एकही जागा परस्पर शासनाला दिली जाणार नाही!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आश्वासन
मुंबई : एसटीच्या स्थानक व आगाराच्या आवारातील जाहिरातीच्या जागांवर शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचनालयाने परस्पर काढून एसटीच्या १४० जागा परस्पर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा विरोध केला असून अशी एसटीची एकही जागा परस्पर दिली जाणार नाही असे स्पष्ट आश्वासनही सरनाईक यांनी आज दिले आहे.
या संदर्भात आज विधान भवनात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरनाईक यांची भेट घेतली व निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
एसटीच्या स्थानक परिसर व आवारात वर्षानुवर्षे विविध जाहिराती प्रसिध्द केल्या जात असून त्यांतून काही कोटींचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे.या जागा शासनाच्या जाहिरात विभागाने परस्पर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असून त्यावर बळजबरीने अतिक्रमण करण्यात आले होते. या जागांवर शासनाच्या व खाजगी जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीची निविदा सुद्धा काढण्यात आली होती व प्रक्रियेची निविदा पूर्व बैठक म्हणजेच प्री बीड सुद्धा माहिती व तंत्रज्ञान संचनालयाने घेतली केली होती. याला एसटी महामंडळाने पत्र लिहून आक्षेप घेतला असून यापूर्वी पाच वर्षाच्या करारावर या जाहिरातीच्या जागा भाडे तत्वावर घेणाऱ्या कंपनीने सुध्दा आक्षेप घेतला आहे . करोडोंचे उत्पन्न देणाऱ्या एसटीच्या जाहिरातींच्या जागांवरील शासनाचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही असा इशाराही बरगे यांनी दिला होता.
या शिवाय बी. ओ. टी. वर विकसित केल्या जाणाऱ्या मोकळ्या जागांमधून सुद्धा एसटीला जास्तीत जास्त नफा मिळवून घेण्याचा प्रयत्नही केला जाईल, असेही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट केले.