Sunday, October 26, 2025
Happy Diwali

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी भाषा आलीच पाहिजे! मुख्यमंत्री फडणवीसांचा रोखठोक अंदाज

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात राहणार्‍यांना मराठी भाषा आलीच पाहिजे! मुख्यमंत्री फडणवीसांचा रोखठोक अंदाज

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे, असे नाही’, असे वक्तव्य केल्याचा संदर्भ दिला. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे असल्याचे नमूद करत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी या वेळी भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. त्यावर फडणवीस यांनी वरीलप्रमाणे भूमिका स्पष्ट केली.

आम्ही अन्य भाषेचाही सन्मान करतो. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करू शकतो, तोच अन्यांच्या भाषेवर प्रेम करू शकतो. महाराष्ट्रात रहाणार्‍यांनी मराठी शिकले पाहिजे. महाराष्ट्रात राहाणार्‍यांना मराठी आले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांचेही याविषयी दुमत असेल, असे नाही, अशी राज्यशासनाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.

 

"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वादग्रस्त वक्तव्य जोशी यांनी केलं आहे.

मुंबईची भाषा मराठीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना, "भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकून मी त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment