महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना सज्ज
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पालिका निवडणुकीपूर्वी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागांमधील जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज दिले. आजपासून सुरु झालेल्या शिवसंवाद दौऱ्यात पहिल्याच दिवशी ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खासदार डॉ. शिंदे यांनी संवाद साधला.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की विधानसभेला मतदारांनी महायुतीला पूर्ण बहुमत दिले. त्यानंतर प्रत्येक प्रभागात महापालिका, राज्य सरकारची कशा प्रकारे कामे सुरु आहेत कुठे अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी आज घाटकोपरमध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पक्ष संघटना वाढीसाठी शिवसेना नेत्यांसोबत वॉर्डनिहाय आज बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटना कशा प्रकारे काम करत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे यासंदर्भात शाखा प्रमुख, उप शाखाप्रमुख, विभाग प्रमुखांशी चर्चा केली. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, कामे पूर्ण करण्यासाठी पुढची रणनिती कशी असावी याबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
विधानसभानिहाय प्रत्येक प्रभागातील लोकांच्या समस्या, त्या कशा सोडवायच्या यावर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्याचपद्धतीने आज महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजी नगर मानखुर्द या विधानसभानिहाय बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळी, सचिव किरण पावसकर आणि भाऊसाहेब चौधरी, उपनेते डॉ. दिपक सावंत तसेच शिशीर शिंदे, उपनेत्या शीतल म्हात्रे उपस्थित होते.