शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट
जामखेड : शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. अनेक ठिकाणी जनावरे कळपाने फिरतात. याचा नागरीकांना त्रास होतो. तसेच वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो.
नगरपरिषदेने वारंवार सूचना देऊनही जनावरे मालक दक्षता घेत नाहीत. जनावरे तासंतास रस्त्याच्या मध्यभागी बसत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडून अनेकदा लहान-मोठे अपघात होतात.नगरपरिषद प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन संबंधित जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी येथे केली जात आहे.मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे शहरातील नागरिकांसह वाहनधारक तसेच व्यावसायिक हैराण झाले आहेत.
भटकी कुत्र्यांचा देखील उपद्रव आहे. जनावरांची झुंबड रस्त्यावर तसेच दुकानांसमोरील शेडमध्ये आश्रयासाठी येत असल्याने दुकानांसमोरील शेड व पायऱ्यांवर दररोज मलमूत्र पडलेले असते. व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
शहरामध्ये शाळा, विद्यालये, महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची ही मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मोकाट जनावरांमुळे वेगाने जाणारी वाहने त्यांच्या पायावरून गेल्याने जनावरे जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.
पोटात प्लास्टिक
कित्येक रहिवासी घरातील टाकाऊ खाद्यपदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांत भरतात. या पिशव्यांची तोंड बंद करून ती रस्त्यावरील अडगळीत फेकून देतात. अशा पिशव्यांचा शोध घेऊन मोकाट जनावरे त्यातील अन्न पदार्थ प्लॅस्टिक पिशव्या खाऊन फस्त करतात. यामुळे जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा जाऊन जनावरांना अपाय होऊन ती दगावतात. या सर्व पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाकडून मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.