सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम खोलात
मुंबई : मुंबईत सध्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे जोरात सुरु असून या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी रस्ते अभियंता तसेच सल्लागार कंपन्यांसह आयआयटीच्या अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली. शिवाय अतिरिक्त आयुक्त सर्व कामांची दिवसा तसेच रात्री जावून अचानक पाहणी करत असले तरी मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्याची कामे योग्यप्रकारे होत नाही. अंधेरी पूर्व येथील जुना नागरदास रस्ता (ओल्ड नागरदास रोड)चे सिमेंटीकरण सुरु असून या रस्त्यांची उंचीच कंत्राटदाराने कमी करत येथील रस्त्यांनाच चक्क खड्ड्यात ढकलले आहे. जिथे पूर्वी रस्त्याची आणि सोसायट्यांच प्रवेशद्वार समांतर होते, तिथे आता नव्याने बनवलेल्या रस्ता आणि प्रवेशद्वार यांच्यामध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी उडत सोसायटीत गाड्या घेवून जायचे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या महापालिकेच्या के पूर्व विभागातील सिमेंट काँक्रिटची कामे सुरु आहे. या अंधेरी पूर्व भागातील जुना नागरदास रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. यातील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे. ज्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे, त्या मार्गिकेच्या सिमेंट काँक्रिटच्या कामांमध्ये चक्क रस्त्यांची उंचीच कमी करून हा रस्ता सखलात ढकलला गेला आहे. या जुना नागरदास रस्त्यावर क्रेसेंट ग्रँड को ऑप हाऊसिंग सोसायटी असून या सोसायटीत तब्बल ७३ कुटुंबे राहत आहे. येथील रस्ता हा पूर्वी डांबराचा असतो. हा डांबराचा रस्ता असताना या सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराला समांतर होता. परंतु आता या रस्त्यांचे खोदकाम करून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करताना रस्त्याचे बांधकाम योग्यप्रकारे समांतर रेषेत न केल्याने आता सोसायटीचा प्रवेशद्वार आणि विकसित रस्ता यामध्ये तब्बल दीड ते दोन फुटांचे अंतर निर्माण झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना आता सोसायटीत आपली वाहने न्यायची कशी असा प्रश्न पडला आहे.
जर महापालिकेच्या अभियंत्यांच्या आणि सल्लागारांच्या देखरेखीखाली या रस्त्याचे काम सुरु होते तर मग रस्त्याची उंची कमी का झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या केवळ याच सोसायटीला नसून बाजुच्या कमर्शियल राज चेंबरलाही निर्माण झाली आहे. क्रेसेंट ग्रँड को ऑप हाऊसिंग सोसायटीचे खजिनदार निमिश मिस्त्री यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु ही सेवा सुविधा देताना आमच्या समोरच मोठी समस्याच निर्माण करून ठेवली आहे.
किमान रस्त्याचे काम करताना प्रशासनाच्या तसेच कंत्राटदाराच्या अभियंत्यांना याची उंची पूर्वी किती होती आणि आता किती आहे याचीही माहिती नसावी हाच मोठा विनोद आहे. जर पूर्वी रस्त्याच्या समांतर पातळीवर इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार होता आणि नव्याने रस्ता बनवल्यानंतर त्यात दोन फुटांचे अंतर निर्माण होते, तर आमच्या सोसायटीतील जी सुमारे १०० वाहने आहेत, त्या वाहनांना सोसायटीत कसा प्रवेश दिला जाणार आहे. ही वाहने उडत सोसायटीत न्यायची का असा सवाल मेस्त्री यांनी केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपले हसे करून घेण्याऐवजी या ठिकाणी सिमेंट काँक्रिटचा एक अजून लेअर वाढवून रस्त्याची उंची प्रवेशद्वाराच्या समांतर पातळीवर करून द्यावी हिच आमची मागणी असचे मेस्त्री यांनी सांगितले. सध्या आम्ही मागील बाजुला असलेल्या प्रवेशद्वाराचा वापर करत असलो तरी मागील बाजुस झोपडपट्टी परिसर असल्याने वाहने नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.