मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने गोराई, बोरीवली येथील स्वामी विवेकानंद शिक्षण विकास मंडळ ट्रस्टला भाडेपट्टा करारनाम्याद्वारे दिलेल्या शाळे लगतच्या खेळाच्या मैदानावर टर्फ टाकुन नायलॉन जाळीचे नेटशेड उभारणीसाठी एक वर्षाच्या कालावधीकरिता संस्थेस ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. विद्यार्थी, खेळाडूंचे हित लक्षात घेता मंडळातर्फे सदर निर्णय घेण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकार्यांनी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी यांची आज म्हाडा मुख्यालयात भेट घेऊन सदरहू नेट शेडचे पुनर्स्थापन करून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत विनंती केली. तसेच संस्थेकडुन नेट शेडचा वाणिज्य वापर होणार नाही अथवा गैरवापर होणार नाही याची हमी दिली आहे. या हमीच्या आधारे ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या नेडशेड मैदानाचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर केला जाणार नाही, अशी हमी शाळेने दिली आहे. शाळेच्या विश्वस्तांनी नियमांचे पालन करण्याची ग्वाही दिल्यानंतरच एक वर्षासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हे ना- हरकत प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठीच देण्यात आले असून व्यावसायिक हेतूंसाठी याचा वापर करता येणार नाही.
मंडळाने शाळा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, नेटशेड मैदानाचा कोणत्याही प्रकारे अनधिकृत व्यावसायिक वापर करू नये. शाळेने दि. ०२.०२.२०२२ व दि.०१.०६.२०२२ रोजींच्या पत्रांन्वये शाळेशेजारील खेळाच्या मैदानावर टर्फ टाकुन नायलॉन जाळीचे नेटशेड करिता विनंती केली होती. त्यास अनुसरुन म्हाडा मुंबई मंडळ यांनी दि. ०१.१२.२०२३ रोजी १ वर्षाच्या कालावधीसाठी वाणिज्य वापर न करण्याच्या अटींवर शाळेस ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. परंतु, सदरहू नेटशेड मैदानाचा वाणिज्य वापर होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व ना-हरकत प्रमाणपत्राची ०१ वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने शाळेला सदरील नेटशेड काढुन घेण्याबाबत या कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली होती.
संस्थेने याबाबत कोणेतेही सहकार्य न दाखविल्याने व सदरील नेट शेड काढुन न घेतल्याने म्हाडाने सदरहु नेट शेड काढून घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घेऊन ०५ आणि ०६ मार्च २०२५ रोजी सदरहू नेटशेडचे निष्कासन करण्यात आले. म्हाडाने हा भूखंड मूळतः विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठीच भाडेतत्वावर दिला होता आणि त्यानुसार त्याचा वापर फक्त शैक्षणिक आणि खेळांसाठीच केला पाहिजे. मुंबई मंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, या मैदानाचा वापर केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि खेळासंबंधी उपक्रमांसाठीच होणे आवश्यक आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण विकास मंडळ ट्रस्ट या संस्थेस प्लॉट क्र. १२, गोराई-१, बोरीवली (प.), मुंबई-४०००९१ येथील म्हाडाच्या अभिन्यासातील कंपोझिट स्कुल प्लॉट २५६७,०० चौ. मी. शाळा बांधण्यासाठी व ३३०८.६० चौ.मी. खेळाचे मैदान असा एकुण ५८७५.६० चौ. मी. भूखंड दि.१६.१२.१९९४ रोजी भाडेपट्टा करारनाम्याद्वारे वितरीत करण्यात आला. दरम्यान, म्हाडा मुंबई मंडळाने घेतलेल्या या निर्णयाबाबत शाळेतील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी समाधान व्यक्त केले असून, एक वर्षाकरिता ना- हरकत प्रमाणपत्र दिल्याने त्यांनी मंडळाचे आभार मानले आहेत.