मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (Parle-G) विले पार्ले येथील कार्यालयावर आयकर विभागाने शुक्रवारी छापा टाकला. यासोबतच गुजरातमधील कच्छ येथील कंपनीच्या इतर कार्यालये आणि कारखान्यांवरही तपासणी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या छाप्यांचे नेमके कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, केंद्रीय तपास संस्थेच्या आर्थिक शाखेच्या पथकाने कंपनीच्या (Parle-G) आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी परकीय मालमत्ता युनिट आणि आयकर विभागाच्या तपास शाखेद्वारे करण्यात येत आहे.
पार्ले प्रॉडक्ट्सची (Parle-G) स्थापना १९२९ मध्ये झाली असून, कंपनीचे नाव मुंबईतील विले पार्ले परिसरावरून घेतले गेले आहे. १९३८ मध्ये कंपनीने ‘पार्ले-ग्लुको’ या नावाने बिस्किटांची विक्री सुरू केली होती, ज्याला नंतर ‘पार्ले-जी’ या नावाने मोठी लोकप्रियता मिळाली.