेच्या गंभीर मुद्द्याचे काही नवे पैलू प्रकाशात आले आहेत.

गाडेवर आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गाडे स्वारगेट बसस्थानकावर वारंवार जात असायचा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला बसस्थानकावरील निर्जन स्थळी घेऊन जाऊन अत्याचार केला. स्वारगेट बसस्थानकावर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत होते; मात्र यावेळी संबंधित मुलगी एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम आरोपीने अत्याचार केले. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. तिच्या उत्तरातून गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय आहे. त्या दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने गाडे याच्या दहा मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून त्याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे.

‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत, आपण पोलीस असल्याचे भासवून महिला, तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तो करायचा. स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले. आगारप्रमुख आणि स्थानक प्रमुखांवरची कारवाई ही पश्चातबुद्धी आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काही गर्दुले बसचा वापर लॉज म्हणून करत असल्याचा प्रकार उघड झाला. या गुन्ह्यानंतर पुणे शहरातील शिवाजीनगर बस स्थानक, स्वारगेट बस स्थानक, नाशिक, नागपूर तसेच अन्य स्थानकांमध्ये पाहणी केली गेली, तेव्हा अनेक भागात वीजपुरवठा बंद असल्याचे आढळले. घटना घडून २४ तासही होत नाही तोच पुन्हा दिव्याखाली अंधार असे चित्र पाहायला मिळाले. स्वारगेटमध्ये तिकीट काउंटरच्या ठिकाणी वीजच नव्हती. महिलांना भीती वाटत होती. त्याच बाजूला अनेक पुरुष झोपलेले पाहायला मिळाले. तिथेही अजिबात प्रकाश नव्हता. स्वारगेट बस स्थानकामध्ये ज्या गाडीत घटना घडली, त्या गाडीच्या बाजूला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. जिथे बस उभी होती, त्या ठिकाणीही वीज नव्हती. एसटीचे सुरक्षारक्षक नव्हते; मात्र पोलीस कर्मचारी घटना घडलेल्या गाडीला पहारा देत होते. त्याचबरोबर ते लोकांची विचारपूसही करत होते. स्वारगेट डेपोमध्ये गर्दुल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. हे गर्दुल्ले पाहून महिला भयभीत झाल्याचे पाहायला मिळते.

पुण्याच्याच दुसऱ्या मोठ्या शिवाजीनगर बस स्थानकामध्येही पाहणी केली गेली. तेव्हा एकही पोलीस अथवा सुरक्षारक्षक दिसला नाही; मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दुल्यांचा वावर दिसला. शिवाय स्थानकातल्या अनेक भागांमध्ये अंधार होता. शिवाजीनगर बस आगाराच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत प्रवासी झोपलेले दिसले. तिथला हिरकणी कक्ष बंद होता. पोलीस मदत केंद्रही नव्हते. देशात अत्याचाराच्या घटनांमध्ये ९६ टक्के आरोपी हे महिलांच्या ओळखीतील कोणी तरी असतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शंभरपैकी २७ आरोपींनाच शिक्षा होते. बाकी सुटून जातात. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ (एनसीआरबी)च्या आकडेवारीत ही माहिती समोर आली. या आकडेवारूनुसार भारतात वर्षभरात महिलांविरोधात चार लाखांहून अधिक गुन्हे दाखल केले जातात. या गुन्ह्यांमध्ये अत्याचारच नाही, तर छेडछाड, हुंडाबळी, अपहरण, ट्रॅफिकींग, ॲसिड ॲटक यासारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. देशात कठोर कायदे आणि शिक्षेची तरतूद केल्यानंतर महिलांविरोधातील गुन्हे कमी होत नाहीत.

या रिपोर्टनुसार २०२२च्या अखेरपर्यंत देशभरातील कोर्टात अत्याचारासंबंधी तब्बल दोन लाख प्रकरणे प्रलंबित होती, २०२२ पैकी यामध्ये साडे १८ हजार प्रकरणांमध्ये ट्रायल पूर्ण झाली. ट्रायल पूर्ण झालेल्या पाच हजार प्रकरणांमध्येच दोषींना शिक्षा दिली गेली, तर १२ हजारहून जास्त प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले. भारतापेक्षा ब्रिटनमध्ये अत्याचाराच्या प्रकरणात शिक्षा मिळण्याचा दर ६० टक्क्यांहून जास्त आहे. कॅनडामध्येदेखील अत्याचाराच्या घटनांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त आहे. या आकडेवारीवरून आणि नमूद केलेल्या प्रत्यक्ष परिस्थितीवरून देशात सातत्याने वाढत असलेल्या अत्याचाराच्या प्रकरणांमागील तथ्य नीट लक्षात घ्यायला हरकत नाही.

वाढत्या अत्याचाराच्या प्रकरणांमधील तथ्य लक्षात घेतले पाहिजे

आकडेवारीनुसार २०१२ च्या आधी वर्षभरात अत्याचाराच्या सरासरी २५ हजार घटना नोंदवल्या जात; मात्र यानंतर हा आकडा ३० हजारांच्या वर गेला. २०१३ मध्येच ३३ हजारांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. २०१६ मध्ये तर हा आकडा ३९ हजारांवर पोहोचला. २०१२ मध्ये महिलांविरोधात गुन्ह्यांची २.४४ लाख प्रकरणे नोंदवली गेली होती तर २०२२ मध्ये ४.४५ लाखांहून जास्त प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजेच दिवसाला १२०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली! इतकेच नाही तर, अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. ‘एनसीआरबी’च्या रिपोर्टनुसार २०१२ मध्ये अत्याचाराची २४ हजार ९२३ प्रकरणे नोंदवली गेली होती. म्हणजे प्रत्येक दिवशी सरासरी ६८ प्रकरणे, तर २०२२ मध्ये ३१ हजार ५६१ प्रकरणे नोंदवली गेली होती. म्हणजेच सरासरी ८६ प्रकरणे समोर आली. म्हणजे दर तासाला तीन आणि दर २० मिनिटाला एक महिला अत्याचाराला बळी पडली.

अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडल्या. २०२२ मध्ये तिथे अत्याचाराची ५,३९९ प्रकरणे नोंदवली गेली होती. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमध्ये ३,६९० प्रकरणे नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे ९६ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी ओळखीची व्यक्ती निघाली. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार अत्याचाराच्या घटनांमध्ये शिक्षा मिळण्याची शक्यता २७ ते २८ टक्के इतकीच आहे. म्हणजे १०० पैकी २७ प्रकरणांमध्येच आरोपी दोषी सिद्ध होतो, बाकी प्रकरणात त्यांची सुटका केली जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -