Monday, August 25, 2025

L&T One day Menstrual Leave : मासिक पाळीमध्ये एक दिवसाची Paid Leave; महिला दिनानिमित्त L&T चं मोठं पाऊल

L&T One day Menstrual Leave : मासिक पाळीमध्ये एक दिवसाची Paid Leave; महिला दिनानिमित्त L&T चं मोठं पाऊल

मुंबई : देशातील L & T कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बिहार आणि ओडिशा सरकारच्या विशेष व्यवस्थेतून प्रेरित होऊन देशात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीनं महिलांना मासिक पाळीदरम्यान महिन्यातून एक दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी पहिल्यांदाच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीच्या पार्श्वभूमीवर रजा देण्याची नवीन सुविधा सुरू केली आहे. मुंबईमधील पवई कार्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमात कंपनीनं ही घोषणा केली.

एल अँड टी कंपनीमध्ये ६०,००० कर्मचारी आहेत, त्यापैकी ५,००० महिला कर्मचारी आहेत. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या ९% इतकी आहेत. तथापि, या धोरणात एल अँड टीच्या नॉन-कन्स्ट्रक्शन आणि नॉन-इंजिनीअरिंग व्यवसायांसारख्या वित्तीय आणि तंत्रज्ञान सेवांशी संबंधित कंपन्यांचा समावेश नाही. कारण या व्यवसायांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे, तर मुख्य एल अँड टी ऑपरेशन्समध्ये वर्क फ्रॉम ऑफिस अशी पॉलिसी आहे.

यापूर्वी या वक्तव्यावरून झालेला वाद

कंपनीतील कर्मचाऱ्यांना ९० तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर एल अँड टीच्या अध्यक्षांवर अनेक स्तरातून टीका झाली होती. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी आपलं मतंही मांडली होती. परंतु, आता मासिक पाळीदरम्यान रजा देऊन कंपनीनं खासगी क्षेत्रात एक चांगलं पाऊल उचललं आहे.

काय म्हणालेले सुब्रह्मण्यन?

"तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा." त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करावं असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता.

दरम्यान, भारतात मासिक पाळीच्या रजेबाबत कोणताही नियम नाही, परंतु एयू स्मॉल फायनान्स बँक, ओरिएंट इलेक्ट्रिक, स्विगी आणि झोमॅटो सारख्या अनेक संस्था आणि ओडिशा, बिहार आणि केरळ सारख्या राज्यांनी महिलांसाठी स्वतंत्रपणे असं धोरण स्वीकारलं आहे.

Comments
Add Comment