प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली माहिती
अहिल्यानगर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ७५० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे गुरुवार ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अयोध्येकडे रवाना होणार असून अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक नियोजन करावे असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, तहसीलदार शरद घोरपडे आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभा गीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.लाभार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, नोंदणी करून येण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांच्या ऐवजी प्रतीक्षा यादीतील नागरिकांची नावे निश्चित करावी.
लोकप्रतिनिधिना नियोजनात सहभागी करून घ्यावे. लाभार्थ्यांनी आधारकार्ड, दोन छायाचित्रे, आवश्यक औषधे, पाच दिवसाचे आवश्यक साहित्य आणण्याबाबात सूचना द्याव्यात. सकाळी ९ वाजेपर्यंत लाभार्थी अहमदनगर रेल्वे स्थानकावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.विशेष रेल्वे ७ तारखेला रात्री अयोध्येला पोहोचणार आहे आणि १० तारखेला सकाळी अहिल्या नगरला परत येईल. प्रवासादरम्यान लाभार्थ्यांची सर्व व्यवस्था आयआरटीसीटीतर्फे करण्यात येणार आहे. रेल्वेत वैद्यकीय उपचारासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.-