Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांमुळे व्यापारी त्रस्त

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांमुळे व्यापारी त्रस्त

दादर व्यापारी संघाने थेट पोलिस आयुक्तांकडे मागितली दाद

मुंबई (खास प्रतिनिधी): दादर पश्चिम भागांतील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे दादरमधील रहिवाशी त्रस्त असून आता दादर व्यापारी संघाने मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून एन.सी. केळकर रोड आणि आसपास परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून याठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दादर व्यापारी संघाने दादर पश्चिम येथील एन सी केळकर रोड व आसपासच्या परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांबाबत चिंता व्यक्त करत या वाढत्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांसह वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. संघाचे अध्यक्ष सुनील शाह यांनी, आपल्या या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की या एन सी केळकर रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या वीर कोतवाल उद्यानासमोरील आर के वैद्य मार्ग रोड जंक्शनवरच सर्वाधिक फेरीवाल्यांचा विळखा वाढत आहे आणि हे स्थानिक पोलिस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशिवाय ही फेरीवाल्यांची संख्या वाढत नसल्याचीही तीव्र तक्रार त्यांनी व्यक्त केली.

या वाढत्या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या या परिसरात मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कोपऱ्यावर आणि पदपथांवर अनधिकृत फेरीवाली हे पथारी पसरवून बसले आहेत आणि पोलिस तसेच महापालिकेची कारवाई होण्यापूर्वीच त्यांना सूचना मिळत असते,असेही म्हटले आहे. तसेच पानेरी शोरुम जवळ वाहतूक पोलिस उभा असला तरी शोरुममधील ग्राहकांच्या वाहनांना संबंधित वाहतूक पोलिस हा वाहने उभी करण्यास परवानगी देतो, परिणामी मुख्य रस्त्यावरच पार्किंग केली जाते, तिथेच वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी व्हॅलेट पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून दिली. परंतु अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद तसेच पाठिंबा न मिळाल्याने हा प्रभावी प्रकल्प बंद करण्याची वेळ आली.

तसेच जिथे ही पार्किंगची सुविधा दिली होती, तिथेही फेरीवाल्यांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोपही दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह यांनी आपल्या निवेदनात केली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कुणीच जबाबदारी घेत नसून महापालिका प्रशासन पोलिसांवर ढकलत आहे आणि पोलिस महापालिका प्रशासनावर जबाबदारी ढकलत आहे, त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई न करता एकप्रकारे दोन्ही संस्था एकप्रकारे त्यांना संरक्षण देत आहेत. त्यामुळे या भागातील फेरीवाल्यांना हटवून वाहतूक कोंडी तसेच वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशाप्रकारची मागणी व्यापारी संघाने केली आहे.

Comments
Add Comment