Thursday, March 27, 2025

देहाची तिजोरी…

ऋतुराज – ऋतुजा केळकर

‘देहाची तिजोरी…
भक्तीचाच ठेवा…
उघड दार देवा आता…
उघड दार देवा…’

दूर कुठे तरी जगदीश खेबुडकर यांच्या या गीताचे स्वर सुधीर फडके यांच्या आवाजात स्मशानाची शांतता चिरत जात होते. समोर जळणारी ती चिता आणि हे गीत किती विलक्षण योगायोग होता तो! एक आत्मा जो कायम आपल्या देहावर प्रेम करत आला. ज्याने फक्त देहाच्या सुखापुढे सारे काही तुच्छ समजले तो आत्मा आज त्याच्या देहाला सोडून अनंतात विलीन होत होता.

देहाची किंवा शरीराची निर्मिती ही हिंदू धर्मानुसार ‘पंचमहाभुतांपासून’ होते. आता ही पंचमहाभुते कुठली, तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच घटकांचे मिश्रण म्हणजे हा देह, अध्यात्मिकदृष्ट्या आत्मा हा अमर आहे. तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. बौद्ध तत्त्वज्ञान हे आत्म्याची संकल्पनाच नाकारून देहाची निर्मिती संस्कार, कर्म, विचार आणि इच्छाशक्ती यामुळे होते असे गृहीत धरते, तर जैन तत्त्वज्ञानानुसार आत्मा हा अमर आणि शुद्ध असून तो फक्त कर्मानुसार देहधारणा करतो असा विश्वास ठेवतात. शिख धर्मानुसार, आत्मा ईश्वराच्या आदेशानुसार शरीर धारण करतो आणि शरीर हे एक असे साधन आहे की, जे आत्म्याला ईश्वराशी जोडण्यासाठी वापरले जाते.

सरते शेवटी असे म्हटले, तर नक्कीच उचित ठरेल की, देहाचे अंतिम उद्दिष्ट आत्म्याचा परिपूर्ण अनुभव घेणे आणि ईश्वराशी एकात्मता साधणे असेच आहे. पण मी म्हणेन की,
‘देहाच्या लालसेने किती जन्म वाया गेले…
कळले न कोणा परिवर्तनाचे क्षण निसटून गेले…
कर्माच्या झुंबरांची हिऱ्याची कट्यार…
धार त्याची कापते षड्रिपूंचे मायाजाल…
षड्रिपूंचे मायाजाल…’

पण परत मला पडलेला एक प्रश्न तसाच राहिला आणि तो म्हणजे ‘देहाची तिजोरी ती काय?’ माझ्या अल्प मतीला जे उमजले ते असे पाहा बरं पटतंय का? ‘तिजोरी’तील पहिले अक्षर म्हणजे ‘ति’. ति म्हणजे ‘तितिक्षा’, तितिक्षा म्हणजे ‘सहनशीलता’ मग फक्त दुःख सहन करणे असे होते का हे? तर नाही, मनाच्या चौकटीत असलेले मोह, अहंकार तसेच अपेक्षाभंग या भावनांना योग्य पद्धतीने बांध घालून जीवनाचा प्रवाह हा ऋतुचक्राच्या रचनाबंध प्रवाहात आपल्या आत्म्याच्या खोलीचा तसेच विस्ताराचा संपूर्ण विचार करून अनवटपणे रुजवणे म्हणजे ‘तितिक्षा’.

नंतर येते ते ‘तिजोरी’ या शब्दातील पुढील अक्षर म्हणजे ‘जो’, माझ्या मते ‘जो’ म्हणजे ‘जोतिश्वर’ म्हणजेच ‘प्रकाशाचा स्वामी’. आपला देह जर कर्माच्या बंधनात अडकलेला आहे असे गृहीत धरले, तर मग या देहाची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका ती कशी बरं व्हावी? जर ती व्हायला हवी असेल, तर आपणच आपल्या सद्भावनांनची ज्योत प्रकाशित करून मानवी जीवनकलेत विलक्षण क्रांती घडवून या जगाच्या राहुटीत आपले अस्तित्व असे सोडून जा, म्हणजे जेव्हा-जेव्हा पिढ्यानपिढ्या षड्रीपुंच्या आत्मवैरणात घायाळ होतील तेव्हा-तेव्हा त्यांच्याकरिता तुम्ही ‘प्रकाशाचे स्वामी’ होऊन त्यांना आयुष्याचे मार्गक्रमण कसे करावे त्याचे मार्गदर्शक व्हाल.

त्या नंतर येते ‘तिजोरी’ या शब्दातील शेवटचे अक्षर म्हणजे ‘री’. माझ्या मते ‘री’ म्हणजे ‘रिक्त’ व्हा. कर्माच्या या बंधनातून मुक्त होण्याकरिताचा एक खूप मोठा मार्ग म्हणजे हा मिळालेला ‘जन्म’. मग या जन्मात अशी उत्तमोत्त्तम कर्म करा की, ज्यामुळे ‘पुनरपि जन्म पुनरपि मरणं’ हे उक्ती मागे पडून आपल्या ‘मुक्तीच्या मार्गाची किवाडे’ उघडली जातील. किंबहुना ‘री’ म्हणजे ‘रीधीन’. रीधीन म्हणजे ‘संपन्नता’.

आपल्या जीवनाच्या रामसेतुतील तडजोडीच्या चिरांना पुननिर्मितीच्या खारीच्या वाट्याने असे संयोजन करा की, आपल्या जीवनाचे शिल्प हे अधिकाधिक मोहक आणि आकर्षक होईल यात संशयच नसेल. मग माझ्या या ‘देहाच्या तिजोरी’च्या या व्याख्येशी सहमत होऊन आपल्या देहाच्या तिजोरीचे त्या परमात्म्याच्या चरणांशी समर्पण करणार ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -