नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एक हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. यात चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून (Crime News) केल्याची घटना घडलीय. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील नदीकिनारी फेकून दिलाय.
दरम्यान, पतीने पोलिसात पत्नी हरवल्याची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून तपास केला. अखेर या प्रकरणात तपासाचे चक्र गतिमान करत पोलिसांनी पतीचे बिंग फोडत आरोपीला अटक केली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विकी रॉय यादव या वीस वर्षीय पतीला ताब्यात घेतले आहे. चारित्र्याच्या संशय व विवाहात सासऱ्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ सुरू होता. अशातच, सततच्या भांडणानंतर पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली देखील आरोपीने दिली आहे.
अमृता कुमारी यादव ही मूळ नेपाळमधील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा न्यायालयात आरोपीला दाखल केले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आमले यांनी दिली आहे.