राहुरी : डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, श्रीशिवाजीनगर येथील राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या गैर कारभाराची चौकशी करून यूनियन चे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील साखर कामगार एकीकरण समितीच्या वतीने चंद्रकांत कराळे, इंद्रभान पेरणे, रफिक सय्यद, प्रहार चे आप्पासाहेब ढूस आदींनी केली होती.
या मागणीनुसार नाशिक येथील कामगार उपायुक्तांनी श्रमिक संघ अधिनियम १९२६ मधील तरतुदीनुसार युनियनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात उत्तर दिले नाही तर युनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात येईल असे आदेश दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियन च्या मार्फत सदर साखर कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडविले जात नाही कामगार हिताचे निर्णय
घेत नाही.
तसेच कामगार युनियन ॲक्ट १९२६ मध्ये दिलेल्या नियमानुसार अस्तित्वात असलेली युनियन ही घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करित असून कोणतेही व्यवहार नियमाप्रमाणे करत नाही. त्याचप्रमाणे नियमानुसार असलेली २००१ ते २००५ कालावधी करिताची युनियन बरखास्त दाखवून बेकायदेशीरपणे नवीन सदस्य निवड दाखवून युनियनचा ताबा घेण्यात
आलेला आहे.
हे सर्व कामकाज बेकायदेशीर असल्यामुळे कामगार एकीकरण समिती मार्फत दीड महिन्या पूर्वी बेकायदेशीर असलेल्या युनियनवर कायदेशीर कार्यवाही करून तिला बरखास्त करण्यात यावी. सदर तक्रारीची गंभीर दखल घेत अस्तित्वात असलेला युनियनच्या गैरव्यवहार व गैरकारभार पहाता त्यांना चौकशीची नोटीस देऊन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
साखर कामगार एकीकरण समिती मार्फत चौकशीअंती युनियनकडून गैरकारभाराच्या संपूर्ण रकमा वसूल करण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे साखर कामगार एकीकरण समितीचे प्रमुख चंद्रकांत कराळे, रफिक भाई सय्यद, व इंद्रभान पेरणे, आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.