Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीप्रवाशांच्या रस्त्यातील अडथळा होणार दूर

प्रवाशांच्या रस्त्यातील अडथळा होणार दूर

एमएमआरडीए हटवणार मेट्रोच्या कामाचे बॅरिकेड्स

मुंबई (प्रतिनिधी): मेट्रो मार्गिकांच्या स्थानकांची कामे सध्या सुरू आहेत. या मेट्रो कामांमुळे रस्त्यांवर असलेल्या बॅरिकेड्सचा प्रवाशांना नाहक त्रास होता आहे. मात्र हा अडथळा आता दूर होणार आहे. मेट्रो परिसरातील बॅरिकेड्स डिसेंबर २०२५ पर्यंत काढण्यात येतील, असे मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांगितले आहे. त्यामुळे रस्ते मोकळे होणार असल्याने वाहतूक कोंडीतून वाहने आणि प्रवाशांची सुटका होईल.

मुंबईत मेट्रो मार्गिकांची कामे २०१८ पासून सुरू आहेत. त्यासाठी विविध भागांत बॅरिकेड्स लावल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी शहराच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता काही मेट्रो मार्गिकांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने तेथील बॅरिकेड्स हटवले जात आहेत. मंडाले ते डीएन नगर मेट्रो २ बी, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ यांच्या स्थानकांखालील व आगमन-निर्गमन मार्गासाठी असलेले बॅरिकेड्स डिसेंबर २०२५ पर्यंत काढणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मेट्रो ४ व ४ अ ची लांबी भक्तीपार्क वडाळापासून गोवनीवाडा, गायमुखपर्यंत सुमारे ३५.३० किमी आहे. यापैकी जवळपास ३२ किमी लांबीचे बॅरिकेड्स काढले आहेत. तर वायडक्टची कामे सुरू असलेल्या भागातील बॅरिकेड्स येत्या पावसाळ्यापूर्वी काढण्याचे नियोजन आहे. मेट्रो-४ मार्गावरील गांधीनगर फ्लायओव्हरवर असणारे स्पेशल स्पॅनचे गर्डर उभारल्यावर जेव्हीएलआर जंक्शनवरील ट्रसल व बॅरिकेड्स ३१ मे ते ५ जूनपर्यंत काढले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेट्रो-२ बी मार्गिका न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, व्ही.एल.मेहता रोड, एस.व्ही.रोड, बीकेसी, एस.जी.बर्वे मार्ग व सायन-पनवेल हायवेमार्गे मानखुर्दला जाते.

या मार्गावरील व्हायाडक्टची ८८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. एस.व्ही.रोडवर मेट्रोची ५.६८ किमी लांबी असून विलेपार्ले ते वांद्रे पश्चिमेतील ४.५० किमी लांबीमधील बॅरिकेड्स काढले आहेत. तसेच उर्वरित अंतरावर स्थानकांची कामे सूरू आहेत. एस.व्ही.रोडवर वांद्रे स्थानकाजवळ वांद्रे मेट्रो स्थानक प्रस्तावित आहे. या स्थानकाच्या १२ पैकी ११ पिलर्सचे कामे पूर्ण झाले आहे. या ठिकाणावरील बॅरिकेड्स हटवले आहेत. उर्वरित ठिकाणी एकत्र बॅरिकेड्स न लावता टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स उभारुन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -