Sunday, March 16, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीभगवंताचे नाम कधी सोडू नये

भगवंताचे नाम कधी सोडू नये

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे; त्यालाच आपण ‘भगवंत’ असे म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे; म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे. याला ‘नाम’ असे संत म्हणतात. ज्या अंत:करणात नाम आहे, म्हणजे ज्या अंत:करणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्यबुद्धी, भाव, श्रद्धा आहे तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो. भगवंताबद्दल आस्तिक्यबुद्धी असणे म्हणजे स्वत:बद्दल नास्तिक्यबुद्धी असणे होय. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंत:करणात राहू शकत नाहीत.

संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वत:ची इच्छा राहातच नाही. जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्त्व उरत नाही. कधी सुख, तर कधी दु:ख. कधी यश, तर कधी अपयश. हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना ‘त्याच्या’ इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले. ‘मी खरा नसून तोच खरा आहे’ हे सांगण्यासाठी जिथे ‘मी’च उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय. तिथे ‘मी त्याला जाणतो’ हे देखील संभवत नाही.

संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला, भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे. नाम घेत असताना, सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये; पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने, जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे; किंबहुना, भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात, म्हणून प्रारब्धदेखील त्याच्या नजरेखाली काम करते.

नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो; तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाइतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते.

तात्पर्य : भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की, त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -