Monday, June 16, 2025

Mhada : म्हाडा भवनातील पैशांच्या उधळण प्रकरणी अर्जदारांची उद्या पुन्हा सुनावणी!

२७ फेब्रुवारीच्या सुनावणीला ११ जणही होते गैरहजर


मुंबई : म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आलेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची (Money laundering case) चौकशी विशेष समितीकडून सुरू आहे. या चौकशीअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र यावेळी एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता समितीने गुरुवारी, ६ मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन म्हाडाने ११ अर्जदारांना केले आहे. या अर्जदारांना ही शेवटची संधी असेल, असा इशाराही म्हाडाने दिला आहे.



विक्रोळी कन्नमवार नगर येथील ११ संक्रमण शिबिरार्थींना नवीन संक्रमण शिबिरात गाळे देण्यात आले नाहीत. दुरुस्ती मंडळाने २० वर्षे या संक्रमण शिबिरार्थींना गाळ्यांपासून वंचित ठेवले असा आरोप करीत एका महिलेने १४ फेबुवारी रोजी वांद्रे येथील म्हाडा भवनात अनोखे आंदोलन केले. म्हाडा (Mhada) भवनातील दुसऱ्या मजल्यावरील दुरुस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांच्या दालनात गळ्यात पैशांची माळ घालून आलेल्या या महिलेने चलनी नोटांची उधळण करून आंदोलन केले.



अर्जदारांना आणखी संधी देण्याचा म्हाडाचा निर्णय


सुनावणीला एकही जण न आल्याने म्हाडा (Mhada) कर्मचाऱ्यांना अर्जदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवून सूचनापत्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या पत्त्यावर अर्जदार नसल्याने त्यांना सूचनापत्र देता आली नाहीत. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने आता त्यांना शेवटची एक संधी देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. सुनावणीला अर्जदार यावेत यासाठी आता म्हाडाने वर्तमानपत्रात ११ अर्जदारांची नावे प्रसिद्ध करून त्यांना २७ मार्च २०२५ रोजी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आता गुरुवारी हे अर्जदार सुनावणीस उपस्थित राहतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment