ठाणे : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधाभासी अशी वक्तव्ये केल्याने, आझमी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे. म्हस्के यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापुरुषांचा अपमान करणारे जे कुणी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे दोन धर्मात व समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत कडक आदेश दिले असून, अशा प्रवृत्तींचे समर्थन करणाऱ्यांना वेळीच ठेचले पाहिजे, पोलिस ठाण्यात डांबले पाहिजे आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी जोरदार शब्दांत सांगितले.
याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. आंदोलन करण्यासाठी त्यांच्याकडे लोकसंग्रहच उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांनी इंदिरा गांधी यांच्या घरात गहाण ठेवल्याचा आरोप करत, आंदोलन करण्याआधी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसबाबत बोलताना म्हस्के म्हणाले की, काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे आणि दिल्लीसारख्या ठिकाणी त्यांचा सुपडासाफ झालेला आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करताना म्हस्के म्हणाले की, ते आता मतांसाठी लाचार झाले आहेत. ते काय बोलतात यावर आम्ही काही ठरवणार नाही, कारण आम्ही आदित्य ठाकरे यांचे गुलाम नाही. त्यांनी स्वतः सोनिया गांधींची गुलामगिरी पत्करलेली असल्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे गटाचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडलेला आहे आणि मतांसाठी ते लाचारी पत्करत आहेत, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाची भूमिका निष्फळ असल्याचे सांगितले.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथे सशक्त नेतृत्व आहे. मुस्लिम अल्पसंख्याक बांधव देखील आमच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली. रोहित शर्मावर झालेल्या टीकेवर बोलताना, अशा व्यक्तींना प्रसिद्धी देण्याची गरज नाही, काँग्रेसची अवस्था एवढी बिकट झाली आहे की त्यांना आता कुठलाही मुद्दा गाजवायचा आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.
ही संपूर्ण घडामोड राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.