अभय गोखले
जूलै – ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशमधील विद्यार्थ्यांनी आरक्षणातील भेदभावाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले होते. हे आंदोलन पाशवी बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न तत्कालीन शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केल्याने ते आंदोलन चिघळले आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात अनेक आंदोलक मृत्युमुखी पडले. खरे पाहता शेख हसीना सरकारने आंदोलकांबरोबर बसून व्यवस्थित वाटाघाटी केल्या असत्या तर प्रश्न सामंजस्याने सुटला असता; परंतु सरकारने दडपशाहीचा मार्ग पत्करल्याने आंदोलन चिघळले आणि त्याची परिणती म्हणजे शेख हसीना यांना देश सोडून भारताच्या आश्रयाला यावे लागले. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर बांगलादेशमध्ये परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिकट झाली आहे. बांगलादेशची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ज्या गार्मेंट उद्योगावर अवलंबून आहे तो उद्योग राजकीय अस्थिरतेमुळे कोलमडून पडल्याने, बांगलादेशवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर सरकारची कमान नोबेल पारितोषिक विजेते मोहंमद युनूस हे संभाळत आहेत; परंतु बांगलादेशची बिघडलेली घडी व्यवस्थित करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका कधी होतील याबाबत अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधात आंदोलन पुकारणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनी एकत्र येऊन नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. या नवीन राजकीय पक्षाचे नाव “जातीय नागरिक पार्टी” असे आहे. विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम हे नवीन राजकीय पक्षाचे संयोजक आहेत. याशिवाय आरक्षण विरोधी आंदोलनातील इतर नेते म्हणजे सारजीस आलम, हसनात अब्दुल्ला, नसिरुद्दीन पटवारी, अख्तर हुसेन आणि अरिफूल इस्लाम यांच्यावर नवीन पक्षात निरनिराळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. जातीय नागरिक पार्टी हा आंदोलनातून जन्माला आलेला बांगलादेशमधील पहिला राजकीय पक्ष आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग हा पक्ष सर्वात जुना पक्ष असून त्याची स्थापना १९४९ साली झाली होती. बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात शेख मुजीबर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीगने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बांगलादेशमधील दुसरा मोठा राजकीय पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा आहे. या पक्षाची स्थापना बांगलादेशचे माजी अध्यक्ष झियाऊर रेहमान यांनी १९७८ साली केली. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणारा जमाते इस्लामी हा आणखी एक पक्ष बांगलादेशच्या राजकारणात आहे. हा पक्ष कट्टर भारत विरोधी आहे. हा पक्ष पाकिस्तानवादी असून बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात या पक्षाने पाकिस्तानी सैनिकांना मदत केली होती. बांगलादेशचे माजी अध्यक्ष एच. एम. इर्शाद यांनी स्थापन केलेला जातीय पार्टी हा पक्ष बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय आहे.
विद्यार्थी नेत्यांनी स्थापन केलेल्या नवीन राजकीय पक्षाचे उद्दिष्ट काय असणार आहे, याबाबत आता थोडक्यात माहिती घेऊ या. या नेत्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही, हे उघडच आहे, मात्र ही त्यांच्या जमेची बाजू ठरणार आहे. बांगलादेशातील जनतेला या पक्षाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. या पक्षाच्या स्थापना सोहळ्यात सामान्य जनतेने जी प्रचंड गर्दी केली ती पाहता या विद्यार्थी नेत्यांवर जनतेचा प्रचंड विश्वास दिसत आहे. या अगोदर बांगलादेशमधील जनतेने शेख मुजीबर रेहमान, झियाऊर रेहमान, खलेदा झिया, एच एम इर्शाद आणि शेख हसीना वाजेद यांच्या नेतृत्वाखालील राजवटींचा पुरेसा अनुभव घेतला आहे. बांगलादेशमधील जनता भ्रष्टाचार, दडपशाही, घराणेशाही यांना कंटाळली आहे. त्यामुळे या नवीन पक्षाकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. पक्ष स्थापना सोहळ्यात पक्षाचे संयोजक नाहिद इस्लाम यांनी जे भाषण केले ते जनतेला आश्वस्त करणारे आहे. ते म्हणाले की, नवीन पक्षाचा फोकस हा देशाचे हित आणि जनतेचे कल्याण यावर असणार आहे. आपल्याला असा बांगलादेश उभारायचा आहे, ज्यामध्ये सामान्य नागरिकाचा आवाज ऐकला जाईल. यापुढे बांगलादेशात भारतवादी किंवा पाकिस्तानवादी राजकारणाला जागा नसेल. सध्या बांगलादेशी सत्ताधाऱ्यांची पाकिस्तानबरोबर जी घसट सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर नाहिद इस्लाम यांचे वरील वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे.
नवीन पक्षासमोर बरीच आव्हाने आहेत. बांगलादेशची आर्थिक घडी बिघडली आहे. राजकीय अस्थिरता आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या बांगलादेशमधील कारवाया शेख हसीना सरकारच्या पतनानंतर वाढल्या आहेत. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बंदी घातलेल्या जमाते इस्लामी या भारत विरोधी पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. बेगम खलेदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या पक्षाची नवीन पक्षाबाबत काय भूमिका राहणार हे पाहावे लागेल. बांगलादेश सध्या राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. विद्यार्थी नेत्यांनी जे उद्दिष्ट समोर ठेवून नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे ते उद्दिष्ट आशादायक आहे, अर्थात त्याबाबत कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढणे सयुक्तिक ठरणार नाही.