बुंध्याभोवती जागा सोडून खोदकाम
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते सिमेंटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून रस्त्याची ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे आता झाडांच्या मुळावर येत आहे. अनेक रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झाडांची मुळेच या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे, जेसीबीमुळे झालेल्या खोदकामामुळे तुटली जात असून पदपथांचीही कामे सुरु असल्याने ही झाडे चारही बाजूने कमकुवत बनली जात आहे. त्यामुळे झाडांच्या बुंध्याभोवती एक बाय एक मीटरची जागा सोडून उर्वरीत जागेमध्ये खोदकाम करणे आवश्यक असताना, रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांमध्ये हा नियमच पाळला जात नसल्याने रस्त्यालगतची अनेक झाडांचे आयुर्मानच कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आता याप्रकरणात उद्यान विभागाला लक्ष घालावे लागले आहे.
मुंबईतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे प्रगतिपथावर आहेत. सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात सुरू आहे. यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत, असे निर्देश बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने देवून कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्ते कामांतील खोदकामामुळे तिथे असलेल्या झाडांच्या मुळांना धोका पोहाचत आहे. परिणामी झाडांची मुळे तुटल्यामुळे तसेच तोल एका बाजुला जात असल्याने झाड उन्मळून पडण्याची दाट शक्यता आहे. माटुंगा पश्चिम येथील मनमाला टँक रोड रोडच्या सिमेंट काँक्रिटीकरणात अशाचप्रकारे खोदकामामुळे झाडांची मुळेच तोडली गेल्याने ते झाड जवळच्या सोसायटीवर जावून कोसळून संबंधित इमारतीच्या खिडक्यांसह संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर उद्यान विभागाने झाडांना धोका पोहोचवल्या जाणाऱ्या सिमेंट काँक्रिटीच करणाच्या कामाकडे विशेष लक्ष दिले आहे.
रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी कार्यादेश जारी
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश असून ही कामे करताना रस्त्यालगत असलेल्या झाडांना धोका पोहोचवला जात आहे. त्यामुळे उद्यान विभागाच्यावतीने रस्ते विभागाला नोटीस पाठवून रस्त्याच्या विकासासाठी खोदकाम करताना किमान एक बाय एक मीटरची जागा सोडून खोदकाम केले जावे असे कळवले आहे. तसेच ज्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्या रस्त्याची कामे हाती घेण्यापूर्वी उद्यान विभागाला अवगत करावे तसेच खोदकाम करताना तिथे झाडे असतील तर त्याची काळजी घ्यावी तथा उद्यान अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खोदकाम करावे अशाप्रकारच्या सूचना केल्याची माहिती मिळाली.