माझे कोकण : संतोष वायंगणकर
हवामानात सतत होणारे बदल यामुळे यावर्षी कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ, सुपारी या सर्वच फळपिकांच्या बाबतीत परिणाम जाणवत आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळा असतो. नोव्हेंबर, डिसेंबर अगदी जानेवारीचा पहिला पंधरवडा मात्र थंडी गायब होते. पुरेसा आणि आवश्यक असणारा थंडीचा हंगाम होऊ न शकल्याने त्याचा मोहरावर परिणाम झाला. आंब्याला मोहर येण्यासाठी भरपूर कडाक्याची थंडी झाली तरच आंबा, काजू मोहरतो आणि बहरतोही; परंतु यावर्षी थंडी न झाल्याने आंब्यावर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. फक्त ३०-४० टक्केच आंबा पीक येईल असे बागायतदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा बागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीला जशी आंबा लागवड आहे तशाच आंबा बागायती मधल्या भागांमध्येही आहेत. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही सतत हवामान बदलत गेले. पाऊस तर बाराही महिने कोसळणार की काय? असे सतत वाटत राहिले.
कोकणातील शेतकरी काजू, आंबा बागायतींवरच त्यांचे वार्षिक, आर्थिक गणित अवलंबून असते. वर्षभर काजू, कलम बागायतीच्या निगराणीसाठी करण्यात आलेला खर्च, वारंवार करावी लागणारी फवारणी या सर्वांचा आर्थिक ताळमेळ फारसं गणित कुठे जमत असे नाही. त्यातच आंबा किंवा काजू या दोन्हींच्या बाबतीत परराज्यातून अतिक्रमण आहेच. आंबा कोकणातला देवगड, रत्नागिरी हापूस हे ब्रॅण्ड आहेत; परंतु कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंबा रत्नागिरी-सिंधुदुर्ग हापूस म्हणून राजरोसपणे मोठ्या मार्केटमध्ये विकला जातो. कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आपल्या हापूस आंब्यावर होणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत बिलकूल चिंतेत नाही. आजही कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी आपल्याच आमच्या कोकणातील देवगड, रत्नागिरीचा हापूस इंग्लंडच्या राणीला आवडतो. इंग्लंडच्या राजघराण्यात कोकणातला हापूस जातो. याच आनंदी विचारात बागायतदार शेतकरी मश्गुल आहे; परंतु गेल्या तीस-चाळीस वर्षांत जग किती बदललंय, मार्केटमध्ये किती बदल झालेत याचा साधा विचारही आपण करत नाही. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आजही कोकणातील आंबा हातरूमालातच दर ठरताना दिसतो. याबाबतीत राजकीय नेते, पुढाऱ्यांना काय वाटतं यापेक्षा आंबा बागायतदारांना काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून कोकणात कधीच विचार होत नाही. कोकणातील शेतकरी देखील राजकीय पक्षीय विचारसरणीत गुंतलेले आहेत. निवडणूक काळात जरूर पक्षीय राजकारणाचा विचार व्हावा. मात्र, त्यानंतर केवळ विकासाचा विचार होणे अपेक्षित आहे; परंतु तसे आतापर्यंत तरी घडलेले नाही. घडत नाही हे कोकणचे दुर्दैव आहे.
शेवटी आंबा बागायतदारांनी आपले हित कशात आहे, फायदा कशात आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आंबा, काजू, मासे हे सर्वच पूर्णत: हवामानावर, निसर्गावर अवलंबून आहेत. निसर्गाचे चक्र बिघडले की, त्याचा परिणाम या सर्वांवर झालेला दिसून येतो. आंबा पीक गतवर्षीही फारच कमी प्रमाणात आले होते. काजू बागायतीच्या बाबतीतही वेगळी स्थिती नाही. आंब्याला यावर्षी पालवी फुटली यामुळे मोहर गायब झाला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांशी बोलल्यावर एक बाब स्पष्ट झाली. यावर्षी आंबा पीक हे ३०-४० टक्केच होईल. यातही आता उष्णता अशीच वाढत गेली. तरीही त्याचे दुष्परिणाम झालेले दिसतील. आंबा बागायतीत सर्वत्र पालवी दिसते. अनेक आंबा बागायतीत फळधारणा होऊच शकली नाही. कडाक्याच्या थंडीनंतर येणारी फूट आलीच नाही. पालवी फुटल्याने मोहोर आला नाही. काजू बागायतीत तर टी-मॉसकिटोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. काजू बागायतीतही पारंपरिक जुन्या वडिलोपार्जित काजू बागायती त्यांच्या-त्यांच्या आलटून-पालटून येतात. गेल्या काही वर्षांत कोकणकृषी विद्यापीठात काजूचे संशोधन करून वेंगुर्ले-४, वेंगुर्ले-७ अशा नव-नवीन काजू जातीची लागवड सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या बाबतीत फार काही करू शकले नाही तरीही काजूच्या बाबतीत मात्र कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. वेंगुर्ले-४ या जातीचा काजू ‘बी’ ही आकाराने छोटी आहे, तर वेंगुर्ले-७ या काजू जातीचा बी ही आकाराने मोठी आहे. मार्केटमध्ये या मोठ्या काजू ‘बी’ला मोठी मागणी आहे; परंतु यावर्षी कोकणात काजू बागायतीत टी-मॉसकिटोचा प्रादुर्भाव जवळपास सर्वत्रच झाला आहे. काजू बागायतदार शेतकऱ्यांनी चार-पाच वेळा फवारणी केल्यावरही त्याचा परिणाम जाणवत नाही. यामुळे फवारणीवर होणारा दामदुप्पटचा खर्च बागायतदाराला कर्ज वाढविणारा ठरला आहे.
गेल्या काही वर्षांत काजू बागायतदार शेतकऱ्यांनी ओले काजू विक्रीच्या व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित केले. साहजिकच कोकणात एखाद्याने एखादा व्यवसाय सुरू केला की, सगळ्यांकडूनच त्याची ‘री’ ओढली जाते. तसेच काहीसे गतवर्षी या काजू ‘बी’च्या बाबतीत घडले. ओले काजू एकाच वेळी काही कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आले की, बाजारभावही खाली आला. यामुळे काजू बागायतदार शेतकऱ्यांना फार फायदा होऊ शकला नाही. या वर्षीही काजू ‘बी’ उत्पादन कमी आहे. वेंगुर्ले-४ नंबर काजू आतून खराब होत आहे. कोकणातील काजू बागायतदार, आंबा बागायतदार आणि मच्छीमार असे सर्वच व्यावसायिक हे आर्थिक संकटात आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी बागायतदाराला जशी राज्य सरकार मदत करते, त्याच धर्तीवर कोकणातील काजू, आंबा, सुपारी, नारळ बागायतदारालाही मदतीचा हात मिळाला हवा.