अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
आरेतील बोगद्याचे काम ऑगस्टपासून सुरु होणार
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (जीएमएलआर) अंतर्गत होणाऱ्या कामांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी (आरे फिल्मसिटी )येथील बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी संयंत्र (टनेल बोअरिंग मशीन) ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल होणार आहे. हे ‘टीबीएम’ संयंत्र ठेवण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापनाकडे भूखंड उपलब्ध करून देण्याकामी विनंती करण्यात आली असून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी-यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी ६ मार्च २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पुल) उत्तम श्रोते यावेळी उपस्थित होते.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची उंची १, २६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व उच्चस्तरीय काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रत्नागिरी जंक्शन येथे उड्डाणपुलाला आधार देणारे ४ उभे खांब (पिअर्स) वगळता उर्वरित काम अंतिम टप्प्यात आले आहे. रत्नागिरी हॉटेल जंक्शन येथील संरचनात्मक अंमलबजावणी पद्धती कशी असावी याबाबत सल्लागार यांच्यासमवेत बांगर यांनी विचारविनिमय केला. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.