मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी बुधवारी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याची मुक्ताफळे उधळली होती. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे.
भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरेंनी केलं. तसेच भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ?असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिल की, संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना,त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने अस विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं .
देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी…
— Raj Thackeray (@RajThackeray) March 6, 2025
भैय्याजी जोशी ऋषितुल्य… व्यक्तिमत्व : गुणरत्न सदावर्ते
ऋषितुल्य भय्यूजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले. मुंबईत भाषेची सक्ती करता येणार नाही.मराठी बोल म्हणून तुम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही, अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केले. मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे.मुंबईत शहरात विविध राज्य,प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे.घाटकोपरची भाषा गुजराती आहे,त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे,असे नाही,असे विधान माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे