जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
जे खरे सद्गुरू असतात त्यांचे कार्य फार मोठे असते. ते साधकांना नाममंत्र तर देतातच, पण कर्मकांडांच्या जंजाळात न अडकविता त्यांना साधनेची विविध अंगे टप्प्याटप्प्याने शिकवीत शिकवीत आत्मसाक्षात्कारापर्यंतचा मार्ग दाखवतात. समाजात निरनिराळ्या थरावरचे साधक असतात. प्रत्येकाची कुवत, बुद्धी, ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती व क्षमता वेगवेगळी असते. या सर्वाना त्यांच्या कुवतीप्रमाणे योग्य ती साधना शिकवून, सद्गुरू ह्या साधकांचा उद्धार करतात. त्याचप्रमाणे सद्गुरूंवर मनापासून प्रेम करणारे एकनिष्ठ, प्रामाणिक व नम्र असे जे अधिकारी साधक असतात, त्यांना दिव्य बोध व दिव्य साधना शिकवून “आपणा सारिखे करिती तत्काळ’’, असा साक्षात्काराचा सोपान दाखवितात.
मात्र असे असूनही, “सद्गुरू आम्हाला कशाला पाहिजे?”, “आम्ही व देव, आमचा थेट संबंधांमध्ये ही दलालं कशाला पाहिजेत?”, असे म्हणणारे मूर्ख लोक जगात आहेत. त्यांना हे कळत नाही की, देव म्हणजे काय? दिव्यत्व ह्या शब्दापासून देव हा शब्द आला आहे. जे-जे दिव्य आहे ते सर्व देव आहे. भगवंताने भगवद्गीतेत अकराव्या अध्यायात सांगितलेले आहे की, सूर्य देव आहे, चंद्र देव आहे, सर्वच देव आहे. सर्वच मी आहे हे खरे आहे. हे सांगतो आहे, कारण या जगात दिव्य नाही आहे काहीच नाही. खरोखरच सर्व दिव्य आहे, पण हे दिव्यत्व जे आहे ते ओळखायला शिकले पाहिजे.
“आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे अखंड ध्यानाची धरावे, पुरुषोत्तमाचे’’ असे स्वरूपानंदांनी सांगितलेले आहे. येथे ‘आधी’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आधी देवासी ओळखावे, बाकी सगळे नंतर. ओळखच झाली नाही, तर भजन काय करणार? देवाला ओळखून जेव्हा आपण त्याचे भजन करतो, स्मरण करतो, त्यात जो रंग आहे ना तो पांडुरंग असतो. ओळख नसताना जे भजन अथवा पूजन करतो, ते काहीतरी देवाकडून मागण्यासाठी, काहीतरी मिळविण्यासाठी लोकांना ऐकविण्यासाठी. तेव्हा त्या भजनात पांडुरंग नसतो. त्यात अहंकार नसतो. तेव्हा आता आपण जे करतो त्यात पांडुरंग आहे की, अहंकार आहे हे तूच ठरव, कारण “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.