Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीKailas Borade Case : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महाशिवरात्रीच्या रात्री सर्वांसमक्ष घातले मृत्यूचे तांडव!

Kailas Borade Case : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महाशिवरात्रीच्या रात्री सर्वांसमक्ष घातले मृत्यूचे तांडव!

अमानुष अत्याचार! तरुणाला अर्धनग्न करून दिले लोखंडी रॉडने चटके

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या रात्री मंदिरातच एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. गरम लोखंडी रॉडचे चटके देत त्याला अर्धनग्न अवस्थेत मारहाण करण्यात आली. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेतील मुख्य आरोपी हा उबाठा गटाचा पदाधिकारी असून तो अद्याप फरार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कैलास बोराडे (Kailas Borade) यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या रात्री कैलास बोराडे (Kailas Borade) यांना तापत्या लोखंडी रॉडने अमानुष चटके देण्यात आले. यात गंभीर दुखापत झालेल्या कैलास बोराडे यांनी आरोपींविरोधात तक्रार दिली. मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी नवनाथ दोड हा तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप कैलास बोराडे यांनी केला आहे. दीड-दोन लाख रुपये देण्याचे आमिष तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन देत तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कैलास बोराडे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

बोराडेंना मारहाण करणाऱ्यांना मकोका लावणार ?

या घटनेमुळे ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास १० मार्च रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ भागवत दौंड याने कैलास बोराडे (Kailas Borade) यांना मारहाण केली. कैलास बोराडे हे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी जुन्या वादावरून वाद घालत आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. लोखंडी रॉड तापवून त्यांच्या शरीरावर चटके दिले. या घटनेनंतर पारध पोलिसांनी नवनाथ दौंड आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नवनाथ दौंड यांनी आरोप फेटाळले असून त्यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बोराडे यांच्याशी संवाद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तातडीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना रुग्णालयात पाठवले. त्यांनी स्वतः कैलास बोराडे (Kailas Borade) यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला. “तुझ्या पाठिशी मी आहे, काळजी करू नको,” असे सांगत त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.

अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत मागणी केली कठोर शिक्षेची

अंजली दमानिया यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक भयंकर घटना घडत आहेत. कैलास बोराडे (Kailas Borade) यांना अमानुष पद्धतीने चटके देण्यात आले. गुंडांचे राज्य सुरू आहे का? संशयित सोनू उर्फ भागवत दौड याने माजी जि. प. सदस्य तथा शिवसेना ठाकरे गटाचा तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार केला आहे.

तापत्या रॉडने कैलास बोराडे (Kailas Borade) यांच्या शरीरावर चटके देण्यात आले. त्यांच्या पाठीवर, मानेवर, गळ्यावर, पोटावर आणि डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली. हा प्राणघातक हल्ला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर भादंवि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

मंदिरात प्रवेश केल्यावरून हल्ला?

संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या घटनेनंतर आता आणखी एका तरुणावर मंदिरात प्रवेश केल्यावरून हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. कैलास बोराडे (Kailas Borade) यांना केवळ मंदिरात गेल्यामुळे अमानुष छळ सहन करावा लागला असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

“आरडाओरड केली, पण कुणी मदतीला आले नाही”

या घटनेच्या दिवशी महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. कैलास बोराडे (Kailas Borade) देखील त्यात होते. त्याच वेळी जुन्या वादातून भागवत दौंड याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मंदिर परिसरात महाप्रसादासाठी चुली पेटवलेल्या होत्या. याच ठिकाणी पडलेल्या लोखंडी सळई तापवून कैलास बोराडे यांना २५ ते ३० चटके दिले. कैलास मदतीसाठी आक्रोश करत होते, पण कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

जुन्या वादातून हल्ला

कैलास बोराडे (Kailas Borade) आणि भागवत दौंड यांची शेतं शेजारी आहेत. वर्षभरापूर्वी पाइपलाइन टाकण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्याच वादातून भागवत दौंड यांनी राग मनात ठेवत कैलास बोराडे यांच्यावर अमानुष हल्ला केला.

या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -