मनाचा गाभारा – अर्चना सरोदे
बऱ्याच वर्षांपासून गुजरात सौराष्ट्र येथील जुनागढच्या भूमीवर उभ्या असलेल्या गिरनार पर्वतावरील गिरीशिखर दर्शनाची मनाला ओढ लागली होती. माझ्या काही मैत्रिणी जाऊनही आल्या होत्या. मला कमरेचा व संधीवाताचा त्रास असल्याने माझी मात्र हिम्मत होत नव्हती. मे महिन्यात अशीच एक दिवस घरातील साफसफाई करत असताना मला गिरी परिक्रमा पुस्तक मिळाले. निवांतक्षणी ते पुस्तक वाचताना माझ्या मनात गुरुशिखर दर्शनाची ओढ पुन्हा जागृत झाली. मी मनातच दत्त महाराजांना म्हटले “माझा योग कधी येणार? मलाही तुमच्या दर्शनाची आस लागली आहे” आणि मला एकदम भरून आलं. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या एका मैत्रिणीच्या मैत्रिणीचा म्हणजे मांजरेकर ताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या आमचा गृप गिरनारला जात आहे, तुम्ही येणार आहात का? मी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता त्यांना माझा होकार कळवला. जुनागढला आम्ही आधीच मंगलम हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.
हॉटेलवर आल्यावर फ्रेश होऊन आधी चहा मागवला. पावसात भिजून आल्यामुळे गरमागरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी आम्ही रोपवेची माहिती काढण्यासाठी बाहेर पडलो. रोपवेने पाच हजार पायऱ्या चढून अंबाजी मातेचे दर्शन घेऊन गुरुशिखरापर्यंत पाच हजार पायऱ्या चढून जायचा मानस होता. रोपवेच्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या गार्डला रोपवे किती वाजता सुरू होतो विचारल्यावर त्याने सकाळी ७ वाजताची वेळ सांगितली. परंतु पाऊस आणि हवा असेल तर बंद ही राहू शकतो अशी शंकाही व्यक्त केली. आम्ही विचारात पडलो. पाऊस असला आणि रोप वे बंद असला तर काय करायचं? इथे येण्याची धडपड वाया जाणार का असा प्रश्न पडला. आम्ही मनातले सगळे विचार झटकून गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चढवावा हनुमानजींचे दर्शन घ्यायला गेलो. असं म्हणतात की, आपण भक्तिभावाने दर्शन घेऊन चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला चढण्यासाठी बळ मिळते. तिथेच असलेल्या अंबामाता आणि स्वामी समर्थ व दत्त प्रभूंचे सुद्धा दर्शन घेतले व त्यांना प्रार्थना केली की, आम्हाला पाच हजार पायऱ्या चढण्यासाठी बळ दे आणि दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन सुखरूप होऊ दे. नंतर गिरी नारायणाच्या पहिल्या पायरीवर माथा टेकवून आम्ही पाच पायऱ्या चढायला सुरुवात केली; परंतु बघता बघता २१ पायऱ्या चढून गेल्यावर असं वाटू लागलं आपण आत्ताच चढायला सुरुवात करू. दहा हजार पायऱ्या चढूनच जाऊ. बहुधा तिथल्या सकारात्मक लहरींचा सुद्धा हा परिणाम होता. आम्ही आमच्या मनाला आवर घातला आणि परत फिरलो. सकाळी लवकर उठायचं असल्यामुळे रात्रीच बॅग भरून ठेवली.
रात्रभर पाऊस कोसळतच होता. पहाटे ५ वाजता जाग आली. पाऊस अजूनही सुरूच होता. आपण इथपर्यंत आलोय तर आता माघार घ्यायची नाही. दहा हजार पायऱ्या जाऊ भले येताना संध्याकाळ झाली तरी चालेल यावर आम्हां चौघींचं एकमत झाले. आम्ही तयार झालो. बॅगमध्ये पाण्याची बाटली ठेवली व बॅग पाठीला अडकवली आणि रूमच्या बाहेर पडलो. मुसळधार पाऊस सुरू होता. आम्ही रिक्षेने रोपवेच्या ठिकाणी गेलो. आम्ही रोपवेमध्ये बसलो. बसताना मनात थोडी धाकधूक होतीच. रोपवेतून आम्ही हळूहळू वर जाऊ लागलो. पाऊस पडत असल्याने आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. चारी बाजूंनी फक्त धुके होते. सात ते आठ मिनिटांत आम्ही अंबाजी मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो. रोपवेमधून बाहेर आलो आणि आजूबाजूला नजर टाकताच मन प्रसन्न झाले. मंदिरात जाऊन आधी अंबामाताचे दर्शन घेतले आणि खाली आलो.
दत्तमहारांजाची आज्ञा झाली म्हणून की काय इंद्रदेवाने ही आमच्यावर कृपा केली होती. पाऊस थांबला होता. पवनदेव मात्र मंत्रोच्चार करीत भक्तिभावाने गिरी नारायणाला प्रदक्षिणा घालत होते. अंबाजी माता हे गिरनार पर्वतावरील दुसरे शिखर आहे. नेमीनाथ जैन मंदिर हे पहिले शिखर आहे. दहा हजार पायऱ्या चढून येणाऱ्यांना हे शिखर लागते. आम्ही समोरच्या चहाच्या स्टॉलवर गरम गरम चहा घेतला. तिथूनच काठी घेतली आणि तिसऱ्या गोरक्षनाथ शिखराकडे प्रवास सुरू केला. आता पंधराशे पायऱ्या उतरायच्या होत्या आणि सहाशे पायऱ्या चढायच्या होत्या. दत्तमहारांजाचे नामस्मरण करत पायऱ्या उयरायला सुरुवात केली. आता पवनदेवांच्या प्रदक्षिणा ही पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण एकदम आल्हाददायक होते. गिरी नारायणाने जणू धुक्याची शाल पांघरली होती. ८.४५ ला आम्ही गोरक्षनाथ नाथांच्या मंदिराजवळ पोहोचलो आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. आता अखंड धुनीसाठी आम्हाला आठशे पायऱ्या उतरायच्या होत्या. सव्वानऊ वाजता आम्ही अखंड धुनीचे दर्शन घेतले. गुरुशिखरापर्यंत आम्हाला साधारण १५०० पायऱ्या चढायच्या होत्या.
आता आम्हाला चढताना धाप लागत होती. आम्ही १४०० पायऱ्या चढून गेलो आणि आमच्या नजरेला गुरुशिखराचे दर्शन झाले. मन आनंदाने चिंब भिजले. तिथेच थांबून आम्ही आधी घरी व्हीडिओ कॉल केला. सर्वांना गुरुशिखराचे दर्शन करवले आणि १०.३० ला आम्ही वरती मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताच दत्तमहारांजाच्या प्रसन्न मूर्तीचे साश्रुनयनांनी दर्शन घेतले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्या घोषात आतापर्यंतचा सगळा थकवा दूर झाला. नेत्रांमध्ये सद्गुरूंचे रूप साठवून डोळे मिटून त्या अद्भुत क्षणांना हृदयकुपीत जतन करून ठेवत होतो. दत्त महाराजांच्या कृपेने आम्हां चौघी मैत्रिणींशिवाय तिथे कोणीच नसल्याने जवळजवळ १५ ते २० मिनिटे शांत मनाने दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेर आलो.
आता कुठे आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो. क्षणभर आम्ही स्वर्गात असल्याचा भास आम्हाला झाला. कारण आमच्या पायांमधून शुभ्र मेघ पळताना दिसत होते. जणू अंबामातेच्या चरणी नतमस्तक होऊन ध्यानमग्न अवस्थेतून बाहेर पडणाऱ्या गिरी नारायणाला आलिंगन देण्यासाठी त्यांची आपापसात चढाओढ सुरू होती. आकाशातून आमच्यावर जणू दवरूपी फुलांची वृष्टी होत होती आणि त्या दवरुपी शुभ्र फुलांच्या माळा घालून आमची कुंतले सुशोभित झाली होती. असा रमणीय देखावा पाहून कविवर्य कालिदासांच्या महाकाव्याची मेघदुताची आठवण कोणाला होणार नाही. आम्ही हा अद्भुत नजारा मनात साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. येताना पंधराशे पायऱ्या उतरून अखंड धुनीचा महाप्रसाद घेऊन चढण्यास सुरुवात केली. अठ्ठावीसशे पायऱ्या चढून अंबाजी शिखरवर आलो तिथून रोपवेने खाली आलो. हॉटेलवर त्या
दिवशी पूर्ण आराम केला आणि दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो.